Sunday, June 4, 2023

आता घर बसल्या पोस्ट ऑफिसच्या खात्यांचे हफ्ते अशा प्रकारे ऑनलाइन भरा

नवी दिल्ली । भारतीय पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या अनेक लहान बचत योजना गुंतवणूकदारांमध्ये खूप लोकप्रिय आहेत. या योजनांमध्ये चांगल्या व्याजा बरोबरच असलेल्या सरकारी गॅरेंटीमुळे आपली गुंतवणूक बुडण्याचा कोणताही धोका नसतो. यामुळेच देशातील मोठ्या संख्येने लोकं पोस्ट ऑफिस बचत योजनांमध्ये पैसे गुंतवतात.

पोस्ट ऑफिसनेही गुंतवणूकदारांच्या सोयीसाठी अनेक सेवा सुरू केल्या आहेत. यामध्ये अनेक ऑनलाइन सेवांचाही समावेश आहे, ज्याचा वापर करून लहान बचत योजनांचे गुंतवणूकदार त्यांच्या बचत खात्याशी संबंधित महत्त्वाची माहिती घरबसल्या मिळवू शकतात. गुंतवणूकदार आता पोस्ट ऑफिसद्वारे चालवल्या जाणार्‍या सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF), रिकरिंग डिपॉझिट्स (RD) आणि सुकन्या समृद्धी योजना (SSY) यांसारख्या अनेक योजनांचे मासिक हप्ते घरबसल्या ऑनलाइन भरू शकतात.

ऑनलाईन हप्ता भरणे इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (IPPB) द्वारे केले जाते. IPPB App द्वारे, तुम्ही तुमच्या PPF, सुकन्या समृद्धीसह पोस्ट ऑफिसद्वारे प्रदान केलेल्या सर्व बचत योजनांचे मासिक हप्ते भरू आणि गुंतवणूक करू शकता. या योजनांमध्ये ऑनलाइन पेमेंट करणे खूप सोपे आहे. एवढेच नाही तर ऑनलाइन पेमेंटलाही जास्त वेळ लागत नाही.

अशा प्रकारे भरा हप्ता
तुमच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचे IPPB मोबाइल बँकिंग अ‍ॅप नसल्यास, पहिले ते तुमच्या मोबाइलमध्ये डाउनलोड करा.
अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर, तुम्हाला अ‍ॅपमध्ये तुमचे खाते तयार करावे लागेल.
आता तुमच्या बँक खात्यातून IPPB खात्यात पैसे ट्रान्सफर करा. तुम्ही कोणत्याही बँक खात्यातून त्यात पैसे ट्रान्सफर करू शकता.
त्यानंतर तुम्हाला प्रॉडक्ट्सची निवड करावी लागेल. याचा अर्थ असा की, ज्या योजनेसाठी तुम्हाला हप्ता जमा करायचा आहे, तो प्लॅन PPF, SSY आणि RD मधून निवडा.
आता तुम्ही पैसे भरण्यासाठी निवडलेल्या कोणत्याही योजनेत पुढे जा. यासाठी, तुम्हाला योजनेशी संबंधित खाते क्रमांक आणि कस्टमर आयडी एंटर करण्यास सांगितले जाईल.
यानंतर तुम्हाला किती पैसे द्यायचे आहेत ते निवडावे लागेल. रक्कम टाकल्यानंतर PAY च्या पर्यायावर क्लिक करा.
तुमचा हप्ता भरला आहे.