सातारा | नव्या ओमिक्रॉन या विषाणूचे रुग्ण जगभरातील अनेक देशात आढळू लागले आहेत. त्यामुळे परदेशातून येणाऱ्या नागरिकांच्याबाबत आरोग्य यंत्रणेकडून विशेष काळजी घेतली जात आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात अमेरिका, डेन्मार्क, दुबई, फ्रान्स, कुवेत या 5 देशातून आलेल्या 10 परदेशी नागरिकांना स्वतःच्या घरातच होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर संबंधितांची कोरोना चाचणी 7 दिवसानंतर करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहेत, मात्र परदेशात काही दिवसांपासून ओमिक्रॉन या परिवर्तीत स्वरुपाच्या विषाणूचा संसर्ग वाढू लागला आहे. याची खबरदारी म्हणून तात्काळ परदेशातून आलेल्या नागरिकांचे विलगीकरण करण्यात येत आहे. कर्नाटक राज्यात दोन ओमिक्रॉन बाधित सापडल्याने विशेष काळजी घेतली जात आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला देण्यात आल्या आहेत.
सातारा जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात आली आहे. गुरुवारी अमेरिका 1, डेन्मार्क 4, दुबई 1, फ्रान्स 1, कुवेत 1 व अन्य दोन अशी परदेशातून 10 नागरिक जिल्ह्यात दाखल झाले असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातून देण्यात आली.
संबंधित परदेशी नागरिक सातारा शहर व महाबळेश्वर येथे वास्तव्यास असून त्यांना आरोग्य विभागामार्फत होम वारंटाईन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आरोग्य विभागाने संबंधित परदेशी नागरिकांना भेटी दिल्या असून परदेशी नागरिकांसह सर्व कुटुंबियांची 7 दिवसानंतर कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी दिली.