परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे
लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील वाईन शॉप समोर मद्यप्रेमींची गर्दी होऊ नये म्हणून आजपासून ऑनलाईन मद्यखरेदी करण्यासाठी प्रशासनाकडून ऑनलाइन लिंक देण्यात आली आहे .आता या लिंकवरून नोंदणी करताच सशुल्क मद्य घरपोच मिळणार आहे. पण नोंदणी करताना मद्य प्रेमींनो सावधान ! तुम्ही ज्या लिंकवर नोंदणी करत आहात ती फेक असू शकते व तुम्ही फसवले जाऊ शकता. त्यामुळे अधिकृत लिंक वर जाऊन नोंदणी करणे शहाणपणाचे ठरणार आहे.
कोरोना महामारीच्या पार्श्वभुमीवर कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी परभणी जिल्ह्यात मद्य खरेदीसाठी होणाऱ्या गर्दीचे नियमन होण्यासाठी मद्य खरेदी करु इच्छीणा-या नागरीकांची नोंदणी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. दरम्यान असे आढळून आले आहे की, या लिंकसारखीच फेक लिंक सोशलमिडीयावर व्हायरल झाली आहे. त्यामुळे परभणी जिल्हा प्रशासनाकडून एक निवेदन जारी करण्यात आले असून सर्व नागरीकांनी मद्य खरेदीसाठी अधिकृत लिंक वरुनच अर्ज करावेत. बनावट लिंक वरून माहिती भरल्यास आणि त्याद्वारे नागरीकांची फसवणूक झाल्यास जिल्हा प्रशासन त्यास जबाबदार राहणार नाही याची नागरीकांनी नोंद घ्यावी. असे आवाहन करण्यात आले आहे.
अधिकृत लिंक पुढील प्रमाणे आहे. https://forms.gle/sFSw7NrgtYY62kHMA तसेच हीच लिंक परभणी जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर https://parbhani.gov.in/ उपलब्ध आहे. नागरीकांनी अधिकृत प्रणालीचा वापर करावा आणि बनावट लिंक पासून सावध राहावे असेही आवाहन करण्यात आले आहे.