हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । न्यूझीलंड विरुद्ध भारत, पहिली कसोटी: पावसामुळे भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटी सामन्याचे शेवटचे सत्र वाया गेले. वेलिंग्टनमध्ये आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने पाच विकेट्सगमावून १२२ धावा केल्या. चहापानानंतरच पाऊस सुरू झाल्यामुळे शेवटच्या सत्रामध्ये खेळ झाला नाही त्यानंतर पंचांनी खेळपट्टीची तपासणी करून आजच्या दिवसाचा खेळ थांबविण्याची घोषणा केली. पहिल्या दिवसा अखेरीस भारताकडून उपकर्णधार अजिंक्य रहाणे ३८ तर ऱ्हिषभ पंत १० धावा करून नाबाद राहिले . न्यूझीलंडकडून काईल जेमीसनने ३८ धावा देऊन तीन बळी घेतले. तत्पूर्वी, न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून बेसिन रिझर्व्ह मैदानावर भारताला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. त्याच्या गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय योग्य ठरविला आणि पहिल्या सत्रात भारताने पृथ्वी शॉ, चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांचे विकेट्स गमावले.
वेगवान गोलंदाजांना उपयुक्त अशा खेळपट्टीवर भारतीय फलंदाज पुन्हा अपयशी ठरले. दुसरीकडे न्यूझीलंडच्या गोलंदाजांनीही पहिल्या सत्रानंतर दुसर्या सत्रात भारताचे आणखी दोन बळी घेऊन सामन्यावर आपली पकड मजबूत केली. मयांक अग्रवालने ८४ चेंडूत ३४ धावा केल्या जम बसलेला असतानाच त्याने ट्रेंट बाउल्टला पुल शॉट खेळण्याच्या प्रयत्नात आपली विकेट गमावली तर हनुमा विहारी हा जेमीसनचा तिसरा बळी ठरला.
मयंक अग्रवाल आणि पृथ्वी शॉच्या जोडीने भारताच्या डावाची सुरुवात केली. शॉने स्क्वेअर कटवर दोन चौकार मारले परंतु अयोग्य तंत्राचा फटका त्याला सहन करावा लागला. तो सौथीच्या चेंडूवर क्लीन बोल्ड झाला. कसोटी क्रिकेटमधील टीम इंडियाचा सर्वात विश्वासार्ह फलंदाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुजाराला ऑफ स्टंपच्या बाहेर जाणाऱ्या चेंडूंचा मोठ्या संयमाने सामना करावा लागला, पण दुसरा बदल म्हणून आलेल्या सहा फूट, सहा इंचाच्या जॅमिसनने त्याला पॅव्हेलियनमध्ये परत पाठवले. त्याच्या एका उसळणाऱ्या चेंडूने पुजाराच्या बॅटची कड घेऊन यष्टीरक्षक बी.जे.वाटलिंगच्या हाती स्थिरावला. त्याचप्रकारे त्याने कोहलीला बाद करून भारताला सर्वात मोठा धक्का दिला. त्याने पहिल्या स्लिपमध्ये उभ्या असलेल्या रॉस टेलरकरवी कोहलीला झेलबाद केले. सामन्याच्या दुसर्या दिवशी भारतीय संघ किमान ३०० धावांची धावसंख्या गाठण्याचा प्रयत्न करेल, त्यामुळे टीम इंडियाच्या चाहत्यांच्या नजरा विशेषत: उपकर्णधार अजिंक्य रहाणे याच्यावर केंद्रित असतील.