Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 3704

तीन वर्षांमध्ये भारतात होणार अमेरिकेच्या दर्जाचे रस्ते; केंद्रीय मंत्री गडकरींनी दिली महत्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रीय रस्ते व परिवहन विभागाच्या माध्यमातुन भारत देशात यावर्षी 20 मार्चपर्यंत 1 लाख 37 हजार 625 किलोमीटरपर्यंत महामार्गांचे बांधकाम करण्यात आलेले आहे. एप्रिल 2014 पर्यंत 91,287 किलोमीटर महामार्गांचे बांधकाम करण्यात आले होते. या कालावधीत भारताने महामार्गांच्या बांधकामासाठी केलेल्या खर्चाविषयी केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये भारतामध्ये अमेरिकेप्रमाणे चांगल्या दर्जाचे रस्ते केले जातील असे सांगितले.

केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील रस्ते व वाहतुकीसंदर्भात महत्वाच्या घेतलेल्या निर्याबद्दल माहिती देण्यासाठी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महत्वाची माहिती दिली. ते म्हणाले की, देशभरात सध्या रस्तेनिर्मितीचे काम वेगाने सुरु आहे. सध्याच्या घडीला भारतात दररोज 38 किलोमीटर लांबीचे रस्ते तयार होत आहेत.

यावेळी मंत्री गडकरी म्हणाले की, भरत देशात सध्या रस्ते बांधकाम, डागडुजीचे काम अधिक गतीने सुरु आहे. प्रदेशाप्रमाणे आपल्याही देशातील रस्ते व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहरेत. त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची माहितीही घेतली जात आहे. येत्या तीन वर्षात भारतात अमेरिकेच्या दर्जाप्रमाणे रस्त्यांची निर्मिती केली जाईल. त्यासाठी प्रयत्नही केले जात आहेत.

खटाव तालुक्यातील पती- पत्नीचे 12 तासांत निधन झाल्याने हळहळ

खटाव | बनपुरी, (ता. खटाव) येथे पत्नीच्या निधनानंतर काही तासातच पतीचेही निधन झाल्याची हृदयद्रावक घटना घडली. बनपुरी येथील प्रभावती रामचंद्र गुरव यांचे मंगळवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास हृदयविकाराच्या धक्याने निधन झाले. त्यांना बुधवारी सकाळी 8 वाजता अग्नी देण्यात आला.

त्यानंतर केवळ दोन तासाने बुधवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पती रामचंद्र अनंत गुरव (वय- 82) यांचेही निधन झाले. रामचंद्र गुरव यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी सुना, नातवंडे असा परिवार आहे.

पंचायत समितीचे माजी उपसभापती नाना पुजारी, रोहतक (हरियाणा) येथील गलाई व्यवसायीक रघुनाथ पुजारी, दिलीपशेठ पुजारी यांचे ते वडील होत. दिवंगत गुरव पती-पत्नी दोघेही वारकरी सांप्रदाय व धार्मिक कार्यात सक्रीय होते. दोघांनाही एकादशी दिवशीच मृत्यू आल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

 पाण्याच्या वेळा स्मार्ट डिजिटल बोर्डवर जाहीर करण्याची मागणी 

Water supply
Water supply

औरंगाबाद | स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मनपाने शहरात 50 डिजिटल बोर्ड लावलेले आहेत. या स्मार्ट डिजिटल बोर्डवर पाण्याच्या वेळा जाहीर करा अशी मागणी शहरवासीयांकडून केली जात आहे. त्यामुळे नागरिकांची पाणीपुरवठा बाबत होणारी गैरसोय कमी होईल.

पैठण येथील जायकवाडी धरणातुन हा पाणीपुरवठा शहराला होत असतो. या धरणात मुबलक पाणीसाठा असूनही पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा केला जातो. त्याचबरोबर पाण्याच्या वेळाही निश्चित नसल्यामुळे नागरिक आणि महिलांची गैरसोय होत असल्याने शहरातील डिजीटल बोर्डवर महापालिकेने पाण्याची वेळ जाहीर करावी अशी मागणी शहरवासीयांना कडून होत आहे.

शहर परिवर्तन आघाडीच्या वतीने राहुल इंगळे, सत्यप्रकाश राठोड, विजय सुरसे यांच्यातर्फे
मनपा प्रशासनाकडे याप्रकरणी निवेदन देण्यात आले आहे.

उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है; फडणवीसांच्या ट्विटने लक्ष वेधले

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | टोकियो ओलीम्पिक स्पर्धेत भालाफेक मध्ये भारतीय खेळाडू नीरज चोप्राने इतिहास रचत सुवर्णपदक मिळवले. यंदाच्या ओलीम्पिक मधील भारताला मिळालेल हे पहिले सुवर्णपदक ठरलं. नीरजने तब्बल 87.58 मीटर लांब भाला फेकला.नीरजच्या य दमदार यशा नंतर देशभरातून त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव होत असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत निरजचे कौतुक केले आहे.

फडणवीसांनी ट्विट करत म्हंटल की, “ये भाला तो वीर शिवा का और रणभेदी राणा का है, भारत माँ का सपूत नीरज बेटा तो हरियाणा का है। आज तिरंगा ऊँचा चढ़ते देख सीना चौड़ा है, और राष्ट्रगान की धुन पर अपना लहू रगों में दौड़ा है। याद करें जिस युद्धने बरसों गहरा घाव छोड़ा है, उसी पानीपत के छोरे ने आज इतिहास को मोड़ा है ”

दरम्यान अभिनव बिंद्रा नंतर भारताला सुवर्णपदक मिळवून देणारा नीरज चोप्रा हा दुसरा खेळाडू ठरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः कॉल करून नीरजचे अभिनंदन केले. तसेच हरियाणा सरकार कडून नीरज चोप्रा यांना 6 कोटी बक्षीस आणि क्लास 1 नोकरीही जाहीर करण्यात आली आहे.

राहुल गांधी ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात, तो पक्ष संपतो; राऊत-गांधी भेटीवर राणेंचा हल्लाबोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे खासदार संजय राऊत व काँग्रेसनेते राहुल गांधी यांनी भेट झाली होती. यावेळी दोघांच्यामध्ये राजकीय चर्चाही झाली. यावरून आता भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी निशाणा साधला आहे. काँग्रेस पक्षाबाबत बसुल्ताना राणे यांनी म्हंटल आहे की, काँग्रेस , शिवसेना हा पक्ष आता संपत चालला आहे. यातील राहुल गांधी यांच्याबाबत सांगायचे झाले तर ते ज्यांच्या खांद्यावर हात ठेवतात तो पक्ष राहत नाही.”

केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी दिल्लीत माध्यमांशी आज संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही हल्लाबोल केला. यावेळी ते म्हणाले की, मुख्यमंत्री ठाकरे यांनी केलेली दहा हजाराची मदत हि लोकांनी पिंपात टाकलेत भिजत. ते लवकर उद्धव ठाकरे यांच्या नावाने वर येतील. राहुल गांधी व संजय राऊत यांच्या भेटीबाबत राणे म्हणाले की, जेव्हा जेव्हा ते कुणाच्या खांद्यावर हात ठेवतात. तो पक्ष रसातळाला जातो. हा इतिहास आहे.

यावेळी प्रदेशाध्यक्ष, पक्षाध्यक्ष बदलण्याबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रेसवरही निशाणा साधला. काँग्रेसला गेल्या वर्षभरापासून राष्ट्रीय अध्यक्ष ठरवता आलेला नाही, अशी टीका यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.

मराठवाड्यात खांदेपालट; विभागातून 26 जणांच्या बदल्या

vibhagiy ayukt karyalay
vibhagiy ayukt karyalay

औरंगाबाद | शासनाने मराठवाडा विभागात उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदार पदावर कार्यरत असणाऱ्या 26 अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश शुक्रवारी रात्री काढण्यात आले आहे. याच औरंगाबाद निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर अंबड येथील उपविभागीय अधिकारी शशिकांत हदगल यांची शासनाने बदली केली. या पदावरील संजीव जाधवर यांची बदली पालघर येथे उपजिल्हाधिकारी पदावर झाली आहे.

उपजिल्हाधिकारी रिता मैत्रे वार यांची बदली विशेष भूसंपादन अधिकारी औरंगाबाद या पदावर तर सरिता सुत्रावे यांची बदली उपजिल्हाधिकारी लातूर येथे झाली. विभागात 16 उपजिल्हाधिकारी यांच्या तर 11 तहसीलदारांच्या बदल्या झाल्या आहेत. येथील सहाय्यक पुरवठा अधिकारी दत्ता भारस्कर यांची बदली वडवणी येथे तहसीलदार पदी झाली. तहसीलदार अनिता भालेराव यांची बदली बीड पुरवठा अधिकारी पदावर झाली. रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापक विद्या मुंडे यांची सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी हिंगोली या पदावर बदली झाली आहे.

तहसीलदार आम्रपाली कासोदेकर यांची बदली उपप्रबंधक औरंगाबाद पदावर झाली. तहसीलदार प्रणाली तायडे यांची महसूल प्रबोधिनी येथे तसेच चंद्रकांत सूर्यवंशी यांनाही हिंगोली निवासी उपजिल्हाधिकारी या पदावर मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढच्या आठवड्यात पुन्हा बदल्या होणार असून त्या विनंतीनुसार होणार आहेत.

राहुल गांधी पीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेल्यावर भाजप पुढाऱ्यांना संताप का यावा; राऊतांचा रोखठोक सवाल

rahul gandhi sanjay raut

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | दिल्लीत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाला. तिला नंतर मारून टाकले. राहुल गांधी त्या मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेले. तेव्हा भाजपने विचारले, ‘काँग्रेसशासित राज्यांत बलात्कार होत नाहीत काय?’ बलात्कारांना राजकीय पक्ष निर्माण झाले. हे प्रथमच घडत आहे, अशी टाका करत बलात्कार, महिला अत्याचारास तरी जात, धर्म आणि राजकीय पक्ष नसावेत, अशी अपेक्षा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक या सदरातून व्यक्त केली आहे.

राजधानी दिल्लीजवळ असलेल्या नांगलराय परिसरात नऊ वर्षांच्या मुलीवर बलात्कार आणि हत्या करण्यात आली. दिल्ली हा केंद्रशासित प्रदेश आहे व येथील कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी केंद्रीय गृहमंत्रालयाची आहे. पण ही जबाबदारी घ्यायला भारतीय जनता पक्ष तयार नाही. काही वर्षांपूर्वी दिल्लीत ‘निर्भया कांड’ झाले. एका तरुण मुलीवर बसमध्ये बलात्कार करून तिला फेकण्यात आले. तेव्हा भारतीय जनता पक्षाने दिल्लीसह देशभरात महिलांवरील अत्याचाराबाबत त्यावेळच्या मनमोहन सिंग सरकारला जबाबदार ठरवले. दिल्लीचे रस्ते जाम केले व संसदेचे काम चालू दिले नाही असा इतिहास राऊतांनी दाखवला.

आज नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या करण्यात आली. राहुल गांधींसह अनेक नेते पीडितेच्या माता-पित्याच्या सांत्वनासाठी भेटायला नांगलरायला जात आहेत. भाजपला हे सर्व पटत नाही व ढोंग वाटते. भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा हे तर सगळयांच्याच दोन पावले पुढे गेले. ‘कांग्रेसशासित राज्यांत बलात्कार होत नाहीत काय?’ असा उलट प्रश्न त्यांनी केला. राजस्थान, पंजाब, छत्तीसगढ़ या राज्यांतील अशा घटनांची आकडेवारी त्यांनी जाहीर केली. काँग्रेसशासित राज्यांत महिलांवरील अत्याचार वाढले म्हणून भाजप राज्यात असे गुन्हे माफ करावे, त्याकडे दुर्लक्ष करावे असे कोणाला वाटत असेल आणि ते राज्यकर्ते म्हणून बसले असतील तर त्यांना कसलेच गांभीर्य उरलेले नाही, असेच म्हणायला हवे.अशी टीका शिवसेनेने केली.

श्री. राहुल गांधी हे त्या बलात्कारपीडित मुलींच्या नातेवाईकांना भेटायला गेले याचा संताप भाजप पुढारयांना का यावा? श्री. राहुल गांधी हे दिल्लीतील बलात्कारपीडित मुलीच्या नातेवाईकांना भेटायला गेले. त्या मुलीची अभागी माता राहुल गांधी यांच्या छातीवर डोके ठेवून आक्रोश करीत असल्याचे चित्र दिल्लीतील मीडियाने ठळकपणे छापले. हे छायाचित्र गांधी यांनी त्यांच्या ‘ट्विटर’वर प्रसिद्ध केले. आता राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने या छायाचित्रालाच आक्षेप घेतला. आयोगाने ट्विटर इंडियाला पत्र लिहिले व राहुल गांधींचा हा फोटो हटविण्याच्या सूचना केल्या. विरोधी पक्षाचा एक प्रमुख नेता नऊ वर्षांच्या बलात्कारपीडित मुलीच्या कुटुंबास भेटतो. त्यानंतर आपल्या भावना व्यक्त करतो. यात आक्षेप घेण्यासारखे काय आहे?

राहुल गांधी हे बलात्कारपीडितेच्या कुटुंबांना भेटले तो फोटो ट्विटरवरून हटवा, अशी मागणी राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने केली. मग बलात्कारपीडित निर्भयाच्या माता-पित्यांना तेव्हा नरेंद्र मोदीही भेटलेच होते. त्या फ़ोटोला राष्ट्रीय महिला आयोगाने आक्षेप घेतल्याचे दिसत नाही. हे असे आणखी किती काळ चालायचे? बलात्कार, महिला अत्याचारास तरी जात, धर्म आणि राजकीय पक्ष नसावेत! अशी अपेक्षा शिवसेनेने केली.

“नवे विद्युत विधेयक देशाच्या हिताचे नाही”- संजय राऊत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । वाढत्या वीजबिलांबाबत केंद्र सरकारकडून तोडगा काढण्याची मागणी केली जात आहे. अशात नवीन विदुत विधेयक तयार केले जात असल्याने याबाबत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शंका उपस्थिती केली आहे. तयार करण्यात येत असलेले नवे विधेयक हे देशाच्या हिताचे नसून त्याचा सर्वाधिक फटका हा महाराष्ट्रातील वीजवितरणला बसेल, असे राऊत यांनी म्हंटले आहे.

आता केंद्र सरकारकडून नवीन विदुत विधेयक तयार करण्यात आले असून या विधेयकाबाबत शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, विद्युत विधेयकावर चर्चा झाली आहे. राज्यातील बरेच लोक दिल्लीत येऊन बसलेत. अचानक बील घेऊन येत आहेत. महाराष्ट्र राज्यात एमएसईबीला याचा फटका बसेल. स्टेट इलेक्ट्रिक कंपन्यांसाठी ही बीलं धोकादायक ठरतील. हे बील देशाच्या हितासाठी नसून वीज कंपन्यांसाठी धोक्याची घंटा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन यावर बोलायला हवे.”

महाराष्ट्रातील वाढत्या वीजबिलाचा प्रश्न अजूनही तसचे. अचानक वीजबिले वाढून आले कि, नागरिकांतून संताप व्यक्त केला जातोय. अशात आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागात तात्काळ वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे विजेचे पोळ, तारा तुटून खाली डोळ्या होत्या. त्याचा मोठ्या प्रमाणात तोटा वीज वितरण कंपनीला सहन करावा लागला. त्यात नुकसानग्रस्त भागात वीज वसुली न करण्याचे आदेश ऊर्जामंत्री यांनी दिले आहेत.

दिलासादायक ! सात हजार कोरोना चाचण्या; परंतु एकही पॉझिटिव्ह नाही

corona antijen test

औरंगाबाद | शहरात कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. परंतु कोरोनाची तिसरी लाट ऑगस्टमध्ये येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यानुसार महापालिकेने शहराच्या सहा एंट्री पॉईंट वर कोरोना चाचण्या वाढवल्या असून तिसऱ्या लाटेत त्रुटी नको म्हणून प्रशासनाकडून तयारी आणि काळजी घेतली जात आहे. गेल्या पाच दिवसापासून 7 हजार 86 जणांच्या चाचण्या झाल्या आहेत आणि यामधून एकही रुग्ण पॉझिटिव्ह आला नाही यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळत आहे.

गेल्या महिनाभरापासून दहा ते पंधरा नागरिक पॉझिटिव्ह आढळून येत होते. त्यामुळे सरकारी खाजगी आणि महापालिकेने सुरू केलेले आरोग्य केंद्र बंद पडले होते. त्याचबरोबर ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तिसरी लाट येऊ शकते अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढले असून दररोज सरासरी दीड हजार जणांची कोरोना चाचणी केली जाते. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह येणाऱ्यांचे प्रमाण आता शून्यावर गेले आहे. यामुळे तिसरी लाट शहरापासून अजूनही दूर असल्याचे चित्र दिसत आहे.

मंगळवारी 1 हजार 349 बुधवारी 1 हजार 533 गुरुवारी 1 हजार 565 शुक्रवारी 1 हजार 405 शनिवारी 1 हजार 234 एवढ्या चाचण्या पाच दिवसात करण्यात आल्या. शनिवारी चिकलठाणा येथे 275, हर्सूल टी पॉइंट वर 152, कांचनवाडी येथे 231, झाल्टा फाटा येथे 190, नगर नाका येथे 142, दौलताबाद टी पॉइंट 244 जणांची चाचणी करण्यात आली. गेल्या पाच दिवसांमध्ये 7 हजार 86 चाचण्या करण्यात आल्या असून एकही कोरूना पॉझिटिव्ह आढळला नाही.

एकनाथ खडसे बॉम्बे रुग्णालयात; प्रकृती स्थिर

Eknath Khadase

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर सध्या बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठवडाभरापासून ते बॉम्बे रुग्णालयात उपचार घेत आहेत. मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे एकनाथ खडसे यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. सध्या एकनाथ खडसे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

खरंतर, गेल्या अनेक दिवसांपासून एकनाथ खडसे आणि त्यांचे कुटुंबीय हे सक्तवसुली संचालनालयाच्या रडारावर आहेत. एकनाथ खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांना जुलै महिन्यात ईडीने ताब्यात घेतले होते. बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात गिरीश चौधरी यांना अटक करण्यात आली आहे. तर एकनाथ खडसे हेदेखील ‘ईडी’च्या चौकशीला सामोरे गेले होते.

एकनाथ खडसे यांच्यावरील जमीन खरेदी प्रकरणात झालेल्या आरोपांची चौकशी करणाऱ्या न्या. झोटिंग समितीने ३० जून २०१७ रोजी गोपनीय अहवाल शासनाकडे सादर केला होता. भोसरी एमआयडीसीतील जमीन खरेदी प्रकरणात आरोप झाल्यानंतर एकनाथ खडसे यांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २३ जून २०१६ रोजी न्या. झोटिंग यांच्या नेतृत्वाखाली एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन केली होती. समितीचे कामकाज ३ मे २०१७ पर्यंत चाललं. त्यानंतर ३० जून रोजी समितीने सरकारला गोपनीय अहवाल सादर केला होता.