Thursday, December 18, 2025
Home Blog Page 5255

‘कोरोनाच्या जागतिक संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांत संयुक्त राष्ट्र कुठंय?’; पंतप्रधान मोदींचा जाहीर सवाल

नवी दिल्ली । भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संयुक्त राष्ट्र महासभेला हजेरी लावत उपस्थितांना संबोधित केलं. ‘कोरोना संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांत संयुक्त राष्ट्र कुठंय?’ असा जाहीर प्रश्न पंतप्रधान मोदींनी यावेळी उपस्थित केला. कोरोना महामारीला तोंड देताना आज सगळं विश्वच गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून एका वेगळ्या अनुभवाला सामोरं जातंय. आज आपल्याला सर्वांनाच गंभीर आत्ममंथनाची गरज आहे असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं.

या कठिण समयी एका प्रभावशाली रिस्पॉन्स टीमची गरज होती. मात्र, ‘या जागतिक संकटाशी लढा देण्याच्या प्रयत्नांत संयुक्त राष्ट्र कुठंय?’ असा प्रश्नही पंतप्रधान मोदींनी यावेळी विचारलाय. संयुक्त राष्ट्राच्या प्रतिक्रियांमध्ये बदल, व्यवस्थांत बदल, स्वरुपात बदल ही वेळेची मागणी आहे, असंही पंतप्रधान मोदींनी यावेळी म्हटलं.

भारताला ‘डिसिजन मेकिंग स्ट्रक्चर’पासून कधीपर्यंत दूर ठेवाल?
संयुक्त राष्ट्रात बदलाची जी प्रक्रिया सुरू आहे, ती पूर्ण होण्याची भारतीय जनता दीर्घकाळापासून वाट पाहत आहे. ही प्रक्रिया कधी तरी लॉजिकल एन्डला पोहचेल का? या चिंतेत भारतीय आहेत. भारताला संयुक्त राष्ट्राच्या ‘डिसिजन मेकिंग स्ट्रक्चर’पासून कधीपर्यंत दूर ठेवलं जाणार आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश, एक असा देश जिथं विश्वातील १८ टक्क्यांहून अधिक जनता राहते, एक असा देश जिथं शेकडो भाषा, अनेक पंथ, अनेक विचारधारा आहेत. ज्या देशानं कित्येक वर्ष जागतिक अर्थव्यवस्थेचं नेतृत्व करणं तसंच अनेक वर्षांची गुलामी अनुभवलीय. ज्या देशात होणाऱ्या बदलांचा प्रभाव जगातील मोठ्या भागावर पडतो. त्या देशाला अखेर कधीपर्यंत वाट पाहावी लागणार आहे, असा प्रश्नही यावेळी पंतप्रधानांनी विचारला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

फडणवीस-राऊत यांची हॉटेलात गुपचूप भेट; राज्यात पुन्हा राजकीय भूंकप?

मुंबई । राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल अशी टीका विरोधकांकडून वारंवार केली जात आहे. अशातच राज्यातील राजकारण पुन्हा फिरणार असल्याचं संकेत वर्तवण्यात येत आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आज मुंबईत भेट घेतली. फडणवीस आणि संजय राऊत यांच्या भेटीमुळं राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याच्या शक्यता वर्तवली जात आहे. ही गुप्त भेट होती असं म्हटलं जातं आहे. या भेटीचे तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील ग्रँड ह्यात हॉटेलमध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आहे. या बैठकीसाठी अत्यंत गुप्तता पाळण्यात आली होती. दोन्ही पक्षातील कुणालाही या बैठकीची कल्पना देण्यात आली नव्हती. त्यांच्यात तब्बल अडीच ते तीन तास चर्चा झाली आहे. या चर्चेचा तपशील मिळू शकला नसला तरी राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारी ही भेट असेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्यावर पातळी सोडून टीका केली. शिवसेनेसोबत आम्ही फक्त राजकीय दृष्ट्या वेगळे झालेलो नाही तर मनानेही वेगळे झालो आहोत. त्यामुळे इतक्या सहजासहजी सत्तेसाठी ही बैठक असेल असं वाटत नाही असं सांगत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सदर बैठक झाल्याच्या वृत्ताला पुष्टी दिली. याशिवाय भाजपाच्या कोणत्याही कार्यकर्त्याला हे वाटणार नाही. शिवसेनेबाबत जाऊन सत्ता आणावी असं आम्हाला वाटत नाही असंही सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणात कधीही काहीही घडू शकतं आम्ही कोणतीही गोष्ट नाकारत नाही अशी सूचक प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.

काही दिवसांपूर्वी संजय राऊत यांनी एक ट्विट केलं होतं. या ट्विटमुळं शिवसेना- भाजपमधले बिघडलेले संबंध पुन्हा प्रस्थापित होत असल्याची चर्चा आहे. तसंच, विधानसभा निवडणूकीच्या निकालानंतर शिवसेना आणि भाजपमधील ताणले गेलेले संबंध पुन्हा सुरळीत करण्यासाठी या भेटीचं आयोजन करण्यात आलं होतं का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.

गेल्या काही काळांत भाजपने शिवसेना आणि महाविकास आघाडीला अनेक मुद्द्यावरून घेरलं होतं. करोनाची राज्यातील स्थिती, सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण असो किंवा कंगना आणि शिवसेनेतील संघर्ष असो अशा विविध मुद्द्यांवरून भाजपने महाविकास आघाडीला लक्ष्य केलं होतं. या आरोप- प्रत्यारोपांमुळं एकेकाळी मित्र पक्ष असलेल्या शिवसेना- भाजपमध्ये कटुता निर्माण झाली होती. हीच कटुता दूर करण्यासाठी ही भेट असल्याचं, सूत्रांकडून कळतंय.

महाराष्ट्राच्या राजकारणात २०१९ मध्ये विधानसभा निवडणूक झाल्यानंतर जो निकाल आला खरंतर महायुतीच्या बाजूने आला होता. मात्र मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना आणि भाजपा यांच्यात वाद रंगला आणि शिवसेनेने फारकत घेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाणं पसंत केलं. तसंच तीन पक्षांची मिळून महाविकास आघाडी स्थापन झाली. ज्यानंतर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. महाविकास आघाडीच्या प्रयोगानंतर भाजपा आणि शिवसेना यांच्यात विस्तव जात नव्हता. या सगळ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत घेतलेली भेट ही सूचक मानली जाते आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीत स्थान दिल्यानंतर पंकजा मुंडे म्हणाल्या….

मुंबई । भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत सचिव म्हणून स्थान मिळाल्याबद्दल भाजपच्या नेत्या व माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त करत केंद्रीय नेत्यांचे आभार मानत ‘हा माझा सन्मान आहे,’ असल्याचे ट्वीट त्यांनी केलं आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची घोषणा केली. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातून पाच नेत्यांना स्थान देण्यात आलं आहे. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर, विजया रहाटकर यांना सचिवपदाची तर, हीना गावित यांना प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पक्षाने दिलेल्या नव्या जबाबदारीबद्दल पंकजा मुंडे यांनी ट्विटरच्या माध्यमातून आनंद व्यक्त केला आहे. आपल्यावर विश्वास दाखवल्यावर पंकजा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह सर्व केंद्रीय नेत्यांचे आभार मानले आहेत. तसंच, आपल्या टीममध्ये सहभागी करून घेतल्याबद्दल नड्डा यांचेही आभार मानले आहेत.

गेल्या वर्षी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून पंकजा मुंडे यांना कोणती जबाबदारी मिळणार याची सतत चर्चा होती. त्या नाराज असल्याचंही बोललं जात होतं. विधान परिषदेवर संधी देऊन त्यांची नाराजी दूर केली जाईल, अशी चर्चा होती. मात्र, तसं झालं नाही. पक्षानं नव्या चेहऱ्यांना संधी दिली. त्याचवेळी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पंकजा मुंडे यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्याचा पक्षाचा विचार असल्याचं सुतोवाच केलं होतं. त्यानुसार त्यांना ही संधी मिळाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

शेतीसोबत ‘हे’ जोडधंदे केले तर कमावता येतील लाखो रुपये 

side business with agriculture

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। भारत हा कृषिप्रधान देश आहे. देशातील बहुतांश लोक शेती व्यवसाय करतात. पण विविध अडचणींमुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. बदलत्या काळानुसार आता आधुनिक शेतीमध्ये हळूहळू काही शेतकरी चांगला नफा कमावताना दिसत आहेत. मात्र आजही बहुतेक शेतकऱ्यांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागतेच अशा शेतकऱ्यांनी जर शेतीसोबत काही जोडधंदे केले तर त्यांना नक्कीच चांगले उत्पन्न मिळू शकेल. त्याबद्दलच आज जाणून घेऊया. शेतीशी निगडीत असलेले व्यवसाय यात डेअरी व्यवसाय, शेळीपालन, पोल्ट्री, मत्स्य पालन, मेढींपालन, असे जोडव्यवसाय करून शेतकरी त्यांचे वार्षिक उत्पन्न दुपट करू शकतात.

डेअरी व्यवसाय –  डेअरी व्यवसाय सर्वाेत्तम आणि आयुष्यभर चालणारा व्यवसाय आहे. डेअरीमधून शेतकरी चांगला नफा कमवू शकतो. व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांकडे जर जास्त जनावरे असतील तर त्याला त्यातून जास्त उत्पन्न मिळू शकते. कमी भांडवलातही हा व्यवसाय करता येतो. यासोबत विविध डेअरी उत्पादने बनवूनही विकता येऊ शकतात.

मत्स्य पालन – शेतीसाठी पाण्याची आवश्यकता असते. यामुळे अनेक शेतकरी शेततळे तयार करत आहेत. जर त्याच तळात मत्स्य शेती केली तर शेतकऱ्यांना चांगला फायदा होऊ शकतो. कमी जागा असली तरीही हा व्यवसाय करता येतो. साधारणता १ एकराच्या शेततळ्यात मत्स्य शेती केली तर ९ ते १० लाख रूपये कमवू शकतात. विशेष म्हणजे या शेतीसाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. आपण त्याच्या मार्फत हा व्यवसाय सुरू करु शकता.

शेळीपालन – कमी खर्चात जास्त नफा देणारा हा व्यवसाय आहे. यासाठी जास्त मंजूराचीही आवश्यकता भासत नाही. यासाठी तुमच्याकडे थोडी जरी शेती असेल तरी चालते. कोणत्याही परिस्थितीमध्ये शेळ्या जगत असल्याने यात नुकसान होणे फार कमी असते. शेळीपालन करण्यासाठी जिल्हा परिषदेकडूनही अनुदान दिले जाते.

मेंढी पालन – हा शेळी पालनासारखा व्यवसाय आहे. यातून शेतकऱ्यांना चांगला फायदा होता. मेंढीची मागणी मांस आणि दुधासाठी केली जाते. तसेच मेंढीपासून मिळणारे लोकर बाजारात मोठ्या प्रमाणात विकता येते. त्याला  किंमतही चांगली मिळते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

हो! सुशांत ड्रग्स घेत होता; श्रद्धा कपूरनंतर साराने देखील दिली कबुली

मुंबई । बॉलिवूडमधील ड्रग्स प्रकरणी आज अभिनेत्री दीपिका पदुकोणसह सारा अली खानची देखील चौकशी करण्यात आली. यावेळी श्रद्धा कपूरनंतर साराने देखील सुशांत ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली आहे. सुशांतसिंह राजपूतशी केदारनाथच्या शुटींग दरम्यान जवळीक निर्माण झाली होती. सुशांत लोणावळ्याला फार्म हाऊसवर वीड ओढायचा अशी कबुली साराने दिली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सारा अली खान हिने ड्रग्ज घेतल्याचा आरोप फेटाळून लावला. कोणत्याही ड्रग्ज पेडरलला ओळखत नाही, असे चौकशी दरम्यान साराने एनसीबी अधिकाऱ्यांना सांगितले.

फेब्रुवारी २०१८ मध्ये केदारनाथ चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सुशांतसिंह राजपूतशी जवळीक निर्माण झाली, अशी सारा अली खानने कबुली दिली. चित्रपटाच्या शूटिंगनंतर ती सुशांतच्या घरी ‘कॅपरी हाऊस’ मध्ये बर्‍याच वेळा सुशांतलाही भेटायची. साराने सुशांतसोबत अनेकदा लोणावळ्याच्या फार्म हाऊसवर गेलो असल्याचेही सांगितले आहे. आपण काही काळ सिगारेट ओढली, पण कधीही ड्रग्ज घेतलेले नाही. सुशांत लोणावळ्याला फार्म हाऊसवर वीड ओढायचा, असे साराने चौकशीत सांगितले.

दरम्यान, सुशांत सिंह राजपूत ड्रग्ज घेत होता अशी कबुली श्रद्धा कपूरने दिलीय. कधी सेटवर तर कधी व्हॅनिटी व्हॅनमध्ये सुशांत ड्रग्ज घेत होता असं श्रद्धा कपूरने एनसीबीला सांगितल्याची सूत्रांची माहिती आहे. एनसीबीने श्रद्धा कपूरची कसून चौकशी केली. मात्र आपण स्वतः ड्रग्जचं सेवन करत असल्याचा आरोप श्रद्धा कपूरने फेटाळला आहे. पवना धरणात झालेल्या पार्टीची कबुलीही श्रद्धाने चौकशीत दिल्याची माहिती आहे. मात्र तिथे आपण ड्रग्ज सेवन केलं नाही असं श्रद्धाने म्हटलंय. मात्र जया साहाशी झालेल्या सीबीडी ऑईलबाबतच्या व्हॉट्सअप चॅटबाबत तिने नकार दिलाय.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

वेश्या व्यवसाय करणे हा गुन्हा नाही; प्रत्येक महिलेला व्यवसाय निवडण्याचा पूर्ण अधिकार- मुंबई हायकोर्ट

मुंबई । मुंबई उच्च न्यायालयानं आज वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन महिलांना दिलासा दिला आहे. याशिवाय वेश्या व्यवसायाशी संबंधित एक महत्वाचे विधान मुंबई उच्च न्यायालयानं यावेळी केलं आहे. अनैतिक देह व्यापार प्रतिबंध कायद्याचा मूळ उद्देश हा वेश्या व्यवसायाचं निर्मुलन करणं किंवा या व्यवसायातील महिलांना शिक्षा करणं हा नाही. कायद्यात तशी कोणतीही तरतूद नाही. व्यावसायिक हूतेनं एखाद्या व्यक्तीला जबरदस्तीनं या व्यवसायात आणणं हा शिक्षेस पात्र गुन्हा असल्याचं यावेळी हायकोर्टानं स्पष्ट केलं. वेश्या व्यवसाय करणे हा कायद्यानुसार गुन्हा नाही, तसेच प्रत्येक व्यक्तीला त्यांचा व्यवसाय निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे असंही न्यायालयानं स्पष्ट केलं.

मागील वर्षी सप्टेंबरमध्ये मुंबईच्या मालाड परिसरातील चिंचोली बंदर येथून वेश्या व्यवसाय करणाऱ्या तीन मुलींची मुंबई पोलिसांनी सुटका केली होती. त्यानंतर 20, 22 आणि 23 वर्षीय मुलींना मुंबई दंडाधिकारी कोर्टासमोर हजर करण्यात आलं. कोर्टाने या मुलींची रवानगी महिला वसतिगृहात केली व प्रोबेशन ऑफिसर कडून त्यांनी याबाबत रितसर अहवाल मागवला. मॅजिस्ट्रेट कोर्टाने या महिलांचा ताबा त्यांच्या पालकांना देण्यास नकार दिला व या महिलांना उत्तर प्रदेश येथील महिला वसतिगृहात ठेवण्याचे आदेश दिले. दरम्यान प्रोबेशन अधिकाऱ्याने यासंदर्भात अहवाल सादर केला.

कानपूर मधील विशिष्ट समाजातील मुलींना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडलं जाते तशी तेथील परंपराच असल्याचे संबंधित अधिकाऱ्यानं या अहवालात सांगितलं. त्यामुळे सुटका करत त्यांना त्यांच्या घर पाठवणं हे त्यांच्या हिताचं नाही, असं स्पष्ट करत या महिलांची मागणी फेटाळून लावण्यात आली. मॅजिस्ट्रेट कोर्टाचा निकाल दिंडोशी येथील सत्र न्यायालयाने कायम ठेवला. त्यानंतर ऍड. अशोक सरोगी यांच्यामार्फत सदर महिलांनी हायकोर्टात दाद मागितली.

न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमोर या प्रकरणी सुनावणी घेण्यात आली त्यावेळी हायकोर्टाने मॅजिस्ट्रेट आणि दिंडोशी न्यायालयाचे आदेश रद्द करत याचिकाकर्त्या महिलांना दिलासा देत वस्तीगृहातून मुक्त करण्याची त्यांची मागणी मान्य केली. न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांनी या महिलांची मागणी मान्य करत उत्तर प्रदेश येथील महिला वस्ती गृहातून त्यांची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. सदर महिला या सज्ञान असून त्यांना त्यांच्या इच्छेनुसार राहण्याचा अधिकार आहे. भारतात कुठेही त्या फिरू शकतात, एवढेच काय तर घटनेने त्यांना त्यांचा व्यवसाय निवडण्याचाही अधिकार देखील दिला आहे. असे न्यायमूर्तींनी आदेशात म्हटले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

भाजपची राष्ट्रीय पदाधिकार्‍यांची यादी जाहीर! मुंडे, तावडेंना मोठी जबाबदारी; खडसेंना डावलले

नवी दिल्ली | भाजपनं नवीन टीम तयार केली आहे. पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीत महाराष्ट्रातील चार तरुण चेहय्रांना संधी देण्यात आली आत्रा एकनाथ खडसे यांना मात्र डावललं आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. नव्या कार्यकारिणीत विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांच्यावर पक्षाने महत्त्वाची जबाबदारी दिली आहे.

एकूण 13 जणांना राष्ट्रीय सचिव म्हणून नेमण्यात आलं आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातले 4 नेते आहेत. पंकजा मुंडे, विनोद तावडे, सुनील देवधर आणि विजया रहाटकर यांची नावं या यादीत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे नाराज असल्याचं बोललं जात होतं. त्यांना विधान परिषद किंवा राज्यसभा कुठेच जागा न मिळाल्यामुळे त्या नाराज असल्याची चर्चा होती.

मात्र आता पक्ष कार्यकारिणीत मोठी जबाबदारी पंकजा यांच्याकडे देण्यात आली आहे. तर विनोद तावडेंना तिकिट नाकारल्यानंतर पहिल्यांदाच पक्षाने राष्ट्रीय सचिव म्हणून जबाबदारी दिली आहे. तसेच राष्ट्रीय प्रवक्त्यांच्या यादीत खासदार हीना गावित यांना स्थान देण्यात आलं आहे. अल्पसंख्याक मोर्चाचे नेते म्हणून जमाल सिद्दीकी यांचं देखील नाव आहे. त्यामुळे या यादीवर आता एकनाथ खडसे काय बोलणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

कोलकाता आणि हैदराबाद मध्ये होणार रोमांचक सामना ; पहिल्या विजयासाठी दोन्ही संघ उत्सुक

KKR vs SRH

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आयपीएल 2020 मधील आठवा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स {Kolkata knight Riders} आणि सनरायझर्स हैद्राबाद {Sunrisers Hydrabad} यांच्यात होणार आहे. दोन्ही संघांना त्यांच्या शेवटच्या सामन्यात हार पत्करावी लागली होती. त्यामुळे या सामन्यात विजय मिळवून स्पर्धेत आगेकूच करण्यावर दोन्ही संघांचा भर असेल.

सनरायझर्स हैदराबादला त्यांच्या मधल्या फळीतील फलंदाजी मजबूत करावी लागेल. त्याच वेळी, मिशेल मार्शच्या दुखापतीमुळे त्याला मोठा धक्का बसला असून या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होताना दिसू शकतो. हैदराबादच्या फलंदाजीची मदार जॉनी बेअरस्टो, मनीष पांडे आणि डेव्हिड वॉर्नर वर असेल. तर गोलंदाजी मध्ये त्यांच्या कडे हुमकी एक्का राशीद खान आहे.

दुसरीकडे, कोलकात्यासाठी पहिल्या सामन्यात काहीही चांगले नव्हते.मुंबई विरुद्ध त्यांना एकतर्फी पराभवाला सामोरे जावे लागले. मुंबई विरुद्धच्या सामन्यात त्यांच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडल्या होत्या.तर फलंदाजांनीही लोटांगण घातलं होत.

जाणून घेऊ कोलकाता विरुद्ध हैदराबाद सामन्यातील काही विक्रम

१) हेड टू हेड मुकाबल्यात केकेआरची टीम 10-7 ने सनरायझर्स हैदराबादच्या पुढे आहे.

२) सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकात्याच्या नितीश राणा ने सर्वाधिक 126 धावा केल्या आहेत.

३) हैदराबाद कडून डेव्हिड वॉर्नरने कोलकाता विरुद्ध सर्वाधिक 533 धावा काढल्या आहेत.

४) कुलदीप यादव आणि सुनील नारायणने एकमेकांविरुद्ध प्रत्येकी 10-10 बळी घेतले आहेत.

५) कोलकाता विरुद्ध भुवनेश्वर कुमार यशस्वी गोलंदाज असून त्याने 19 बळी घेतले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

जाणून घेऊया बटाट्याच्या सेंद्रिय शेतीबद्दल

organic farming of potato

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशात बटाट्याचे उत्पादन हे प्रामुख्याने भाजीसाठी केले जाते. याशिवाय चिप्स, फ्रेंच फ्राईज, बिस्कीट तसेच इतर काही पदार्थांसाठीही बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. पौष्टिक घटकांसाठी बटाटा अत्यंत उपयुक्त मानला जातो. यामध्ये स्टार्च, जैविक प्रथिने, सोडा, पोटॅश, जीवनसत्व अ आणि ड मोठ्या प्रमाणात मिळतात. ज्यांची मानवी शरीराला आवश्यकता असते. त्यामुळे बटाट्याची शेती तशी लाभदायकच ठरते. बटाट्याची वाढ २० अंश सेल्सियस तापमानात अधिक होते. तापमान वाढीसोबत  वाढही कमी होते. देशातील विविध भागांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रदेशात वर्षभर बटाट्याची शेती करता येते. क्षारयुक्त जमीन सोडून इतर सर्व क्षेत्रात याची शेती करता येते. त्यातही जीवांशयुक्त मातीची जमीन सर्वोत्तम मानली जाते.

बटाट्याचे अनेक प्रगत वाण आहेत. कुफरी ख्याती, कुफरी सूर्या, कुफरी पुखराज, कुफरी अशोका, चंदरमुखी, कुफरी अलंकार, जवाहर हे वाण ८० ते १०० दिवसात पिकतात. कुफरी सतलुज, कुफरी चिप्सोना- 1, कुफरी बादशाह, कुफरी बहार ,कुफरी लालिमा, कुफरी चिप्सोना- 3, कुफरी ज्योति, कुफरी चिप्सोना- 4, कुफरी सदाबहार या वाणांना पिकण्यासाठी ९० ते ११० दिवस लागतात. तर कुफरी सिंधुरी, कुफरी फ़्राईसोना आणि कुफरी बादशाह  या वाणांना पिकायला सर्वाधिक ११० ते १२० दिवस लागतात. कुफरी सतुलज (जे आई 5857), कुफरी जवाहर (जे एच- 222), 4486- ई, जे एफ- 5106 आदि. संकरित वाण आहेत तर अपटूडेट, क्रेग्स डिफाइन्स और प्रेसिडेंट हे परदेशी वाण आहेत.

बटाटे हे कंद आहे जे जमिनीच्या आत तयार होते. म्हणून माती भुसभुशीत करून घेणे गरजेचे असते. आणि पेरणीच्या वेळी माती ओलसर असावी याची काळजी घेणे गरजेचे असते. शेतकरी मका-बटाटा-गहू, मका-बटाटा-मका, भेंडी-बटाटा-कांदा, असे पीक घेऊ शकतात. वर्षभरात ३ वेळा बटाट्याचे तीनवेळा पीक घेता येउ शकते. बटाट्याचे सुरुवातीचे पीक सप्टेंबरच्या तिसऱ्या आठवड्यापासून ऑक्टोबरच्या पहिल्या आठ्वड्यापर्यंत घेता येऊ शकते. तर मुख्य पीक ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबर च्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत घेता येवू शकते. तर वसंत ऋतूतील पिक हे २५ डिसेंबर ते १० जानेवारीच्या दरम्यान घेता येते.

या शेतीत बियाणाला खूप महत्व आहे कारण उत्पादनाच्या एकूण खर्चापैकी ४०-५०% खर्च हा बियाणांवर होतो. बियाणांची मात्रा ही वाण, आकार आणि पेरणीचे अंतर तसेच जमीन यावर ठरते.  बटाट्याच्या सेंद्रिय शेतीसाठी, बीजोत्पादित आणि मातीमुळे होणारे रोग टाळण्यासाठी बीज अंकुरलेल्या आणि ट्रायकोडर्मा विरिडि प्रति १० लिटरपाण्यात  ५० ग्रॅम द्रावणानुसार 15 ते 20 मिनिटे भिजवावे. तसेच पेरणीपूर्वी सावलीत वाळवावे. परंतु ट्रायकोडर्मा क्षारीय मातीसाठी उपयुक्त नाही हे माहित असणे आवश्यक आहे. बीज पेरणी करत असताना समतल जमिनीवर पेरणी करावी, त्यानंतर त्यावर माती चढवावी तसेच वेळोवेळी सिंचन ही करावे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल करतो! संजय राऊतांचा टोला

मुंबई । बिहारमध्ये विधानसभा निवडणुकांचं बिगुल काल वाजलं आहे. बिहारमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार असल्याचं काल निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. दरम्यान, शिवसेना  खासदार संजय राऊत यांनी बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जातील, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे.  याशिवाय बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी असंही ते म्हणाले.

संजय राऊत यांनी म्हटलं की, बिहारची निवडणूक ही विकास आणि कायदा सुव्यवस्थेच्या मुद्द्यांवर लढली जावी. जर बिहार निवडणुकीत मुद्दे कमी असतील तर मुंबईहून पार्सल केले जाऊ शकतात. काल संजय राऊत यांनी बिहारमधील कोरोना संपला का असा प्रश्न विचारला होता. तसंच या निवडणुकीत सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा असावा यासाठी प्रयत्न केल्याची टीकाही त्यांनी केली होती.

काल बिहार विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतरही संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केलं होत. ते काल म्हणाले होते कि, देशाच्या राजधानीत कोरोनाच्या भीतीमुळे आम्ही संसदेचं अधिवेशन घेऊ शकत नाही आणि बिहारसारख्या राज्यात निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. बिहारमध्ये कोरोना संपला का? हे पाहावं लागेल. सरकारला, तिथल्या राज्यकर्त्यांना आणि निवडणूक आयोगाला वाटलं असेल की कोरोना संपला आणि आम्ही निवडणुका घेतोय तर त्यासंदर्भात तसं जाहीर व्हायला पाहिजे. हा सरकारने घेतलेला निर्णय आहे. निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे असं सांगितलं जाईल आणि निवडणुका रेटल्या जातील.

बिहारमधील मतदान हे पूर्णपणे जात आणि धर्मावर होतं. तिथे अनेकदा गरिबी हा सुद्धा मुद्दा नसतो. त्यांच्या सरकारविषयी सुप्त राग आहे, असंही संजय राऊत म्हणाले होते. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण हा प्रचाराचा मुद्दा असावा यासाठी केंद्र आणि बिहार सरकार मिळून त्याच्या आत्महत्येचं राजकारण केलं. जनता दल युनायटेड या पक्षाने सुशांत सिंह राजपूतचे पोस्टर प्रचारात आणले आहेत. तुमच्याकडे विकासाचा मुद्दा नाही, कामाचे मुद्दे नाही, सुशासनचा मुद्दा नाही, म्हणून मुंबईचे मुद्दे जबदस्तीने प्रचारात आणले आहेत. या सगळ्या नाट्यामध्ये पडदा ओढण्याचं काम केलं त्यांनी राजीनामा दिला ते बक्समधून निवडणूक लढत आहेत. हे सगळं आधीच ठरलं होत, त्यानुसार हे नाट्य पुढे चाललं आहे, असंही राऊत यांनी म्हटलं होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.