बाळासाहेबांच्या स्मारकासाठी एकाही झाडाची कत्तल नको ! खंडपीठाने फटकारले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – शहरातील एमजीएम विद्यापीठात प्रियदर्शिनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे काम सुरु आहे. मात्र या प्रकल्पासाठी झाडांची अनावश्यक कत्तल होत असल्याची याचिका मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल करण्यात आली होती. यासंदर्भात विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर आणि तीन वकिलांच्या समितीने स्वतंत्रपणे पाहणी अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते. हा अहवाल गुरुवारी कोर्टासमोर सादर करण्यात आला. या अहवालावर चर्चा झाल्यानंतर कोर्टाने नकाशात नमूद व्हीआयपी गेटची आवश्यकता काय, असा प्रश्न उपस्थित करून यापुढे उद्यानातील एकाही झाडाची कत्तल होता कामा नये, अशा शब्दात महानगरपालिकेला फटकारले. यासंदर्भातील आता पुढील सुनावणी 7 डिसेंबरला होईल.

एमजीएमच्या प्रियदर्शिनी उद्यानात बाळासाहेब ठाकरे स्मारकासोबत फूड कोर्ट व इतर प्रकल्प उभारण्यात येत आहेत. मात्र त्यासाठी झाडांची मोठ्या प्रमाणावर कत्तलही करण्यात आली. याविरोधात औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल आहे. महानगरपालिकेने झाडे तोडण्याचे समर्थन करणारी कारणे शपथपत्रात दिली, मात्र याचिकाकर्त्याने त्यावरही आक्षेप घेतले होते. त्यावर कोर्टाने स्वतंत्र समिती नेमत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.

उद्यानातील बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाबाबत अजिबात शंका नसून त्याभोवती उभारण्यात येणार फूड प्लाझा आणि व्हीआयपी गेटमुळे स्मारकाच्या उद्देशाला बाधा निर्माण होईल, असे मत कोर्टाने मांडले. तसेच यापुढे उद्यानातील एकाही झाडाची कत्तल होणार नाही, अशी खबरदारी मनपा प्रशासनाने घ्यावी, असे आदेश कोर्टाने दिले.

Leave a Comment