हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमीच काहीना काही कारणांनी चर्चेत असतात. सध्या ते त्यांनी केलेल्या एका विधानामुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी काल नागपुरात मंत्रिपदाबाबत व कायद्याबाबत एक विधान केले आहे. “गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे, असं महात्मा गांधींनी सांगितलं आहे. तो कायदा तोडण्याचा अधिकार आमचा आहे, कारण आम्ही मंत्री आहोत,” असे गडकरींनी म्हंटले आहे.
नागपूरात काल आदिवासींच्या आरोग्यासाठी ‘ब्लॉसम’ नावाच्या प्रकल्पाचे गडकरींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले की, मी महाराष्ट्रात 1995 मध्ये मंत्री होतो. त्यावेळी अनेक रस्ते, पूल मुंबईत बांधले, पण गडचिरोली आणि मेळघाटमध्ये तसे करताना खूप अडचणी आल्या. या भागात कुपोषणामुळे 2 हजार मुलांचा मृत्यू झाला. तेथील 450 गावांना रस्ते नव्हते. त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी होते.
मी या ठिकाणी रस्ते होण्यासाठी खूप प्रयत्न केले, मात्र वनविभागाचे अधिकारी रस्तेच बांधू देत नव्हते. त्यामुळे खूप त्रास झाला. वनविभागाने त्रास देऊनही मी मात्र माझ्या मार्गाने नंतर या ठिकाणी राहणाऱ्या आदिवासी लोकांचा प्रश्न सोडवला. गरीबाचं कल्याण करायचे असेल तर कुठलाही कायदा आडवा येत नाही. गरीबाच्या कल्याणाला आडवा येणारा कायदा एकदा नाही, तर दहावेळा तोडावा लागला तरी तोडला पाहिजे, असे गांधीजींनी सांगितलं आहे. तो कायदा तोडण्याचा अधिकार आमचा आहे, कारण आम्ही मंत्री आहोत,” असे गडकरींनी म्हंटले.
अधिकाऱ्यांनी फक्त यस सर म्हणायचं – गडकरी
यावेळी गडकरी म्हणाले की, मी नेहमी अधिकाऱ्यांना सांगत असतो की, तुम्ही म्हणाल तसे सरकार चालणार नाही. तुम्ही फक्त यस सर म्हणायचं आम्ही म्हटलंय त्याची अंमलबजावणी करायची. आम्ही म्हणू तसं सरकार चालणार.