सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
सांगलीतल्या स्टेशन चौक येथे शिवसेनेच्या जिल्हा अध्यक्षाच्या सदऱ्यातील रकमेवरच अज्ञात चोरटयांनी डल्ला मारला. पॅन्टच्या खिशात ठेवलेली पन्नास हजार रुपयांचा बंडल हातोहात लंपास केली. भरदिवसा घडलेल्या या घटनेनं खळबळ उडाली होती. सदरचा प्रकार हा २६ मार्च रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी शिवसेना जिल्हा प्रमुख संजय विभुते (वय ४५ रा. विटा) यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सोशल मिडियावर भामट्याचे छायाचित्र व व्हीडीओ व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्र ओबीसी, व्हीजेएनटी बहुजन परिषदेतर्फे शनिवारी आक्रोश मेळावा स्टेशन चौकात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी विविध जिल्ह्यातून पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या बहुजन परिषद समितीचे अध्यक्ष संजय विभुते होते. मेळाव्यात बैठक, स्टेज व्यवस्था किंवा इतर खर्चासाठी म्हणून विभुते यांनी सदऱ्याच्या खिशात ५० हजार रूपयाचे बंडल ठेवले होते. दुपारी मंत्री विजय वडेट्टीवार हे मेळाव्याच्या ठिकाणी उपस्थित झाले. स्टेजवर त्यांना भेटून सत्कार करण्यासाठी काही पदाधिकारी आले होते. विभुते हे स्टेजवर जात असतानाच कपाळाला भंडारा लावलेला एक भामटा त्यांना खेटूनच स्टेजवर गेला.
स्टेजवर गेल्यानंतर विभुते हे नगरसेवक व पदाधिकारी यांची ओळख मंत्री वडेट्टीवार यांना करून देत होते. नेमक्या याच गर्दीचा फायदा घेत भामट्याने श्री. विभुते यांच्या सदऱ्याच्या खिशातील ५० हजाराचे बंडल अलगद काढून काढता पाय घेतला. दुपारी चारच्या सुमारास विभुते यांना हा प्रकार निदर्शनास आला. मेळावा आटोपल्यानंतर त्यांनी व्हीडीओ चित्रीकरण पाहिल्यानंतर त्यामध्ये एक भामटा त्यांच्या मागोमाग असल्याचे व त्यानेच खिशात हात घालून रोकड लांबवल्याचे दिसले. भामट्याचे छायाचित्र व व्हिडीओ व्हायरल झाला आहे. शहर पोलिस ठाण्यात आज विभुते यांनी फिर्याद दिली. पोलिस छायाचित्राच्या आधारे भामट्याचा शोध घेत आहेत.