हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा पनवेल यांच्या मार्फत दरवर्षीप्रमाणे यंदा देखील विवेक जागर करंडक’ ही पथनाट्य सादरीकरण स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. येत्या २१ ॲागस्ट २०२२ रोजी वय वर्ष १५ ते वय वर्ष ३५ या वयोगटातील तरुण- तरुणींसाठी हि स्पर्धा घेतली जाईल. माहितीनुसार या स्पर्धेचे यंदाचे हे सलग चौथे पुष्प आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे, ही स्पर्धा कॉम्प्युटर स्क्रीनच्या खिडक्यांमधून बाहेर पडत ॲाफलाईन पद्धतीने पार पडणार आहे. त्यामुळे हि स्पर्धा आकर्षणाचे एक कारण ठरले असून याबाबत विशेष उत्सुकता पहायला मिळते आहे.
‘संविधान खतरें में है…?’ असा प्रश्न उपस्थित करत तरुणाईला विचार करायला भाग लावणारा हा विषय यंदा या स्पर्धेचे केंद्रबिंदू आहे. या विषयातून वेगळ्या आणि आधुनिक पद्धतीने लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा या स्पर्धेचा मानस आहे. यामुळेच ‘संविधान खतरें में है..?’ हाच स्पर्धेसाठीचा विषय ठेवण्यात आला आहे. तरुणांसाठी आपलं म्हणणं सांस्कृतिक अंगाने लोकांपुढे ठेवण्याची ही उत्तम संधी नवोदित वा धडाडीच्या कलाकारांना देण्यात आली आहे. सदर स्पर्धेसाठी नोंदणी करणे मात्र आवश्यक आहे.
डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खूनाला तब्बल ९ वर्ष पूर्ण होत आहेत. मारेकरी पकडले असले तरीही खरा सूत्रधार सापडलेला नाही. डॉक्टर दाभोळकरांच्या खूनाचा निषेध करतानाच सद्यस्थितीत पत्रकारांना होणारी अटक असेल किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणारे हल्ले या सर्व घटना संविधानविरोधी आहेत. संविधानातील मूल्यांवर हल्ले होत असतील तर, ही एक प्रकारे हिंसा असून लोकशाहीला घातक आहे आणि अशा प्रकारच्या हिंसा सामाजिक स्वास्थ्य बिघडवत असतात हा विचार समिती रुजवू पाहतेय. म्हणूनच ‘हिंसा के खिलाफ, मानवता की ओर’ हे अभियान राबवले जात आहे. तरुणाईने हिंसा मुक्त समाजाचा विचार करताना, संविधानाचा जागर करावा यासाठी ही स्पर्धा घेतली जात आहे. अधिकाधिक तरुणाईने यात सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.