Wednesday, December 31, 2025
Home Blog Page 5702

जॉर्ज फ्लॉइडची मुलगी म्हणाली-‘डॅडी चेंज द वर्ल्ड’, व्हिडिओ झाला व्हायरल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेतील कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लॉइडच्या निधनानंतर या देशातील अनेक भागात हिंसाचार भडकला आहे. देशातील रस्त्यांपासून ते सोशल मीडियापर्यंत लोकांनी या घटनेचा निषेध केला आहे. आता जॉर्ज फ्लॉइडच्या ६ वर्षाच्या मुलीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ एनबीएचे माजी खेळाडू स्टीफन जॅक्सन यांनी शेअर केला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार स्टीफन जॅक्सन फ्लॉयडच्या काही जवळच्या मित्रांपैकी एक आहे. या व्हिडिओमध्ये फ्लॉइडची मुलगी ‘डॅडी चेंज द वर्ल्ड’ असे म्हणत एका माणसाच्या खांद्यावर बसलेली दिसत आहे. हा व्हिडिओ पहा …

 

जो कोणी हा व्हिडिओ पहात आहे तो त्या मुलीच्या धैर्याचे कौतुक करतो आहे. एका यूजरने या व्हिडिओवर कमेंट करत लिहिले की, “या मुलीला फक्त हे माहित आहे की तिच्या वडिलांमुळे हे जग बदलले आहे, परंतु तिला हे माहित नाही की ती पुन्हा तिच्या वडिलांना पाहू शकणार नाही.” हा व्हिडिओ आतापर्यंत १ लाखाहून अधिक वेळा पाहिला गेला आहे.

हा व्हिडिओ २ जून रोजी एका पत्रकार परिषदेनंतर शूट करण्यात आला होता, ज्यात फ्लॉयडच्या कुटुंबीयांनी त्याच्या मृत्यूबद्दल न्याय करण्याची मागणी केली होती. पत्रकार परिषदेत गियानाची आई रोक्सी म्हणाली, “मला त्याच्यासाठी न्याय हवा आहे कारण तो चांगला व्यक्ती होता.”

कोण होता जॉर्ज फ्लॉइड
जॉर्ज फ्लॉइड, एक ४६ वर्षीय कृष्णवर्णीय नागरिक होता,जो आफ्रिकन अमेरिकन समुदायाचा होता. त्याचा जन्म नॉर्थ कॅरोलिना येथे झाला होता आणि तो टेक्सासच्या ह्युस्टन येथे राहत होता. बीबीसीच्या वृत्तानुसार, काम शोधण्यासाठी तो बर्‍याच वर्षांपूर्वी मिनियापोलिस येथे गेला होता. जॉर्जने मिनियापोलिसमधील एका रेस्टॉरंटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून काम केले आणि भाडे देऊन त्याच रेस्टॉरंट मालकाच्या घरात पाच वर्षे वास्तव्य केले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

२४ तासात महाराष्ट्रात कोरोनामुळे सर्वाधिक १२३ मृत्यूंची नोंद 

वृत्तसंस्था । राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहेच पण आज गेल्या २४ तासात राज्यात कोरोनामुळे सर्वाधिक मृत्यूची नोंदही झाली आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण मोठ्या संख्येने वाढत आहेत मात्र तेवढेच रुग्ण बरेही होत असल्याचे दिसून येत आहे. मात्र आज राज्यात १२३ हा सर्वाधिक मृत्यूचा आकडा पाहण्यात आला आहे. ही माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने आज जाहीर केली आहे. शासन विविध स्तरावर उपाययोजना करीत आहे.

दरम्यान आज राज्यभरात एकूण २९३३ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. ज्यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता ७७ हजार ७९३ इतक्यावर पोहोचली आहे. राज्यातील एकूण मृतांची संख्या २७१० इतकी झालीय हे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

 

देशात आज एकूण ९ हजार ३०४ रुग्ण वाढले असून एकूण संख्या २ लाख १६ हजार ९१९ वर पोहोचली आहे. देशात आज ६ हजार ७५ मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत देशात एकूण १ लाख चार हजार १०६ लोक बरे झाले आहेत. देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण समाधानकारक असून ते ४८% इतके आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

MBBS पदवी धारकांना सुवर्णसंधी; ठाणे येथे तातडीची भरती – जितेंद्र आव्हाड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील कोरोना स्थिती बिकट होते आहे. रुग्ण वाढत आहेत आणि उपचारासाठी लोक कमी पडत आहेत. शासनाने कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी तात्काळ स्वरूपात काही दवाखाने देखील बनविले आहेत. आता डॉक्टर आणि इतर कर्मचारी वर्गाची आवश्यकता आहे. अमित देशमुख यांनी काही दिवसापूर्वी राज्यातील एमबीबीएस झालेल्या विद्यार्थ्यांना उपचारासाठी पुढे येण्याचे आवाहन केले होते. डॉक्टर, नर्स आणि इतर कमर्चाऱ्यांची कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणार असल्याचे सांगितले होते. आता ठाणे जिल्ह्यात डॉक्टर आणि इंटेन्सिव्हिस्ट यांची गरज असल्याचे ट्विट महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.

 

या डॉक्टर, इंटेन्सिव्हिस्ट (आयसीयू मधील रुग्णांना विशेष सेवा पुरवितो) यांना  मानधन तत्त्वावर घेतले जाणार असून इंटेन्सिव्हिस्ट ना १.७५ लाख तर डॉक्टर ना ९० हजार मानधन दिले जाईल अशी माहिती आव्हाड यांनी त्यांच्या ट्विटर अकॉउंटवरून दिली आहे. इच्छूकांनी [email protected] या ईमेलवर आपल्या रिझ्युम सोबत अर्ज करावा अशी माहिती त्यांनी दिली आहे. साधारण ५ ते ६ डॉक्टर व २ ते  ३ इंटेन्सिव्हिस्ट लागणार असल्याचे आव्हाड यांनी सांगितले आहे.

कोरोना संकटकाळात प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. राज्यातील रुग्णसंख्या ७४ हजार पार झाली आहे. तसेच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही चांगली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

 

हत्तीणीच्या मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी केरळ सरकार प्रयत्नशील- मुख्यमंत्री पी. विजयन

वृत्तसंस्था । केरळमध्ये एका हत्तीणीला स्फोटकांनी भरलेला अननस खायला देण्यात आला होता. ज्यात त्या गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाला. हे प्रकरण देशभरात उसळी घेत आहे. सोशल मीडियावरून हे कृत्य केलेल्या लोकांना गंभीर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी होते आहे तर मानवतेला काळिमा फासणारे कृत्य म्हणून या कृत्याचा निषेध देखील केला जातो आहे. या सर्व प्रकरणावर केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी ट्विटर वरून आम्ही या हत्येतील दोषींना शिक्षा देण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू  असे ट्विट केले आहे. तसेच ३ संशयितांवर लक्ष केंद्रित केले असून त्यांची चौकशी केली जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

 

“पलक्कड जिल्ह्यातील या दुःखद घटनेत एका गर्भवती हत्तीणीला आपला प्राण गमवावा लागला आहे. तुमच्यातील बरेच जण आमच्यापर्यंत पोहोचले आहेत. मी तुम्हाला खात्री देतो की तुमची चिंता व्यर्थ जाणार नाही. न्यायाचा विजय होईल” असे त्यांनी म्हंटले आहे. यासोबतच या घटनेचा वापर आमच्याविरुद्ध द्वेषाची मोहीम राबविण्यात केला जात आहे याचे दुःख वाटते असे त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हंटले आहे. काहींनी अर्धवट सत्य आणि चुकीच्या वर्णनावरून सत्य लपविण्याचा प्रयत्न केला होता. काहींनी तर वर्णनात कट्टरता आणण्याचा प्रयत्न केला. असेही ते म्हणाले.

केरळ हा अन्याविरुद्धच्या आक्रोशाचा आदर करणारा समाज आहे. आपण सर्व प्रकारच्या अन्यायाचा आवाज उठविणारे लोक होऊ या असे म्हणत त्यांनी या प्रकरणातील आरोपीना कठोर शिक्षा केली जाईल असे आश्वासन दिले आहे. दरम्यान या घटनेशी संबंधित अनेक व्यंगचित्रे आणि मिम्स सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत. अनेकांनी ही खूप लाजिरवाणी गोष्ट असल्याचे आपल्या पोस्टमधून लिहिले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मुंबईकरांना दिलासा..!! महापालिका क्षेत्रातील लोकांना जिल्ह्यांतर्गत प्रवासास परवानगी 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाचव्या टप्प्यातील संचारबंदीचे शिथिल केलेले नियम केंद्र सरकारने ३१ मे रोजी जाहीर केले होते. व राज्यांना त्यामध्ये स्वातंत्र्य दिले होते. चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे राज्य सरकारने हे नियम आज (गुरुवारी) जाहीर केले आहेत. यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्यातील आर्थिक घडामोडीही सुरु करण्याच्या दृष्टीने काही नियमांमध्ये सुधारणा केली आहे. मुंबई महानगर प्रदेश अंतर्गत महानगर पालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या लोकांना जिल्ह्यांतर्गत प्रवास करण्यास परवानगी शासनाकडून देण्यात आली आहे. या नियमानुसार ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिविली, बदलापूर या मुंबई मधील मेट्रोपोलिटन प्रदेशातील लोकांना जिल्ह्यांतर्गत प्रवास करता येणार आहे.

दरम्यान, या शिथिल झालेल्या नियमांमुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळाला असून आता हळूहळू दैनंदिन कामे सुरु केली जाणार आहेत. या सुधारित नियमांमध्ये रस्त्याच्या एका बाजूच्या दुकानांना आलटून पालटून उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच १०% कार्यक्षमतेसह खाजगी कार्यालये उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवणे सोडून इतर कामासाठी परवानगी देण्यात आली आहे. या सुधारित नियमांसहित जरी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सुचीला मिशन बिगिन अगेन असे नाव देण्यात आले आहे.

दरम्यान राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ७४ हजार ८६० इतकी झाली आहे. आतापर्यंत २५८७ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. तर ३२ हजार ३२९ रुग्ण बरेही झाले आहेत. देशातील रुग्णसंख्या २ लाख १६ हजार ९१९ झाली असून सर्वाधिक रुग्णसंख्या असणाऱ्या देशांच्या यादीत भारत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. मात्र देशातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले असून ते ४८% इतके आहे. सध्या उपचार घेणारे १ लाख ६ हजार ७३७ रुग्ण असले तरी १ लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

फडणवीसांचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र; आता ‘या’ गोष्टीवरुन व्यक्त केली चिंता

वृत्तसंस्था ।  राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ही होतच आहे. तसेच मृतांची संख्याही वाढते आहे. मुंबईमध्ये तर दिवसागणिक नवी आव्हाने समोर येत आहेत. यावर चिंता व्यक्त करत राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आता मुख्यमंत्री उद्धव ठरे यांना याबाबत पत्रच लिहिले आहे. देवेंद्र  फडणवीस सध्या राज्य सरकारच्या विरोधातील त्यांच्या भूमिकांमुळे चर्चेत आहेत. या संक्रमण काळात अनेकदा हे सरकार अपयशी असल्याचे विधान त्यांनी केले आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी मुंबईमधील घटत्या चाचणी प्रमाणाच्या चिंतेबद्दल पत्र लिहिले आहे.

फडणवीस यांनी या पत्रात मुंबईतील कोरोनामुळे असणारा मृत्युदर आणि चाचण्यांचे घटते प्रमाण यावर लिहिले आहे. त्यांनी मुंबईमधील प्रयोगशाळांमध्ये दिवसाला १० हजार चाचण्या करण्याची क्षमता आहे मात्र दररोज केवळ साडेतीन हजार ते चार हजारच चाचण्या का होत आहेत असे विचारले आहे. सध्या महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक रुग्ण असणारे राज्य आहे. तर मुंबई हा सर्वधिक रुग्णसंख्या असणारा जिल्हा आहे. याबाबतच त्यांनी हे पत्र लिहिले आहे.

दरम्यान राज्यातील रुग्णसंख्या ७४ हजार पार झाली आहे. राज्यातील आर्थिक व्यवहार पुन्हा हळूहळू सुरु केले जात आहेत. संचारबंदीचे नियम काही अंशी शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा रुग्णसंख्या वाढण्याचा धोका आहे मात्र सर्वत्र सामाजिक अलगाव चे सर्व नियम पाळण्याची सक्ती करण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

‘मला मुंबई सोडून जायचं नव्हतं, पण..’ सनी लिओनीनं दिलं अमेरिकेत जाण्याचं स्पष्टीकरण

मुंबई । अभिनेत्री सनी लिओनी लॉकडाऊन असतानाही अमेरिकेत गेल्यानं तिच्यावर अनेकानी टीका केली होती. दरम्यान आता एका मुलाखतीत तिनं अमेरिकेत जाण्याचा निर्णय का घेतला यासंदर्भात खुलासा केला आहे. करोना व्हायरसपासून वाचण्यासाठी माझ्या मुलांच्या दृष्टीनं अमेरिका सुरक्षित आहे, त्यामुळं आम्ही इथं आलो आहोत असं तिनं एक इन्स्टाग्राम पोस्ट शेअर करून सांगितलं होतं.

मुंबईतून अमेरिकेत गेल्यानंतर चाहत्यांनी सनीवर प्रचंड टीका केली होती. पण यासंदर्भात तिनं ‘टाइम्स ऑफ इंडिला’ला दिलेल्या मुलाखतीत आणखी एक खुलासा केला आहे. खरं तर मला मुंबई सोडायचीच नव्हती. ‘अमेरिकेला यायचा निर्णय घेण्यासाठी आम्हाला खूप वेळ लागला, या कठीण काळात हा निर्णय घेणं सोप्प नव्हत. पण डॅनिअलच्या आईसाठी हा निर्णय घ्यावा लागला आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी आम्ही इथं अमेरिकेला आलोय’,असं सनीनं या मुलाखतीत म्हटलं आहे.

कोरोनामुळं सगळेच अडकले आहेत. मी आणि माझे कुटुंबिय सध्या लॉस एंजिलिस येथील बंगल्यात आहोत. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरळीत होताच भारतात परतणार असल्याचं सनीनं यावेळी सांगितलं.अमेरिकेला गेल्यानंतर सनीच्या पतीनं देखील एक फोटो शेअर करत ‘क्वारंटाईन पार्ट २; हे इतकं काही वाईट नाही’, असं कॅप्शनही दिलं होतं. सनी आणि तिचा पती डॅनिअल वेबर हे अमेरिकेचे अधिकृत नागरिक असून २०१२ पासून सनी मुंबईत राहत आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

पत्रकारांनाही 50 लाखांचं विमा कवच, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची घोषणा

बुलडाणा । कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. या कठीण परिस्थितीतही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आपलं कर्तव्य बजावत आहेत. कोरोनाविरुद्धच्या लढाईत अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना 50 लाखांचा विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. अत्यावश्यक सेवेत कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींमध्ये पत्रकारांना सुद्धा विमा कवच मिळणार असल्याचे टोपे यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव पोलिसांसाठी जिल्हा पोलीस विभागाच्यावतीने सुरू होणाऱ्या कोविड केअर सेंटरच्या उदघाटनानंतर टोपेंनी पत्रकारांशी संवाद साधताना ही घोषणा केली.

कोरोनाच्या लढाईत प्रसारमाध्यमे आणि वृत्तपत्रांचाही अत्यावश्यकसेवेत समावेश करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळाच माहिती मिळवण्यासाठी पत्रकारही मेहनत करतात. आपलं कर्तव्य बजावत असताना काही पत्रकारांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. कोरोना काळात कर्तव्य बजावणाऱ्या पत्रकारांना 50 लाखांचं विमा कवच देण्यात येणार असल्याची घोषणा राजेश टोपे यांनी केली.

तरच मिळणार पत्रकारांना विमा कवच
एखाद्या पत्रकाराला कोरोनाची लागण झाली आणि यात दुर्देवाने त्याचा मृत्यू झाला त्याला हे कवच मिळणार आहे. मात्र, सदर व्यक्ती पत्रकार असून कर्तव्य बजावत असताना त्याचा कोरोनाने मृत्यू झाला असं जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिलं तरच विमा कवच मिळेल असं टोपे यांनी स्पष्ट केलं. तसेच कोरोनाचे काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आणि त्याच्यावर हा प्रसंग ओढावला तर जिल्हाधिकाऱ्यांनी लिहून दिल्यावर त्यांनाही 50 लाखांचं हे विमा कवच मिळणार असल्याची घोषणा टोपे यांनी यावेळी केली.

यांनाही मिळणार विमा कवच
कोविडविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागाचे कर्मचारी (रोजंदारी, कंत्राटी, बाह्यसेवेद्वारे घेतलेले, मानसेवी असे सर्व कर्मचारी) अशा सर्वंघटकांना 50 लाख रुपयांच्या विमासंरक्षणाचा लाभ मिळणार आहे. ही योजना विमा कंपनीच्या सहकार्यानं राबविण्यात येणार असली तरी यासंदर्भातील पॅकेज अंतिम होईपर्यंत, अंतरिम निर्णय म्हणून राज्य शासनाच्या माध्यमातून हे 50 लाखांचे सानुग्रह अनुदान संबंधीतांना देण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

..तर मग आरएसएसने ‘ती’ प्रेतं उचलावीत’, ‘पीएफआय’वरून काँग्रेसचा भाजपवर हल्लबोल

मुंबई । पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) संस्थेला मुंबई महापालिकेने काम दिल्यावरून वाद शिगेला पोहोचला आहे. यावरून आता काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. प्रेत उचलणाऱ्या मुस्लिम लोकांवर आक्षेप असतील, तर आरएसएसने प्रेतं उचलावीत, अशी टीका काँग्रेसचे नेते हुसेन दलवाई यांनी केली आहे. पीएफआय ही मोफत काम करणारी संस्था आहे, असंही हुसेन दलवाई म्हणाले आहेत. पीएफआयने काही चुकीचं केलं असेल, तर कारवाई करावी. देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप चुकीचे आहेत, अशी प्रतिक्रिया हुसेन दलवाई यांनी दिली आहे.

फडणवीस आणि पीएफआय नेमका वाद तरी काय?
कोरोना काळामध्ये मुंबई महापालिकेने मुस्लिमांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी पीएफआय या संस्थेला दिली, यावर देवेंद्र फडणवीसांनी आक्षेप घेतला. राष्ट्रविरोधी आणि समाजविरोधी कारवाईचे आरोप असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेला मुंबई महापालिकेने मान्यता दिली आहे काय? असा संतप्त सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. केरळ, कर्नाटक, झारखंड, उत्तर प्रदेश या राज्यांत या संस्थेवर बंदी घालण्याची कारवाई करण्यात येत आहे. तसंच या संघटनेवर बंदी घालण्याची मागणीही होत आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने तपास हाती घेतलेल्या पीएफआय या संस्थेला महापालिकेने हे काम देणे ही अतिशय धक्कादायक आणि गंभीर बाब आहे, असे फडणवीस यांनी म्हटलं होतं.

एनआयएकडून आरोपपत्राची कारवाई सुरू आहे. अशा संस्थेला मुंबई महापालिकेने हे काम देणे म्हणजे एक प्रकारे त्यांच्या वैधतेवर शिक्कामोर्तब करण्यासारखे आहे. या सर्व प्रकाराला मुख्यमंत्र्यांची सहमती आहे का? आणि नसेल तर ज्यांनी याबाबतचा निर्णय केला आहे त्यांच्यावर काय कारवाई करणार? आणि हा निर्णय मागे घेणार का? असा प्रश्नही देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

अन फडणवीस अडकले आपल्याचं आरोपात
एकीकडे देवेंद्र फडणवीस मुंबई महापालिकेवर टीका करत असताना भाजपची सत्ता असलेल्या पुणे महापालिकेनेही पीएफआयसोबत करार केला होता. या मुद्यावरून फडणवीस यांची चांगलीच नामुष्की झाली. दरम्यान, फडणवीसांनी पीएफआयवर आक्षेप घेतल्यानंतर पुणे महापालिकेने पीएफआयसोबतचा करार तडकाफडकी रद्द केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

अमेझॉन ‘या’ भारतीय कंपनीत करणार तब्बल २ अब्ज डॉलरची गुंतवणूक

नवी दिल्ली । रिलायन्स जिओ पाठोपाठ आता आणखी एका भारतीय कंपनीत मोठी परदेशी गुंतवणूक होण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील ई-कॉमर्स क्षेत्रात काम करणारी अमेझॉन कंपनी देशातील भारती एअरटेल मधील सर्वात मोठा हिस्सा खरेदी करू शकते. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अमेझॉन एअरटेलमधील २ अब्ज डॉलर इतका हिस्सा खरेदी करू शकते.

एअरटेल आणि अमेझॉन यांच्यातील हा करार झाला तर देशातील तिसरी मोठी दूरसंचार कंपनीत अमेझॉनची सध्याच्या बाजारभावाने ५ टक्के हिस्सेदारी होईल. एअरटेलचे भारतात ३० कोटी ग्राहक आहेत. देशात सर्वात जास्त ग्राहक रिलायन्स जिओकडे आहेत. एअरटेल आणि अमेझॉनमधील कराराची चर्चा अशा वेळी सुरू झाली आहे जेव्हा जगातील अनेक कंपन्या रिलायन्सचा जिओ कंपनीत गुंतवणूक करत आहेत. भारतात जिओ आणि एअरटेलमध्ये जोरदार स्पर्धा आहे.

रॉयटर्सनुसार एअरटेल आणि अमेझॉन यांच्यात कराराची चर्चा प्राथमिक अवस्थेत आहे. सध्या ही चर्चा गोपनीय आहे. आम्ही भविष्यात काय करणार आहोत आणि काय नाही याबद्दल कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करत नाही, असे अमेझॉनच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान, एअरटेल आणि अमेझॉन यांच्यात जर २ अब्ज डॉलरचा करार झाला तर भारतीय बाजारात एअरटेल आणि जिओमधील स्पर्धा अधिक चुरशीची होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”