औरंगाबाद – राज्य शासनाने 2 एप्रिलपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेले सर्व निर्बंध मागे घेणार असल्याचे काल जाहीर केले. जिल्ह्यात देखील शासनाने केलेल्या सूचनांचे पालन करण्यात येणार असून, तब्बल 740 दिवसांनंतर जिल्हा मास्क मुक्त होणार आहे. शासनाने मास्क वापरणे ऐच्छिक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे शासनाचे आदेश आल्यानंतर त्यावर अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
लसीकरणाचा टक्का घसरल्यामुळे जिल्ह्यात निर्बंध लागू आहेत. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लसीकरण कमी असल्यामुळे गर्दीच्या क्षमतेवर निर्बंध लागू करण्यात आले होते. 90 टक्के नागरिकांनी पहिला आणि 70 टक्के नागरिकांनी लसीकरणाचा दुसरा डोस घेतलेला असेल तरच सर्व निर्बंध मागे घेण्याचा सूचना होत्या. परंतु, काल शासनाने गुढीपाडव्यापासून सर्व निर्बंध मागे घेण्यासह मास्क वापरण्याची सक्ती देखील मागे घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले.
जिल्ह्यात 29 लाख 20 हजार 229 नागरिकांनी लसीचा पहिला तर 20 लाख 98 हजार 452 नागरिकांनी दुसरा डोस घेतलेला आहे. 45 हजार 372 नागरिकांनी दक्षता मात्रा घेतलेली आहे. दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण 65 टक्क्यांपर्यंत गेले आहे. तर पहिला डोस घेणाऱ्यांचे प्रमाण सरासरी 88 टक्क्यांपर्यंत आहे.