औरंगाबाद – सातारा परिसरातील 41 वर्षीय तलाठी लक्ष्मण नामदेव बोराटे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी समोर आला होता. सुसाईड नोटमध्ये 13 जणांची नावे लिहली आहेत, असे असतानाही आणखी कोणावरही गुन्हा दाखल झालेला नाही. केवळ अकस्मात मृत्यूची नोंद सातारा पोलिसांत करण्यात आल्याने बोराटे यांच्या नातेवाईकांनी सोमवारी पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांची सातारा पोलिस ठाण्यात भेट घेतली. या भेटीत बोराटे कुटंबातील सदस्यांनी पोलिसांच्या कारवाईबाबत थेट उपायुक्तांना विचारणा केली. दरम्यान सदर प्रकरणाची चौकशी करुन दोषींवर निश्चित कारवाई करण्यात येणार असल्याचे आश्वासन पोलिस उपायुक्त दीपक गिऱ्हे यांनी मृत तलाठीच्या कुटूंबियांना दिले.
मृत बोराटे यांनी कार्यालयातील वरिष्ठांसह इतरकाही जण त्रास देत असल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद केले आहे. सदर प्रकरणात गुन्हा दाखल करावा यासाठी नातेवाईकांनी पोलिस ठाणे गाठले होते. पोलिस निरिक्षक सुरेंद्र माळाळे यांनी या प्रकरणात कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर तलाठी बोराटे यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र, दुसऱ्या दिवशीही गुन्हा दाखल न झाल्याने पोलिसांबद्दल मृताच्या कुटंबिय, नातेवाईकांत रोष निर्माण झालेला होता.
….तर कोर्टात जाऊ
बोराटे यांनी सुसाईड नोट लिहली आहे, तसेच त्यांच्या कॉल रेकॉर्डींगचाही तपशील देण्यात आलेला आहे. वरिष्ठाच्या जाचाला कंटाळून ही आत्महत्या करण्यात आलेली असतानाही गुन्हा दाखल न झाल्याने मृताचे कुटंबिय, नातेवाईक संतप्त झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांकडून कारवाई न झाल्यास याप्रकरणी प्रसंगी कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे बोराडेंच्या कुटूंबियातर्फे सांगण्यात आले.