औरंगाबाद – ओमिक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. त्यामुळे ओमिक्रॉनचा संसर्ग ओळखण्यासाठी आवश्यक असलेली जिनोम सिक्वेन्सिंग टेस्ट आता पुण्यातील प्रयोगशाळेत नव्हे तर औरंगाबादच्याच प्रयोगशाळेत केली जात आहे. एवढे दिवस कोरोना रुग्णांचे स्वॅब पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. त्यामुळे रुग्णांचे अहवाल येण्यासाठी बरीच प्रतीक्षा करावी लागत होती. आता मात्र ही तपासणी घाटीतील प्रयोगशाळेत होत असून पुण्यातून फक्त अहवालावर अभिप्राय घेण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांनी दिली.
शहरात ओमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली आहे. तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता, खबरदारी म्हणून आता कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्या प्रत्येकाचे स्वॅब जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती मनपा आरोद्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली. तसेच विदेशातून येणाऱ्या प्रत्येक नागरिकावर प्रशासन लक्ष ठेवून आहे, अशीही माहिती देण्यात आली.
नवीन वर्षात जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. त्यादृष्टीने महापालिकेने मेल्ट्रॉनसह चार हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन बेड तयार ठेवले आहेत. तसेच शासनाने 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार लसीकरण करण्यासाठी शहरातील विविध शैक्षणिक संस्था, कोचिंग क्लासेस, आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याकडून विद्यार्थ्यांची यादी मागवण्यात आली आहे. मुलांची यादी मिळाल्यानंतर कॉलेजमध्येच लसीकरण करण्याची व्यवस्था केली जाणार आहे, असे मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय म्हणाले.