Wednesday, June 7, 2023

चुकीचे GST रिटर्न भरल्यामुळे नोटीसऐवजी आता वसुलीची कारवाई सुरू होणार !

नवी दिल्ली । GST चे चुकीचे रिटर्न भरणे नवीन वर्षात महागात पडणार आहे. 1 जानेवारीपासून वस्तू आणि सेवा कर अधिकारी GST चे चुकीचे रिटर्न भरणाऱ्या व्यापाऱ्यांविरुद्ध वसुलीसाठी थेट पावले उचलू शकतील. चुकीची बिले दाखवण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यास यामुळे मदत होईल. अनेकदा तक्रार केली जाते की त्यांच्या मासिक GSTR-1 फॉर्ममध्ये जादा विक्री दाखवणारे व्यवसाय कर दायित्व कमी करण्यासाठी पेमेंट संबंधित GSTR-3B फॉर्ममध्ये तसाच रिपोर्ट देतात.

सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी वित्त विधेयकात या बदलाची तरतूद केली होती. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाने (CBIC) 21 डिसेंबर रोजी GST कायद्यातील सुधारणा अधिसूचित केल्या. त्यानंतर 1 जानेवारी 2022 पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे.

आतापर्यंत आधी नोटीस, मग वसुली
यापूर्वी अशी तफावत समोर आल्यावर GST विभागाकडून नोटीस बजावली जायची आणि त्यानंतर वसुलीची प्रक्रिया सुरू व्हायची, मात्र नियम बदलल्यानंतर अधिकारी थेट वसुलीची प्रक्रिया सुरू करू शकतात.

एएमआरजी अँड असोसिएट्सचे वरिष्ठ भागीदार रजत मोहन यांच्या मते, GST कायद्यातील हा बदल अतिशय कडक आहे आणि GST विभागाला गोळा करण्याचे विशेष अधिकार देतो. या नव्या तरतुदीचा गैरवापर होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.