सोलापूर प्रतिनिधी । कांदा भजी हा तसा महाराष्ट्रातील सर्व जनतेचा जिव्हाळ्याचा विषय. अन ते जरी भजी हे सोलापूरचे असतील तर त्यांची ‘बात काही औरच’! संपूर्ण महाराष्ट्रात सोलापूर चे कांदा भजी हे विशेष प्रसिद्ध आहेत. वेगवेगळ्या ठिकाणाहून केवळ कांदा भजी खाण्यासाठी लोक सोलापुरात येत असतात. कांदा भाज्यांसहित भज्यांचे विविध प्रकारही येथील अनेक दुकानात उपलब्ध असतात. मात्र सर्वांच्या आवडीचे कांदा भजी सध्या ग्राहकांवर रुसल्याचे चित्र सोलापुरात पाहायला मिळत आहे. कांद्याचे दर मागील काही दिवसांपासून प्रचंड वाढले आहेत.
याचा मोठा परिणाम स्वयपांकघर , तसेच हॉटेल व्यवसायावर झाला. खवय्यांकडून कांदा भज्यांची मागणी मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र ग्राहकांची ही आवड पुरवणं हल्ली दुकानदारांना मुश्किल होऊन गेलं आहे. याला वाढलेले कांद्याचे दर जबाबदार असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे दररोज बदलणाऱ्या कांद्याचा दरांबरोबर भजी प्लेटच्या दराच्या पाट्या देखील बदलाव्या लागत आहेत असे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
दरम्यान शहरातील नवीपेठ, शिवाजी चौक,रेल्वे लाईन, पंचकट्टा, भैय्या चौक, बाळीवेस, कुंभारवेस, जोडबसवण्णा चौक, भद्रावती चौक आदी भागात भजीचे प्रसिद्ध स्टॉल आहेत. रोज या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. एरव्ही १0 रुपये प्लेट असलेली कांदा भजी प्लेट काही दिवसांपूर्वी १५ रुपयांना केली गेली.त्यानंतर १५ रुपयांची कांदा प्लेट २0 ते २५ रुपयाला केली गेली. दरम्यान ज्याप्रमाणे कांद्याच्या दरात चढ-उतार होऊ लागली त्याप्रमाणे कांदा भजीचे दरही कमी-जास्त होत आहेत. त्यामुळे सतत वाढणाऱ्या दरांमुळे कांदा भजी प्रेमी देखील हैराण झाले आहेत.