हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभर नागरित्व सुधारणा कायदा (CAA) व राष्ट्रीय नागरित्व नोंदणी (NRC) च्या विरोधात आंदोलनं सुरु आहेत. नितीश कुमार यांनी आज बिहार विधानसभेत बोलताना राष्ट्रीय नागरित्व नोंदणी बिहारमध्ये राबवण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हटलं आहे. NRC ची चर्चा फक्त आसामशी संबंधित होती असं म्हणत त्यांनी काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी NRC बद्दल केलेल्या विधानाचा आधार घेतला. त्यामुळे अमित शहा यांनी घेतलेल्या युटर्नला नितीश कुमारांकडून दुजोरा मिळाला आहे.
गृहमंत्री अमित शहा यांनी NRC पूर्ण भारतात राबवलं जाईल असं वेळोवेळी स्पष्ट केलं होतं. मात्र नागरिकत्व सुधारणा कायद्यासोबतच आता NRC लाही देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. राजकीय पक्ष, साहित्यिक, सामाजिक संघटना आणि विद्यार्थ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन भाजप NRC बद्दल बॅकफूटवर गेल्याचं पहायला मिळत आहे. जदयूचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रशांत किशोर यांनीसुद्धा बिहारमध्ये CAA आणि NRC ची अमलबजावणी होणार नाही असं वेळोवेळी स्पष्ट केलं होतं.
आता नितीश कुमार यांनी NRC बाबत आपली भूमिका विधानसभेत मांडत भाजप सरकारला एकप्रकारे घरचा आहेरच दिला आहे. बिहारमध्ये जनता दल युनायटेड आणि भाजप यांचे संयुक्त सरकार अस्तित्वात आहे. आता नितीशकुमारांच्या भूमिकेवर भाजप काय उत्तर देणार हे पाहणं रंजक ठरेल.