सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे,
महापालिका क्षेत्रातील नैसर्गिक नाल्यावर मोठी बांधकामे करण्यात आली आहेत. आयुक्त कारवाईस टाळाटाळ करून या बांधकामांना अभय देत आहेत. प्रशासन व बिल्डरांचे संगणमत असल्याने हा प्रकार सुरू आहे. त्यामुळे शहरात पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. प्रशासनाने तातडीने नैसर्गिक नाले खुले करावेत, अन्यथा हरित न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा इशारा जिल्हा सुधार समितीचे अॅड. अमित शिंदे यांनी दिला.
ते म्हणाले, महापालिका प्रशासनाने नाले सफाईची चर्चा सुरु केली आहे. मात्र नाल्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाली आहेत. नाले सफाईची मोहिम राबवण्यापेक्षा नाले मुजवणाऱ्यांची सफाई करा, अशी मागणी त्यांनी केली. सन १९०२ च्या नकाशात असणारे सर्व नैसर्गिक नाले बांधकाम व्यवसायिक, ठेकेदार यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांना हाताशी धरुन मुजवले आहेत. एकीकडे दुष्कायाची दाहकता वाढत आहे, दुसरीकडे शहरातील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत नष्ट केले जात आहेत. शामरावनगरात विकासासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र नैसर्गिक नाले मुजवले गेल्याने पावसाचे पाणी आजही साचून राहत आहे. बायपास रोडवरील सर्व नाले मुजवून यावर इमारती उभ्या केल्या गेल्या आहेत. २००५ मध्ये महापुराचे पाणी स्टेशन चौकात आले होते, प्रशासन शहाणे झाले नाही तर महापुर आल्यास विश्रामबाग चौकापर्यत पाणी जाईल अशी भितीही शिंदे यांनी व्यक्त केली. झाडे लावली म्हणजे पर्यावरण राखले असा अर्थ नाही. तर नैसर्गिक नाले मोकळे झाले पाहिजेत, याबाबत आम्ही शासनाच्या नगरविकास खात्याकडे तक्रार केली होती. नगरविकास खात्याने चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश सांगली महापालिकेला आधीच दिले होते. मात्र महापालिकेचे दीड वर्षे झाले तरी अद्याप याबाबत अहवालही दिलेला नाही.
विकासकामे करताना शहरे भकास होणार नाहीत, याची खबरदारी लोकप्रतिनिधी, प्रशासनाने घ्यायला हवी. महापालिकेचे आयुक्त याबाबत काहीही कारवाई करीत नाहीत, यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून नैसर्गिक नाल्यावरची अतिक्रमणे हटवण्याची कारवाई करावी, जर प्रशासनाने कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास हरित न्यायालयात दावा दाखल करणार असल्याचा इशारा अमित शिंदे यांनी दिला. यावेळी जयंत जाधव, नितीन मोरे, रविंद्र ढोबळे, महालिंग हेगडे, संजय जाधव, उदय निकम, सुधीर नवले आदी उपस्थित होते.