Thursday, December 18, 2025
Home Blog Page 5266

कोलकात्या विरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने केला ‘हा’ मोठा विक्रम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गतविजेत्या मुंबई इंडियन्सने कोलकाता नाईट रायडर्सवर 49 धावांनी मात करत आयपीएलच्या तेराव्या हंगामातील आपला पहिला विजय साजरा केला. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मानं 6 षटकारांसह 80 धावांची जबरदस्त खेळी केली. रोहितनं आयपीएल कारकीर्दीत 200 षटकार ठोकण्याचा पराक्रम गाजवला. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा तो आजवरचा चौथा फलंदाज ठरला. याआधी ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स आणि महेंद्रसिंग धोनीनं आयपीएलमध्ये 200 पेक्षा जास्त षटकार ठोकले आहेत.

सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत अव्वल क्रमांकावर क्रमांक लागतो तो ख्रिस गेलचा. गेलने 326 षटकार लगावले आहेत. त्यानंतर एबी डिव्हिलियर्स 214 षटकारांसह दुसऱ्या क्रमांकावर तर एमएस धोनी 212 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. आता रोहित शर्मा 201 षटकारांसह चौथ्या स्थानी आहे.

कोलकाता विरुद्ध रोहित शर्मा पुन्हा एकदा त्याच्या आक्रमक मूड मध्ये दिसला.रोहितने 6 षटकारांसह 80 धावांची जबरदस्त खेळी केली. रोहितच्या खेळीने मुंबईला मोठी धावसंख्या उभारण्यात मदत झाली.तसेच आयपीएल मधील पहिला विजय मिळवून मुंबईने आपली घोडदौड सुरू केली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

शर्तभंग प्रकरणी पुरोहित नमस्तेचा करार रद्द करावा ; आॅल इंडिया पँथर सेनेचा पाचगणी नगरपालिकेसमोर घंटानाद

सातारा प्रतिनिधी | पाचगणीच्या उच्चभ्रु शाॅपिंग सेंटरमधील पुरोहीत नमस्ते या भाडेपट्टा गाळ्यात भाडेपट्ट्याचा शर्तभंग करत करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करुन “पुरोहीत नमस्ते” च्या मालकाचा भाडेपट्टा करार रद्द व्हावा या मागणीसाठी पाचगणी नगरपालिकेसमोर “आॅल इंडीया पॅन्थर सेनेच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन करत पाचगणी नगरपालिकेचा परिसर दणाणून सोडला.

धनदांडग्यांवर कारवाई झाली पाहिजे, मुख्याधिकारी होश मे आओ, पुरोहीत नमस्तेचा भाडेपट्टा करार रद्द करा अशा गगनभेदी घोषणा यावेळी देण्यात आल्या. पाचगणी या इंग्रजांनी शोधलेल्या शहरामध्ये बहुतांशी मालमत्ता या भाडेपट्ट्यावर आहेत. या ठिकाणी पुरोहित नमस्तेच्या मालकांनी बेकायदेशीररित्या अंतर्गत डागडुजीचे काम केले आहे.

पाचगणीतील नगरपालिका हद्दीमध्ये फायनल प्लाॅट नंबर १८० व फायनल प्लाॅट नंबर १८२ या भाडेपट्टा भुखंडावर पाचगणी नगरपालिकेने सन १९८८ ला वाणिज्य संकुल मंजूर करुन घेतले आहे. या वाणिज्य संकुलातील दुकान गाळ्याची लांबी आणि रुंदी ठरवून दिली आहे. नगररचना विभाग पुणे व सातारा यांनी परवानगी देताना गाळ्यामध्ये कोणताही बदल करु नये अशी अट भाडेकरूंना घातली आहे. मात्र पाचगणीत भाडेपट्टा वाणिज्य संकुलातील धारकच मालक झाले आहेत. प्रशासनाचा वचक राहीला नसल्याने राजकीय दबाव व नगरपालिकेतील अधिकारी हाताशी धरत पाचगणीतील भाडेपट्टा शाॅपिंग सेंटरमध्ये अनागोंदी कारभार सुरु आहे.

पँथर सेनेने याविषयी आवाज उठवत घंटानाद आंदोलन केलं. यावेळी पाचगणी पोलिसांकडून यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

आहारात ‘किवी’ फळाच्या सेवनाने होतात जबरदस्त फायदे …

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपली प्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल तर अनेक फळाचा समावेश हा आपल्या आहारात करायला पाहिजे. फळांमुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. आजारी रुग्णाला किवी हे फळ खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकार शक्ती निर्माण होण्याची ताकद असते. तसेच अनेक रुग्णांच्या प्लेटलेट्स कमी झाल्या असता त्यांना या फळाच्या सेवनाने त्याच्या प्लेटलेट्स भरून काढले जाते.

या फळामध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म आहेत. हे असे फळ आहे कि, याचा उपयोग पावसाळ्यातील आजारापासून वाचवण्यासाठी उपयोग केला जातो. पावसाळ्यात अनेक रोगांचा धोका असतो. तसेच अनेक संसर्गजन्य आजार यामुळे आपले आरोग्य धोक्यात जाऊ शकते. या फळापासून शरीराला आवश्यक असणारे पोषक द्रव्य हे एकाच वेळी प्राप्त होतात. डॉक्टर सुद्धा हे फळ न चुकता खाण्याचा सल्ला पावसाळ्याच्या दिवसात देतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास या फळाचा वापर केला जातो.

किवीच्या फळांमुळे शरीरातील प्लेटलेट वाढण्यास मदत होते. या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात डेंग्यूचा आजार पसरतो. या आजारामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्या शरीरातल्या प्लेटलेट्स कमी होतात. त्यावेळी या फळाचा आहारात समावेश केल्याने मोठ्या प्रमाणात प्लेटलेट्स वाढायला सुरुवात होते.

कोवीमुळे पचन क्रिया सुधारण्यास मदत होते. किवीचा रस हा जर ज्या लोकांना अस्थमा आहे. त्या लोकांनी घेतला तर त्याचा जास्त लाभ मिळतो. अस्थमाच्या लोकांची श्वसन क्रिया सुधारण्यास मदत होते. फुफुसांमधील अन्य आजारांना सुद्धा याचा फायदा होतो.

कोवीमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते. तुमची रोगप्रतिकार शक्ती उत्तम ठेवण्याचे काम हे किवीचे एक फळ करते. किवीमध्ये लोहाचे प्रमाण असते. त्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्याचे काम हे किवीचे एक फळ करते.

रक्तवाहिन्यांतील रक्त दाब कमी करण्याचे काम हे किवी करते. उच्च रक्तदाब तसेच शरीरात वाढलेले कोलेस्ट्रॉल चे प्रमाण कमी करण्याचे काम सुद्धा किवी करते.

डोळे चांगले ठेवते. या फळाचा रस जर आपला प्यालो तर त्यामुळे दृष्टी चांगली राहते. तसेच इतर जो त्रास डोळ्यांना होतो ते होण्याचे प्रमाण कमी होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

रेशनकार्डबद्दल मोठी बातमी, आता आपली माहिती अपडेट करण्यासाठी द्यावे लागणार पैसे, जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात ‘वन नेशन वन रेशन कार्ड’ ही योजना राबविण्यासाठी केंद्र सरकार सातत्याने प्रयत्न करत आहे. सध्या ही योजना देशातील 26 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये राबविण्यात आली आहे. या प्रक्रियेमध्ये लोकांना रेशनकार्डला आधारशी (Ration Card linking with Aadhar) जोडण्यास सांगण्यात आले आहे. 30 सप्टेंबर 2020 ही रेशन कार्ड आधारशी जोडण्याची शेवटची तारीख आहे. जर आपण 30 सप्टेंबरपूर्वी रेशन कार्डला आपल्या आधारशी लिंक केले नाही तर आपल्याला पुढील समस्या येऊ शकतात. यासाठी देशातील बर्‍याच राज्यांत रेशन पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेण्यासाठी बँकामध्ये फेऱ्याही माराव्या लागत आहे. उत्तराखंड सरकारने रेशनकार्डमधील नाव, पत्ता किंवा वय बदलण्यासाठी 25 रुपयांचा ड्राफ्ट तयार करणे बँकेला बंधनकारक केले आहे.

काही राज्ये रेशन पोर्टेबिलिटी सुविधेसाठी शुल्क आकारतील
उत्तराखंड सरकार आता या रेशनकार्ड पोर्टेबिलिटी सुविधेसाठी ग्राहकांकडून 10 ऐवजी 17 रुपये खर्च वसूल करेल. उत्तराखंडचा अन्न व पुरवठा विभाग आता फक्त बँक ड्राफ्टच्या माध्यमातूनच ही रेशनकार्ड पोर्टेबिलिटी सुविधा देईल. रेशन कार्डधारकांनी रेशनकार्डमधील आपले नाव, पत्ता किंवा वय बदलल्यास त्यांना 25 रुपयांचा ड्राफ्ट अनिवार्य केला आहे.

रेशन कार्ड बनविणे आणि बदल करणे ही राज्याची बाब आहे
रेशन कार्ड बनविणे हा राज्य सरकारचा विषय आहे. अनेक राज्य सरकारे यासाठी पैसे आकारतात, तर बरीच राज्य सरकारे नागरिकांना ही सेवा विनाशुल्क देत आहेत. केंद्रीय ग्राहक आणि अन्न मंत्रालयाचे याबात म्हणणे आहे की,’ रेशन कार्ड बनविणे हा राज्याचा विषय आहे. कोणते राज्य पैसे गोळा करते किंवा ते विनाशुल्क करते हे त्या त्या राज्याचे प्रकरण आहे. जोपर्यंत रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सुविधेचा प्रश्न आहे, ते रेशन कार्ड आधारशी जोडणे आणि EPOS (Electronic Point of Sale) मशीनसह इंटरनेट सेवा असणे बंधनकारक आहे. याशिवाय रेशन पोर्टेबिलिटी सुविधेचा लाभ घेऊ शकत नाही. रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सुविधा फक्त बीपीएल कार्डधारकांना उपलब्ध आहे.

देशात 24 कोटी रेशनकार्ड आहेत
देशात सुमारे 24 कोटी रेशनकार्डधारक आहेत. रेशन कार्डला आधारशी जोडण्याच्या मुदतीसाठी आता फक्त 6 दिवसच शिल्लक आहेत. रेशन कार्ड आधारशी जोडलेला नसेल तर रेशनकार्डमधून तुमचे नाव कट होईल. म्हणून शिल्लक राहिलेल्या कार्ड धारकांनी 30 सप्टेंबर 2020 पर्यंत त्यांचे रेशन कार्ड आधारशी लिंक केले पाहिजे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

‘महाराष्ट्र के लोग बहादुरी से सामना करते है’, मुख्यमंत्री ठाकरेंसोबतच्या चर्चेत पंतप्रधान मोदींचे उद्गार

 मुंबई  । देशातील वाढत्या कोरोना प्रादुर्भाव पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. देशातील ७ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या चर्चेत सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘महाराष्ट्र के लोग बहादुरीसे सामना करते है’ असे म्हटले. सोबतच कोविडचा संसर्ग जास्त असलेल्या महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यात विशेष समर्पित पथके नियुक्त करण्याची सूचना केली. याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या चष्म्याबद्दलच्या सूचनेचेही पंतप्रधान मोदी यांनी स्वागत केले.

पंतप्रधान मोदींसोबतच्या चर्चेत मुख्यमंत्री ठाकरे यांनी राज्य सरकार करीत असलेल्या महत्त्वाच्या उपाययोजनांची माहिती दिली. माझे कुटुंब, माझी जबाबदारी’सारख्या मोहिमेच्या माध्यमातून आम्ही कोविडची लढाई अधिक आक्रमकपणे लढत असून त्याचा परिणाम येणाऱ्या काळात मृत्यू दर आणि कोविड पॉझिटिव्हिटी दर कमी झालेला आपल्याला दिसेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. राज्यात सर्वत्र टेलिआयसीयू व्यवस्था उभारून ग्रामीण भागातील रुग्णांना वेळीच उपचार कसे मिळतील हे आम्ही पाहणार आहोत असेही ते म्हणाले.

कोविडनंतरदेखील रुग्णांमध्ये वैद्यकीय उपचारांची गरज असून उपचार केंद्रे सुरु करणार आहोत अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी आपल्या स्तरावरून परत एकदा देशातील नागरिकांना संबोधन करून कोरोनाचा लढा आपल्याला पुढील काळात कसा लढायचा आहे याविषयी मार्गदर्शन करावे. येणाऱ्या काळात सणवार, उत्सव येत असून कोरोना वाढू नये म्हणून आपल्यासमोर आव्हान मोठं आवाहन आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

राज्यात लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांच्या घशातून दोन द्राव घेतले जातात. रॅपिड एन्टीजेन चाचणी निगेटिव्ह आली तर दुसरा घेतलेला द्राव आरटीपीसीआर चाचणीसाठी पाठविला जातो, औषधांची उपलब्धता ठेवली आहे, दररोज दीड लाखपर्यंत चाचण्या वाढवित आहोत अशी माहिती दिली. राज्यात प्रायोगिक तत्वावर टेलिआयसीयू व्यवस्था सुरु केली असून येणाऱ्या काळात याची उपयुक्तता पाहता सर्व राज्यात ही यंत्रणा उभारून विशेषत: ग्रामीण व दुर्गम भागात शहरातील तज्ञ डॉक्टर्सचे उपचारांसाठी मार्गदर्शन घेण्याचे आम्ही ठरविले आहे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

 

 

 

 

बहुचर्चित मराठा आरक्षणाचं घोडं नेमकं कुठं अडतंय??

विचार तर कराल | मयुर डुमणे

मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा प्रश्न पेटलेला दिसून येतोय. अशावेळी मराठा आरक्षणाचा विषय समजून घेणं खूप महत्वाच ठरतं. मराठा समाजाला आरक्षण मागण्याची वेळ का आली हे पहिल्यांदा समजून घेतलं पाहिजे.

पंतप्रधान नरसिंहराव यांनी मंडल आयोगाच्या शिफारसी 1991 मध्ये लागू केल्या आणि त्यानुसार OBC घटकांना 27% आरक्षण लागू झालं. म्हणजे 1991 पासून 50% आरक्षण शिक्षणात आणि नोकरीत लागू झालं. परिणामी SC, ST, NT, OBC वर्गातील घटकांनी आरक्षणाचा लाभ घेत शैक्षणिक प्रगती साधली. मागास घटकांतील अनेकजण चांगल्या हुद्यावर आले. मात्र याची दुसरी बाजूही आपल्याला बघावी लागेल. दुसरीकडे खुल्या गटाला 50% जागा राखीव राहिल्या. या खुल्या गटातील स्पर्धेत उच्च वर्णीयांचा वाटा अधिक राहिला. त्याचबरोबर OBC व अन्य वर्गातील घटकही खुल्या वर्गातील जागा गुणवत्तेच्या जोरावर मिळवू लागला. अशा या स्पर्धेत मराठा समाजाला जाग आली आणि शिक्षणातील व सरकारी नोकरीतील आपला टक्का घसरत चाललाय याची जाणीव झाली. हे एक कारण झालं. दुसरं कारण आहे शेतीची दुर्दशा. राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मराठा समाजातील शेतकऱ्यांचा वाटा अधिक आहे. सातत्याने पडणाऱ्या दुष्काळामुळे, हवामान बदलामुळे शेतीची अवस्था खूप वाईट झाली. अल्पभूधारक मराठा शेतकरी कर्जबाजारी झाला. आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाल्याने मुलांच्या उच्च शिक्षणासाठी अडचणी येऊ लागल्या. मुलीचे लग्न मराठा जातीच्या स्टेटसला शोभेल असं करता येईना. खाऊजा धोरण स्वीकारल्यानंतर बदलत्या अर्थव्यवस्थेच्या स्पर्धेत टिकून राहणं शेतकऱ्यांना अशक्य झालं. शेती व्यवसायाकडे नकारात्मकपणे पाहिले जाऊ लागलं. शेतीपेक्षा नोकरी केलेली कधीही चांगली हा समज दृढ होत गेला. तिसरं कारण आहे वाढती बेरोजगारी. एक काळ होतो ज्यावेळेस इंजिनिअरिंग केल्यावर चांगली नोकरी मिळायची पण तो काळ हळूहळू लुप्त झाला. खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या घटल्या. BA,Bsc, इंजिनिअरिंग च्या डिगऱ्या नोकरी मिळवून देण्यास असमर्थ ठरल्या. राज्यातील बहुतांश बेरोजगार वर्ग स्पर्धा परीक्षेची तयारी करू लागला. अधिकारी होणं हेच अनेकांच ध्येय झालं. स्पर्धा अधिक तीव्र झाली. पण सुरवातीला मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या जागा हळूहळू कमी होऊ लागल्या. जागा कमी होत गेल्यामुळे मराठा तरुणांना सहजासहजी अधिकारी होणं अशक्य झालं. मागास वर्गामध्येही नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा कठीण झाली. आरक्षण नसल्यामुळेच आपल्याला नोकरी मिळत नाही, फीमध्ये सवलत मिळत नाही ही भावना मराठा तरुणाईमध्ये प्रबळ झाली. मागास जातींना आरक्षण मिळत असल्यामुळे आपल्याला संधी मिळत नाही ही मांडणी दिशाभूल करणारी असली तरी बेरोजगारीच्या असंतोषात अनेकांना पटणारी आहे. यातूनच मग मराठा आरक्षणाच्या मागणीचा उदय झाला. प्रश्न आहे वाढत्या बेरोजगारीचा, शेतीच्या दुर्दशेचा, शिक्षणाच्या बाजारीकरणाचा, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेचा पण आला आरक्षणावर.

मराठा आरक्षणाची मागणी करण्यात आली खरी पण मराठ्यांना आरक्षण कोणत्या निकषावर द्यायचं हा प्रश्न निर्माण झाला कारण मराठा समाजातील एक वर्ग आर्थिकदृष्ट्या मागास असला तरी सामाजिक दृष्ट्या मागास नाही. आरक्षण मिळवायचे असेल तर मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागेल. यासाठी मागासवर्गीय आयोग नेमण्यात आले. आयोगाने मराठा समाजाला मागास ठरवून देखील अडचणी काही कमी होणार नव्हत्या. कारण मराठा आरक्षणामुळे सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेली 50% ची मर्यादा क्रॉस होणार आहे. अपवादात्मक परिस्थितीत तमिळनाडू राज्याला ही मर्यादा क्रॉस करता आली पण मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. पण समजा सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती उठवली आणि पुढे चालून घटनात्मक पिठानेही मराठा आरक्षणाला मान्यता दिली तरी प्रश्न कमी होणारे नाहीत. हरियाणातील जाट, गुजरातमधील पाटीदार समाजही आरक्षणाची मागणी करू लागेल.

कुटुंबशाही – बहुसंख्य मराठा जनतेच्या मतांवर काही मराठा कुटुंबांनी सत्ता उपभोगली. तिकिटांच वाटप आपल्याच नातेवाईकात केलं. पत्नीला अध्यक्ष केलं, पोराला आमदार केलं पण ज्या बहुसंख्य मराठा मतदारांवर हे आमदार,खासदार निवडून आले त्यांच्या समस्येकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष केलं. सहकारी बँका, कारखाने यावर आपलं वर्चस्व मिळवलं आणि मतदारसंघ कसा शाबूत ठेवता येईल यासाठी प्रयत्न केले. मराठा कार्यकर्त्यांनीही याच घराणेशाहीची हुजरेगिरी केली. बहुसंख्य मराठा मतदारांच्या जीवावर वर्षानुवर्षे निवडून येणारा प्रतिनिधी मात्र त्यांच्याच समस्येकडे दुर्लक्ष करणारा आमदार आता मराठा आरक्षणाच्या बाजूने उभा राहतोय.

मराठा समाजातील वर्ग – राज्यात मराठा समाज बहुसंख्य असल्यामुळे शिक्षण, सहकार, राजकारण अशा क्षेत्रात मराठा जातीच वर्चस्व राहिलं आहे. मराठा समाजातील एक वर्ग फोरव्हीलरमधून दिमाखात फिरणारा, राजकीय वर्चस्व असणारा, बागायती जमिनी असलेला असा आहे मात्र त्यांची संख्या एकूण मराठा लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे. मध्यमवर्गीय देखील आहेत. मात्र या व्यतिरिक्त जो शेतकरी, कष्टकरी मराठा समाज आहे. त्याची आर्थिक परिस्थिती दयनीय आहे. त्याची संख्या जास्त आहे. यामध्येही प्रादेशिक वर्गवारी करता येते. पश्चिम महाराष्ट्रातील मराठा शेतकऱ्यापेक्षा मराठवाडा, विदर्भातील शेतकऱ्याची परिस्थिती अधिक हलाखीची आहे.

आरक्षणाचा फेरआढावा का घेण्यात आला नाही? – आरक्षणाची व्यवस्था ही काय परिपूर्ण व्यवस्था नाही. त्यातदेखील दोष आहेत मात्र हे दोष दूर करण्याची इच्छाशक्ती राज्यकर्त्या वर्गाने वेळीच दाखवली नाही. OBC घटकाला जशी क्रिमिलेयरची म्हणजे उत्पन्नाची मर्यादा घालून दिलीय तशी मर्यादा काही कालावधीनंतर SC,ST. गटालाही लागू करणं गरजेचं आहे. SC वर्गातील एखादा तरुण जिल्हाधिकारी जरी झाला तरी त्याच्या पोराला आरक्षणाचा लाभ मिळतोय. त्यामुळे SC गटातील इतर जो आर्थिकदृष्ट्या मागास घटक आहे त्याला संधी मिळत नाही. आरक्षणाचा लाभ घेऊन ज्यांची परिस्थिती सुधारलीय अशांनी स्वतःहून आरक्षण नाकारायला हवे होते पण तसं होताना दिसत नाही. यामुळे ज्या वर्गाला आरक्षण मिळतेय त्या वर्गातील जो पुढारलेला आहे त्यालाच पुनःपुन्हा आरक्षणाचा फायदा मिळतोय. त्यावर मर्यादा घालायला हव्यात. OBC वर्गातीलही ज्या जाती पुढारलेल्या आहेत, आरक्षणाचा लाभ घेऊन सक्षम झाल्या आहेत त्यांना आरक्षण नाकारायला हवं. आरक्षणाचा हेतू सामाजिक न्यायाचा आहे व्यक्ती उद्धाराचा नाही हे ही समजून घ्यायला हवं. आरक्षणाचा फेरआढावा घेण्यात न आल्यामुळे ही सदोष व्यवस्था अशीच पुढे चालत आली आहे.

आर्थिक निकषावर आरक्षण देण्याची मागणी – एवढी सगळी गुंतागुंत पाहिल्यावर मग शेवटी आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशी मागणी पुढे येते. आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम कधीच नव्हता. सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या जे घटक मागासलेले आहेत त्यांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावं यासाठी आरक्षण आहे. सामाजिक न्याय प्रस्थापित करणं हा आरक्षणाचा मुख्य हेतू आहे. घटना दुरुस्ती करून दिलंच आर्थिक निकषावर आरक्षण तर त्याचा फायदा किती लोकांना होणार आहे? कारण आरक्षण हे खाजगी क्षेत्रात लागू नाही. ते फक्त सरकारी नोकऱ्यात आणि सरकारी संस्थांमध्ये लागू आहे. या जागा वरचेवर कमी होताना दिसत आहेत. मूळ समस्या बेरोजगाराची, कौशल्याच्या अभावाची, घसरत्या gdp ची, शेतीच्या दुर्देशची आहे मात्र उपाय शोधला जातोय आरक्षणात. म्हणजे आरक्षण ही तर मराठा, पाटीदार, जाट समाजाची दिशाभूल ठरतेय. पण हे वास्तव आपल्याला स्वीकारायचं नाही. मराठा आरक्षणाचा चकवा या लेखात पत्रकार, अभ्यासक रमेश जाधव म्हणतात, “आरक्षण ही समान संधीचा अवकाश उपलब्ध करून देणारी कुबडी आहे, हत्यार नव्हे याचा विसर पडलेला आपला समाज आहे. अमेरिकेत जशी affirmative action झाली तशी स्थिती आपल्याकडे आहे का? गोऱ्यांनी वर्चस्ववादी भूमिका घेऊन आपल्याला संधी नाकारल्यामुळे आपण मागे पडलो. आता त्या संधी हस्तगत करून त्यांच्या तोडीस तोड किंवा त्यांच्याहून अधिक चांगला परफॉर्मन्स देऊ ही वृत्ती आरक्षणाचा लाभ मिळणाऱ्या जातींमध्ये दिसते का? याउलट त्यांना आरक्षण मिळतंय तर आम्हालाही द्या ही याचकाची वृत्तीच आपल्याकडे प्रबळ होताना दिसतेय. ज्ञानाची आस आणि संपत्ती निर्मितीचा ध्यास याला कवडीचीही किंमत न देणाऱ्या समाजाचे हेच भाग्यध्येय असणार. आजच्या पर्यावरणात अशी आस आणि ध्यास असलेला समाज निर्माण करणं हा आज एखाद्या राजकीय पक्षाचा अजेंडा असणं शक्य आहे का? हे आपलं कलेक्टिव्ह फेल्युर आहे” पत्रकार रमेश जाधव यांचे हे अभ्यासू मत मला महत्वाचे वाटते. राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीत शरद पवारांनीही आर्थिक निकषाचा सूर आवळला. पण त्याच मुलाखतीत 70 हजार लोकांना रोजगार मिळवून देणारा हनुमंत गायकवाड हाच तुमचा आदर्श असला पाहिजे, असे बोलून त्यांनी स्पष्ट संकेत दिले आहेत.

गेल्या 4 दिवसांत चांदी 11000 रुपये तर सोने झाले 2500 रुपये स्वस्त, किंमती आणखी किती खाली येऊ शकतात ते जाणून घ्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशांतर्गत बाजारपेठेत चांदीच्या किंमती सोन्यापेक्षा कमी होत आहेत. चालू व्यापारी आठवड्याच्या चौथ्या दिवशी गुरुवारी वायदे बाजाराच्या एमसीएक्सवर ऑक्टोबरच्या वितरणासाठी सोन्याचे वायदे 0.45 टक्क्यांनी घसरले, यावेळी सोन्याचे दर हे प्रति दहा ग्रॅम 50 हजारांच्या खाली आलेले आहेत. सध्या ते प्रति 10 ग्रॅम 49,293 च्या पातळीवर आहे. त्याचबरोबर चांदीचा वायदा हा 3 टक्क्यांनी घसरून 56,710 रुपये प्रति किलो झाला. तज्ज्ञांचे याबाबत म्हणणे आहे की, सोन्याच्या किंमतीतील घसरणीचा कल आज सलग तिसर्‍या दिवशीही कायम आहे. अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे परकीय बाजारात सोन्याची किंमत 2 टक्क्यांनी कमी होऊन ती 1862 डॉलर प्रति औंस झाली आहे. म्हणूनच देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी स्वस्त झाली आहे.

सोने 2500 रुपये तर चांदी 11 हजार रुपयांनी स्वस्त आहे – गेल्या चार दिवसांत सोने आतापर्यंत प्रति 10 ग्रॅम 2,500 डॉलर इतके स्वस्त झाले आहे. मागील सत्रात सोन्याचे दर प्रति दहा ग्रॅम 950 रुपयांनी घसरले होते, तर बुधवारी चांदीच्या किंमती 4.5 किलो किंवा 2,700 रुपये प्रति किलोने खाली आल्या.

परदेशी बाजारातही सोन्याचे भाव घसरले – सोन्याचा हाजीर भाव हा 0.3 टक्क्यांनी घसरून 1,858.08 डॉलर प्रति औंस झाला. न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, युरोपमधील आर्थिक मंदीच्या दरम्यान अमेरिकन डॉलरचा निर्देशांक अन्य चलनांच्या तुलनेत गेल्या आठ आठवड्यांच्या शिखरावर होता. दरम्यान, जगातील सर्वाधिक एक्सचेंज ट्रेडेड फंड (SPDR), गोल्ड ट्रस्ट बुधवारी 0.87% घसरून 1,267.14 टन झाला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

राजकारणात वापरली जाणारी डावी-उजवी संकल्पना म्हणजे काय??

डोक्याला खुराक | मयूर डुमणे

माणूस हा सामाजिक प्राणी आहे तसा तो राजकीय प्राणी देखील आहे. राजकारणात माणसाला पूर्वी पासूनच खूप रस आहे. असं एकही ठिकाण नाही जिथं राजकारणावर चर्चा होत नाही. चार माणसं एकत्र आली की हमखास राजकारणावर चर्चा घडून येतेच. सोशलमीडियावर तर सर्वाधिक चर्चा राजकारणावरच घडून येते. ही चर्चा सुरू झाली की मग त्यात राजकीय पक्ष आले, विचारधारा आल्या. डावे-उजवे हे तर ठरलेलंच. अमुक नेता, व्यक्ती डाव्या विचारधारेची आहे तमुक नेता, व्यक्ती उजव्या विचारधारेची आहे, असं आपण सहज बोलून जातो. अशी चर्चा चालू असताना हे डावे उजवे नेमकी भानगड काय असा प्रश्न कधी तुम्हाला पडलाय का? पडला असेल तर या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा कधी प्रयत्न केलाय का? नाही ना. तर चला आपण आता या प्रश्नाचं उत्तर शोधुया.

फ्रान्समधील सामान्य जनतेकडून संविधानाची मागणी – फ्रान्समध्ये 1789 साली झालेल्या क्रांतीनं डावं आणि उजवं या जगप्रसिद्ध संकल्पनांना जन्म दिला. 1789 मध्ये 17 जुलैपासून फ्रान्समध्ये क्रांतीला सुरवात झाली होती. या काळात राज्याची आर्थिक स्थिती खराब होती. राज्याच्या तिजोरीत पैसा नसल्यामुळे जनतेला जीवनावश्यक सोयी सुविधा उपलब्ध होत नव्हत्या. यामुळे जनतेमध्ये असंतोषाची परिस्थिती निर्माण झाली होती. याच संकटाचा सामना करण्यासाठी 1789 च्या मे-जून मध्ये तत्कालीन राजा 16 व्या लुईने एका सभेचं आयोजन केलं होतं. तेव्हा राज्यात नागरिकांचे तीन वर्ग होते. एक वर्ग जमीनदारांचा, दुसरा उमरावांचा आणि तिसरा सामान्य जनतेचा. हे तिन्ही वर्ग या सभेला उपस्थित होते. या सभेत तिसऱ्या वर्गातील म्हणजे सामान्य जनतेने राज्यासाठी संविधानाची निर्मिती करण्याची मुख्य मागणी केली. या मागणीला राजाचे समर्थक असणाऱ्या इतर दोन्ही वर्गांनी कडाडून विरोध केला. सभेच्या तीन दिवसानंतर तिसऱ्या वर्गातील लोकं संविधानाची मागणी करण्यास सभेला गेले तर त्यांना सभेत प्रवेशच नाकारण्यात आला.

लढाईचा निर्धार – यामुळे तिसऱ्या वर्गातील लोकांना फार मोठा धक्का बसला. त्यांनी राजाच्या या कृतीला जोरदार विरोध करण्याचे ठरवले. ते राजाच्या महालाजवळील टेनिस कोर्टमध्ये एकत्र आले. टेनिस कोर्टवर जमलेल्या सर्वांनी सोबत राहून राजा विरुद्ध लढाई करण्याचा निश्चय केला. संविधानाची मागणी जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत लढाई सुरू ठेवण्याची त्यांनी शपथ घेतली. मोठ्या संख्येने घेतलेली ही शपथ ‘टेनिस कोर्ट ओथ’ या नावाने प्रसिद्ध आहे. या दरम्यान पहिल्या व दुसऱ्या वर्गातील काही लोकही या लढाईत सहभागी झाले.

संविधानाची निर्मिती – शेवटी या मागणीपुढे राजा आणि त्यांच्या समर्थकांना झुकावे लागले. राजाला संविधानाच्या निर्मितीस परवानगी द्यावी लागली. संविधानाच्या निर्मितीसाठी संविधान सभेची स्थापना करण्यात आली. या सभेत सर्व वर्गातील प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला. या सभेने दोन वर्षे काम करून 9 जुलै 1791 ला संविधान सादर केले.

येथेच जन्मली डावी उजवी संकल्पना

आता संविधानानुसार बैठक सुरू झाली. या आधी राजाच्या अध्यक्षतेखाली घोड्याच्या नाल आकारात बैठक होत होती. पण आता बैठकीचा अध्यक्ष राजा नव्हता. त्यामुळे बैठकीची पद्धतही बदलण्यात आली. आता बैठकीत अध्यक्षांच्या डाव्या बाजूला तिसऱ्या वर्गातील क्रांतिकारी लोक बसले आणि उजव्या बाजूला सत्ताधाऱ्यांचे समर्थन करणारे आणि कठोर बदलाला विरोध करणारे लोक बसले.

कालांतराने डाव्या बाजूला बसणाऱ्या लोकांना लेफ्टीस्ट आणि उजव्या बाजूला बसणाऱ्या लोकांना राईटीस्ट बोलले जाऊ लागले. अशा पद्धतीनं डावे आणि उजवे या संकल्पनांचा जन्म झाला. फ्रान्समध्ये या संकल्पना प्रचलित झाल्या.

फ्रान्समध्ये जन्मलेल्या या संकल्पनांना हळूहळू इतर देशांतही मान्यता मिळू लागली. परिवर्तनाची बाजू घेणाऱ्या लोकांना लेफ्टीस्ट बोलले जाऊ लागले आणि जे लेफ्टीस्ट विचारधारेचं समर्थन करत नाहीत त्यांना राईटीस्ट बोलले जाऊ लागले.

वेगवेगळ्या देशांत त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं या संकल्पना स्वीकारण्यात आल्या. हळूहळू गरीब, शेतकरी, कामगार या वर्गाने लेफ्ट ग्रुपचे समर्थन केले.

प्रसिद्ध विचारवंत कार्ल मार्क्सने 1848 साली जेव्हा आपले विचार जगापुढे मांडले तेव्हा या संकल्पना खूपच प्रसिद्ध झाल्या. मार्क्सच्या विचारधारेचं म्हणजे कम्युनिजमचं समर्थन करणाऱ्या सर्व संघटनांना लेफ्टीस्ट बोलले जाऊ लागले. फ्रान्सच्या क्रांतीतून जन्मलेल्या ही संकल्पना अमेरिकेसह इंग्लंडमध्येही पोहोचली. भारतातही डावे आणि उजवे या संकल्पना प्रचलित झाल्या.

तर अशी आहे ही डावी आणि उजवी भानगड !

रस्त्याअभावी आदिवासी भोगतायत मरणयातना; रुग्णांना उपचारासाठी डोलीने 7 किमीचा डोंगर करावा लागतोय पार

पालघर प्रतिनिधी । संदीप साळवे

राज्याची राजधानी मुबंईपासून 100 किमी अंतरावर आणि पालघर जिल्ह्यातील जव्हारपासून 25 ते 30 किमी अंतरावर डोंगर दरी खोऱ्यात वसलेले दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाड, मनमोहाडी भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे आजही नागरी सोयीसुविधांपासून कोसो दूर आहे. स्वातंत्र्याची 70 वर्ष उलटूनही अद्याप या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने येथील आदिवासींना विविध समस्याचा सामना करावा लागत आहे. शिवाय रस्त्याअभावी अबाल वृद्ध गरोदर माता, शाळकरी मुले, चाकरमान्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच आजारी रुग्णास लाकडाची डोली करून 6 ते 7 किमीचा भलामोठा डोंगर तुडवत झाप येथील आरोग्य पथक गाठावे लागते. बऱ्याचदा वेळीच उपचार न मिळाल्याने येथील अनेक रुग्ण उपचाराअभावी रस्त्यातच दगावले देखील आहेत. यामुळे येथील आदिवासींच्या पाचवीला पुजलेली ही मरणयातना कधी थांबणार? असा प्रश्न विचारला जातो आहे

यामधील दखण्याचापाडा वडपाडा उंबरपाडा हे झाप ग्रामपंचायतमध्ये, मनमोहाडी ऐना ग्रामपंचायत तर भाटीपाडा कुकडी हे आदिवासी पाडे पाथर्डी ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतात. या पाड्यांची ऐकूण लोकसंख्या चौदाशेच्या आसपास असून येथील एकूण 200 मुले पुढील शिक्षण घेत आहेत परंतु रस्ता नसल्याने शाळकरी मुलांचे हाल होत आहेत. मनमोहाडी या पाड्याची 80 घरांची लोकवस्ती असून नदी ओलांडून त्यांना ये-जा करावी लागते. पावसाळ्यात येथील आदिवासींचा पूर्णपणे संपर्क तुटतो. आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास येथील आदिवासीं समोर कोणताच पर्याय उपलब्ध नसतो.

येथील ढवळू रामू गरेल व चांगुणा काकड गरेल यांना सर्पदंश होऊन वेळीच उपचार न मिळाल्यामुळे त्यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर अशा अनेक घटना वारंवार येथे घडत आहेत. तसेच मागील वर्षी वडपाड्याजवळ 25 लाखाचा आसपास खर्च करून दीड दोन किमीचा अंतराचा थातूर माथुर नवीन डांबरी रस्ता तयार करण्यात आला आहे त्या रस्त्यावर सर्वत्र गवत उगलय कामात कोणतीच कॉलेटी नाही मुळात या गावपाड्यांना जोडणारा रस्ता नसल्याने कुठे तरी थातूर-मातूरकाम करून निधी वाया घालवण्याचा नेमका उद्देश काय? यामुळे याची चौकशी करून ठेकेदारावर कारवाई करायला हवी

देशाला स्वातंत्र्य मिळवून 70 वर्ष उलटली. या काळात देशात अनेक बद्दल झाले आधुनिकीकरण झाले अनेक गावांचे शहरात रुपांतर झाले अनेक राजकीय पक्षांकडून विकासाचे आश्वासन देण्यात आली अनेक निवडणुकांमध्ये गावात रस्ते बांधणार गावाचा विकास करणार अशी अनेक आश्वासने लोकप्रतिनिधी कडून देण्यात येतात यातूनच दरवर्षी नवीन रस्त्यासाठी कोट्यवधी चा निधी खर्च देखील केला जातो मात्र मुबंई राजधानीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या जव्हार तालुक्यातील या आदिवासी पाड्यांना लोकप्रतिनिधी कडून प्रत्येक निवडणुकीला फक्त रस्त्याचे आश्वासन मिळाले परंतु पक्का रस्ता मात्र अजून पर्यत मिळालेला नाही ही बाब खेदाने म्हणावी लागेल.

केंद्र सरकारकडून अर्थव्यवस्था काही ट्रिलियनपर्यंत नेणार असल्याचे सांगितले जात आहे. अशाच अनेक अर्थसंकल्पात आदिवासींना अनेक योजना जाहीर होतात…मोठमोठ्या आकड्यांची तरतूद केली जाते परंतु प्रत्यक्षात मात्र ह्या योजना येथील आदिवासी पर्यत पोहचत नाहीत भ्रष्ट प्रशासन व ठेकेदारांच्या घशात घातल्या जातात. यामुळे ट्रिलियनपर्यंत अर्थव्यवस्था नेणाऱ्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाने येथील रस्त्याचा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा ही अपेक्षा येथील आदिवासी व्यक्त करतायत.

या आदिवासी पाड्यांच्या चारही बाजूने डोंगर असल्याने येथे कोणतेच मोबाईल नेटवर्क नाही. परंतु शासन जरी ऑनलाइन शिक्षण असं म्हणत असलं तरी येथील 200 विद्यार्थ्यांचा नेटवर्क अभावी शिक्षणाला मुकावं लागत आहे. ‘डिजिटल इंडिया’चा डंका पिटणाऱ्या केंद्र सरकारला येथील संतप्त आदिवासी विद्यार्थी जाब मागत आहेत. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून 75 वर्ष उलटी आहेत परंतु अजूनपर्यंत दखण्याचापाडा, वडपाडा, उंबरपाडा, मनमोहाडी, भाटीपाडा, कुकडी हे आदिवासी पाडे सोयीसुविधा पासून वंचित आहेत दळणवळनाची सुविधा नाही इथे कॅशलेस व डिजिल इंडिया ढोल वाजवला जातो परंतु या आदिवासी पाड्यात नेटवर्क नसल्याने मुले ऑनलाईन शिक्षण कसे घेणार? पेशंट झाल्यास डोली करून खांद्यावर पेशंट घेऊन डोंगर चढाव लागतोय लोकप्रतिनिधी इकडे फिरकत देखील नाही अशी आपबिती येथील आदिवासी बांधव सांगत असून नागरी समस्या सोडवल्या जाव्यात अशी त्यांची अपेक्षा आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.