साताऱ्यात ओबीसी संघटनेचे राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन

ओबीसी आरक्षण प्रश्न : सोमवारी तीव्र स्वरूपात आंदोलन करण्याचा इशारा

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

ओबीसी समाजावर होणाऱ्या अन्यायला वाचा फोडण्यासाठी सातारा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ओबीसी संघटनेच्यावतीने आज आंदोलन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारचा निषेध नोंदवला.

यावेळी सातारा जिल्हा ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भारत लोकरे म्हणाले की, सध्या ओबीसींवरती जे अन्याय होत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही आज हे जिल्हा संघटनेच्या वतीने आंदोलन केले आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण हे गेलेले आहे. हे राजकीय आरक्षण कोणी घालवले आणि का घालवले? ओबीसी समाजामध्ये फूट पाडून त्यांच्यावर अन्याय कोण करत आहे याचा पर्दाफाश करण्यासाठी सोमवारी 16 मे ला सातारा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठं आंदोलन करणार आहोत.

ओबीसींचे राजकीय आरक्षण गेल्यानंतर आता काही पक्ष सांगत आहेत कि आम्ही ओबीसींना 27 टक्के प्रतिनिधित्व देणार आहोत म्हणून. ओबीसी बांधवाना एक विनंती आहे की, जो पक्ष अशा पद्धतीने प्रतिनिधित्व देईन. त्याचे प्रतिनिधीत्व ओबीसींनी स्वीकारू नये. कारण हि त्या पक्षाची गुलामगिरी ठरणार आहे. आम्हाला सवलती पाहिजेत त्या शासनाकडून पाहिजेत कुठल्या पक्षाकडून नको. या पक्षाचं प्रतिनिधित्व देऊन आमच्या लोकांना जर ते गुलाम करणार असतील तर आम्हाला ते प्रतिनिधित्व चालणार नसल्याची माहिती लोकरे यांनी दिली.

यावेळी सातारा येथील निषेध आंदोलनावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी मोठ्या संख्येने संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

सोमवारच्या आंदोलनातून काढणार राजकीय पक्षांचे वाभाडे

आम्ही ओबीसी आहोत. ओबीसी साठ टक्के आहोत. तुम्ही प्रतिनिधित्व देणार नसाल तर आम्ही आमचा स्वतंत्र पक्ष निर्माण करण्याचा विचार करत असून स्वतंत्र निवडणूक लढणार आहोत. परंतु ज्या ज्या दिवसात ज्या पक्षांनी आमचा घात केलेला आहे तसेच ज्यांनी ओबीसींची फसवणूक केलेली आहे. त्यांचे वाभाडे काढण्यासाठी सोमवारी मोठे आंदोलन करणार असल्याचा इशारा लोकरे यांनी यावेळी दिला आहे.