हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | विरोधक एकत्र आल्यास भाजपला पाणी पाजणे शक्य आहे अस म्हणत ठाकरे गटाकडून दैनिक सामनातून देशभरातील भाजप विरोधी पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्व विरोधक वेळीच सावध झाले नाहीत व एकत्र आले नाहीत, तर 2024 ची लोकसभा निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असा इशाराही सामनातून देण्यात आला आहे.
काय म्हंटल आहे सामना अग्रलेखात –
देशातील लोकशाही वधस्तंभाकडे ढकलली जात आहे. सर्व विरोधक वेळीच सावध झाले नाहीत व एकत्र आले नाहीत, तर 2024 ची लोकसभा निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक ठरेल, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेसला केलेले आवाहन महत्त्वाचे आहे. काँग्रेसने विरोधकांच्या ऐक्यासाठी पुढाकार घ्यावा. हे ऐक्य नीट झाले तर भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीत ‘100’ मध्येच ‘ऑल आऊट’ करू, असा विश्वास नितीश कुमार यांनी व्यक्त केला. कुमारांचे असेही म्हणणे आहे की, विरोधकांच्या आघाडया कितीही होत असल्या तरी काँग्रेसशिवाय विरोधी ऐक्य शक्य नाही. नितीश कुमार यांनी सत्य तेच सांगितले आहे.
भारतीय जनता पक्षाशी लढणे हे मोदी-शहांच्या अतिरेकी हुकूमशाही प्रवृत्तीशी लढण्यासारखे आहे. प. बंगालात ममता बॅनर्जी, तेलंगणात के. सी. चंद्रशेखर राव हे भाजपशी लढण्यासाठी स्वतंत्र चुली मांडून बसले आहेत, पण अशा चुलींना अर्थ नाही. काँग्रेसचा द्वेष करून भाजपच्या विद्यमान हुकूमशाहीशी कसे लढणार? हे कोडे आधी सोडवायला हवे. प्रत्येकाला भाजपविरुद्ध लढायचेच आहे, पण सध्याच्या भाजपशी स्वतंत्र चुली व संसार मांडून लढता येणार नाही. विरोधकांच्या ऐक्याची वज्रमूठ निर्माण झाल्याशिवाय लढणे शक्य नाही अस अग्रलेखात म्हंटल आहे.
काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी याबाबत महत्त्वाचे विधान केले. ते म्हणतात, “विरोधकांच्या एकजुटीबाबत काँग्रेसलाही तेवढीच चिंता आहे. सद्य परिस्थितीत एकटी काँग्रेस मोदी सरकारविरोधात लढू शकत नाही. तसेच विरोधकांच्या एकजुटीसाठी आमचे खूप प्रामाणिक प्रयत्न आहेत. आम्हाला दुखावणारे अनेक अनुभव आले असले तरी या हुकूमशाही सरकारला हटविण्यासाठी आम्ही सर्वकाही विसरून पुढे जायला तयार आहोत. काँग्रेस कोणत्याही परिस्थितीत लढेल, पण या लोकशाहीविरोधी, हुकूमशाही सरकारच्या विरोधात लढण्यासाठी आपल्याला विरोधी एकजुटीची आवश्यकता आहे.
ज्या पद्धतीने सध्याचे राज्यकर्ते माध्यमांसह सर्वच सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहेत, त्यामुळे या शक्तींविरोधात लढण्यासाठी विरोधकांच्या एकजुटीची गरज आहे,” असे ठाम मत काँग्रेसच्या वेणुगोपाळ यांनी मांडले. ते दुर्लक्षित करून चालणार नाही. 2024 साठी पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण ते नंतर ठरवता येईल, पण आधी एका टेबलावर बसून चर्चा होणे गरजेचे आहे व त्याचसाठी काँग्रेसनेही पुढाकार घ्यायला हरकत नाही. श्री. राहुल गांधी यांचे नेतृत्व ‘भारत जोडो’ यात्रेने भक्कम व प्रगल्भ केले आहे. त्यांनी संपूर्ण देश पायी पालथा घातला व त्यानंतरच्या संसद अधिवेशनात हिंडेनबर्ग व मोदी अदानी दोस्ती प्रकरणात जोरदार हल्ला करून मोदींचे वस्त्रहरण केले. मोदी उत्तर देऊ शकले नाहीत व भाषण करताना त्यांचा घसा कोरडा पडत होता. वारंवार पाणी प्यावे लागत होते. याचा अर्थ असा की, विरोधक एकत्र आले तर 2024 साली भाजपला पाणी पाजणे सहज शक्य आहे अस ठाकरे गटाने म्हंटल आहे.