निसर्ग चक्रीवादळानंतर मुख्यमंत्री ठाकरे ऑन फिल्ड; मोठी घोषणा करण्याची शक्यता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । निसर्ग चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या किनारीपट्टयाला मोठा फटका बसला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी यासंबंधी व्हिडीओ कॉन्फेरंसिंग द्वारा आढावा घेतला होता. त्यानंतर आता ठाकरे थेट फिल्डवर उतरले असून आज ते रायगड जिल्ह्याची पाहणी करणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे एखादी मोठी घोषणा करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

निसर्ग वादळाने रायगड जिल्हा हादरून गेला आहे. जिल्ह्यातील आठ तालुक्यांत वादळामुळे मोठी हानी झाली आहे. जिल्ह्यात सुमारे ५ लाख घरांची पडझड झाली असून ५ हजार हेक्टरवरील कृषीक्षेत्राला फटका बसला आहे. जिल्ह्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून ८ तालुक्यांत वीज यंत्रणा व दूरध्वनी यंत्रणा पूर्णपणे ठप्प आहे. किमान १७०० गावे दोन दिवस अंधारात आहेत. जिल्ह्यातील अनेक रस्ते अजूनही बंद आहेत. या स्थितीचा गुरुवारीच आढावा घेऊन आवश्यकते निर्देश दिल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे आज प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन नुकसानीची पाहणी करणार आहेत.

दरम्यान, निसर्ग चक्रीवादळ धडकल्याने झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करावेत, म्हणजे शेतकरी व गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल. विशेषत: रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर विजेचे खांब पडले असून, महावितरणने तातडीने वीजपुरवठा सुरू करावा व प्रसंगी त्यासाठी इतर ठिकाणाहून जास्तीचे मनुष्यबळ, साधन सामग्री उपलब्ध करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारीच दिले आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे आज सकाळी ११.३० वाजता मुंबईतून बोटीने रायगड जिल्ह्यात जाणार आहेत. गोल्डन गेट ते मांडवा जेटी असा प्रवास मुख्यमंत्री बोटीने करतील. तिथून मोटारीने ते अलिबागमधील थळ येथे पोहचतील. तेथीन नुकसानग्रस्त भागांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी अलिबाग येथील जिल्हा मुख्यालयात सर्व संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री आढावा घेतील, असे सांगण्यात आले.