औरंगाबाद – कोरोनाचा नवीन व्हेरिएंट ओमिक्रॉन चा वाढता धोका लक्षात घेऊन लसीकरण लवकरात लवकर करण्यासाठी प्रशासन विविध उपाययोजना करत आहेत. त्या उपाययोजनेचा एक भाग म्हणून लस घेतल्याचे प्रमाणपत्र सोबत नसेल तर पाचशे रुपये दंड आकारण्याची मोहीम महापालिकेकडून कालपासून सुरू करण्यात आली.
काल पहिल्या दिवशी मनपाच्या नागरी मित्र पथकाने दिवसभरात 1 हजार 755 नागरिकांचे प्रमाणपत्र तपासले. त्यापैकी 37 जणांकडे प्रमाणपत्र नसल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना प्रत्येकी पाचशे रुपये प्रमाणे दंड आकारण्यात आला याप्रमाणे 18 हजार 500 रुपये दंड कोटी वसूल करण्यात आले आहेत.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत एकही डोस न घेता सार्वजनिक ठिकाणी वावरणार्या, दुसरा डोस न घेतलेल्या नागरिकांना दंड करण्याचा निर्णय जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी मनपाने कालपासून सुरू केली. रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या नागरिकांनी लस घेतल्याचे प्रमाणपत्र न दाखविल्यास दंड आकारण्यात येत आहे.