दारु पिण्यासाठी अवघ्या 600 रुपयांसाठी वृद्धाची हत्या…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद । बीड बायपास परिसरातील सहारा सिटी परिसरातील बुधवारी उघड झालेल्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दारू पिण्यासाठी हिसकावलेल्या सहाशे रुपयांना विरोध केल्याने दोघा मद्यपींनी बबन धुराजी शिंदे यांचा खून केल्याचा उघड झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली. खून करणाऱ्या दोघा मद्यपींना पोलिसांनी गजाआड केले.

योगेश सर्जेराव खंडागळे , परमेश्वर बाबासाहेब खंडागळे अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. बीड बायपास परिसरातील सहारा सिटीच्या समोरील मोकळ्या जागेत बबन धुराजी शिंदे यांचा मृतदेह आढळून आला होता. चेहऱ्यावर जबर मारहाण करून त्यांचा चेहरा विद्रूप करण्यात आला होता. मृतदेहा शेजारी रक्ताने माखलेला भला मोठा दगड सापडला होता. त्यानंतर पोलिसांनी घटनेच्या अनुषंगाने बारकाईने तपासाला सुरवात केली होती.

या परिसरातील सर्व हॉटेल, ढाबे, वाइन शॉप, पेट्रोल पंप, गॅरेजवर जाऊन माहिती घेतली. त्यानंतर धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. पोलिसांनी परमेश्वरला त्याच्या गावातून तर योगेशला वाळूज टोलनाका भागातून अटक केली. त्यांनी खुनाची कबुली दिली आहे.

मृत बबन शिंदे तसेच आरोपी योगेश खंडागळे, परमेश्वर खंडागळे हे तिघेही दारू पिण्याच्या सवयीचे आहे. घटनेच्या दिवशी तिघांनी दारू प्राशन केली होती. त्या दिवशी मृत बबनकडे सहाशे रुपये होते. त्यामुळे आणखी दारू आणण्यासाठी पैसे दे म्हणून योगेश व परमेश्वरने आग्रह धरला, त्याला बबनने विरोध केला. त्यामुळे दोघांनीही पैसे हिसकावून घेतले, मात्र ही बाब सर्वांना सांगेल त्यामुळे बदनामी होईल म्हणून दोघांनी बबनच्या डोक्यात दगड घातला होता.