गाडी शिकताना जुळलं प्रेम, नंतर अनैतिक संबंधात अडसर ठरणार्‍या पतीचा काढला काटा

0
1036
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | दुचाकी शिकता- शिकता, प्रेमाचा पाठ सुरू अन् अनैतिक संबंधात तिचा पती येताच त्याला ईदलाच संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रियसीसोबत अनैतिक संबंधांना आडकाठी करीत असल्याच्या कारणातून तिच्या पतीचा खून करण्यात आला. सातारा तालुक्यातील फरासवाडी (कोंडवे) परिसरात मंगळवारी रात्री निर्घृणपणे झालेल्या खुनाचा उलगडा करण्यात सातारा पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपी ताब्यात घेतलेले आहेत.

फिरोज चाँद मुलाणी (वय 37, रा. फरासवाडी, मूळ राहणार कडेगाव, जि. सांगली) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शकील निजाम फरास (वय 42, रा. नेले, ता. सातारा) असे संशयित आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी मृत फिरोज मुलाणी यांचा भाऊ अस्लम मुलाणी यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, खुनाची घटना मंगळवारी रात्री उशिरा समोर आली आहे. फिरोज मुलाणी हे त्यांच्या सासरवाडीमध्ये कुटुंबासोबत राहतात. मंगळवारी रात्री त्यांच्या भावाला फिरोज यांचा खून झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मध्यरात्री त्यांनी सातार्‍यात धाव घेतली. फिरोज यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला झाला असून वर्मी घाव बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृतदेह सापडल्यानंतर सुरुवातीला त्याची ओळख पटत नव्हती. यामुळे ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले होते. मात्र पोलिसांच्या नेटवर्कमुळे काही तासांतच तो मृतदेह फिरोज मुलाणी यांचा असल्याचे समोर आले. यावरून पोलिसांनी तपास गतिमान केला. फिरोज यांच्याबाबत माहिती घेतल्यानंतर मंगळवारी रात्रीपासून तालुका व एलसीबी पोलिसांनी तपासासाठी कंबर कसली.

फिरोज यांचे कडेगाव येथील कुटुंबीय सातार्‍यात आल्यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात खुनाची तक्रार दिली. पोलिसांनी तपासाला सुरुवात केल्यानंतर संशयिताची माहिती मिळाली. त्यानुसार मंगळवारी सायंकाळी संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली. संशयिताकडे प्राथमिक चौकशी केली असता ‘अनैतिक संबंधामध्ये फिरोज अडथळा ठरत होता. यामुळेच चिडून जाऊन खून केला,’ अशी कबुली शकील फरास याने पोलिसांना दिली.

दरम्यान, गुरुवारी संशयित आरोपीला सातारा जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलिस अधीक्षक अजित बोर्‍हाडे, सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोनि किशोर धुमाळ, पोनि विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि रमेश गर्जे, सपोनि अभिजित चौधरी यांच्यासह पोलिसांनी कारवाईत सहभाग घेतला.

खुनाचा असा झाला उलगडा

फिरोजचा खून झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला त्याच्या पत्नीवरच प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावेळी तिच्या बोलण्यातून हे अनैतिक प्रकरण समोर आलं. तिनंही हे कृत्य शकीलनं तर केले नसेल ना, अशी शंका पोलिसांकडे बोलावून दाखविली. त्यानंतर क्षणाचाही विलंब न करता सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे यांच्यासह त्यांच्या टीमने तातडीने शकीलला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने प्रेम प्रकरणाची कहाणी पोलिसांसमोर कथन केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here