पुणे । कोणीही दादागिरी, मनगटशाहीच्या जोरावर सर्वसामान्य माणसाला लुटत असेल, तर त्याच्यावर कायद्याने जेवढी कडक कारवाई करात येईल तेवढी कडक कारवाई करण्यात येईल. मग तो कोणी का असेना माफी मागत आला तरी त्याला माफ करणार नाही, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती शहर व तालुक्यातील खासगी सावकारांना गर्भित इशारा दिला. याशिवाय कोणी कितीही मोठ्या बापाचा असूद्या, कारवाईनंतर कुठला मायचा लाल चुकलं म्हणून माझ्याकडे आला तरी सोडणार नाही, असा सज्जड दमही अजित पवारांनी दिला आहे. ते बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलत होते.
अजित पवार पुढे म्हणाले, ‘मधल्या काळामध्ये खासगी सावकारीची प्रकरणे व त्यामधून झालेल्या आत्महत्या माझ्या कानी आल्या होत्या. नियमबाह्य व कायदे मोडून व्यावसाय करण्यापेक्षा चांगले व्यावसाय करा. अशा धंद्यांपासून बाजूला रहा,’ अशी समजही अजित पवार यांनी खासगी सावकारी करणाऱ्यांना दिली.
बारामती शहर व तालुक्यात अनेक विकासकामे प्रगतीपथावर आहेत. त्यामध्ये कालवा सुशोभिकरण, शिवसृष्टी, चिंकारा पार्क, रस्ते, पुल, तिन हत्ता चौक सुशोभिकरण यामुळे बारामती शहराच्या सौंदर्यामध्ये भर पडणार आहे. यामध्ये कोणाची जागा जात असेल तर त्याला विरोध करू नका. अतिक्रमण केले असेल तर नियमाप्रमाणे ते काढण्यात येईल. शहराचा कायापालट होत असताना आपल्या काही कल्पना असतील तर नक्की आम्हाला कळवा. चांगल्या कल्पानांवर काम करता येईल, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी सांगितले.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’