Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 5827

राज्यात आज दिवसभरात सापडले १ हजार २१६ नवीन रुग्ण; एकूण रुग्णसंख्या १७ हजार ९७४ वर

मुंबई । राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या १७ हजार ९७४ झाली आहे. आज १२१६ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात आज २०७ कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३३०१ रुग्ण बरे झाले आहेत. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या २ लाख ०२ हजार १०५ नमुन्यांपैकी १ लाख ८३ हजार ८८० जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करिता निगेटिव्ह आले आहेत तर १७ हजार ९७४ जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात २ लाख १२ हजार ७४२ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून १३ हजार ४९४ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यातील विविध रुग्णालयात भरती असलेल्या ८८१६ रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या तीव्रतेनुसार विश्लेषण केले असता पुढील निष्कर्ष समोर आले आहेत –
– या एकूण भरती रुग्णांपैकी ५२२८ ( ५९ टक्के) रुग्ण हे लक्षणे विरहित आहेत.
– ३२०९ (३६ टक्के) रुग्ण हे सौम्य ते मध्यम लक्षणे असणारे आहेत. तर
– ४२४ ( ५ टक्के) रुग्ण हे गंभीर स्वरुपाचे असून त्यातील २३६ ( ३ टक्के) रुग्ण ऑक्सिजनची आवश्यकता असणारे आहेत तर ९२ (१ टक्के) रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता लागलेली आहे. उर्वरित ९६ रुग्ण इतर कारणांमुळे अतिदक्षता विभागात भरती आहेत.

आज राज्यात ४३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण संख्या ६९४ झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईमधील २४, पुण्यातील ७ , वसई विरार मध्ये ५, सोलापूर शहरात २, अकोला शहरात १, पालघरमध्ये १ आणि औरंगाबाद शहरात १ मृत्यू झाला आहे. याशिवाय मणिपूरमधील १ आणि बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी २४ पुरुष तर १९ महिला आहेत. आज झालेल्या ४३ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील २५ रुग्ण आहेत तर १४ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर ४ जण ४० वर्षांखालील आहे. ४३ रुग्णांपैकी २९ जणांमध्ये ( ६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड १९ मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता ६९४ झाली आहे.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: ११ हजार ३९४ (४३७)
ठाणे: ९३ (२)
ठाणे मनपा: ६५० (८)
नवी मुंबई मनपा: ६५९ (४)
कल्याण डोंबिवली मनपा: २६३ (३)
उल्हासनगर मनपा: १४
भिवंडी निजामपूर मनपा: २१ (२)
मीरा भाईंदर मनपा: १८९ (२)
पालघर: ४६ (१)
वसई विरार मनपा: १८७ (९)
रायगड: ७६ (१)
पनवेल मनपा: १२५ (२)
ठाणे मंडळ एकूण: १३,७१७ (४७२)

नाशिक: ४७
नाशिक मनपा: ५४
मालेगाव मनपा: ४३२ (१२)
अहमदनगर: ४४ (२)
अहमदनगर मनपा: ०९
धुळे: ८ (२)
धुळे मनपा: २४ (१)
जळगाव: ६४ (११)
जळगाव मनपा: १४ (२)
नंदूरबार: १९ (१)
नाशिक मंडळ एकूण: ७१५ (३१)

पुणे: १०५ (४)
पुणे मनपा: १८९९ (१२२)
पिंपरी चिंचवड मनपा: १२५ (३)
सोलापूर: ६
सोलापूर मनपा: १७७ (१०)
सातारा: ९४ (२)
पुणे मंडळ एकूण: २४०६ (१४१)

कोल्हापूर: १० (१)
कोल्हापूर मनपा: ६
सांगली: ३२
सांगली मिरज कुपवाड मनपा: ३ (१)
सिंधुदुर्ग: ४ (१)
रत्नागिरी: १६ (१)
कोल्हापूर मंडळ एकूण: ७१ (३)

औरंगाबाद:३
औरंगाबाद मनपा: ३९७ (१२)
जालना: ८
हिंगोली: ५८
परभणी: १ (१)
परभणी मनपा: १
औरंगाबाद मंडळ एकूण: ४६८ (१३)

लातूर: २५ (१)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: ३
बीड: १
नांदेड: ३
नांदेड मनपा: २९ (२)
लातूर मंडळ एकूण: ६१ (३)

अकोला: ९ (१)
अकोला मनपा: ९० (९)
अमरावती: ४ (१)
अमरावती मनपा: ६९ (९)
यवतमाळ: ९३
बुलढाणा: २४ (१)
वाशिम: १
अकोला मंडळ एकूण: २९० (२१)

नागपूर: २
नागपूर मनपा: २०४ (२)
वर्धा: ०
भंडारा: १
गोंदिया: १
चंद्रपूर: १
चंद्रपूर मनपा: ३
गडचिरोली: ०
नागपूर मंडळ एकूण: २१२ (२)

इतर राज्ये: ३४ (८)
एकूण: १७ हजार ९७४ (६९४)

( टीप – आय सी एम आर पोर्टलवर बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आज रोजी दाखविण्यात आलेल्या नवीन ८२६ रुग्णांपैकी १४६ रुग्णांचा समावेश रिकांन्सेलेशन अभावी वरील तक्त्यामध्ये करण्यात आलेला नाही.

(ही माहिती केंद्र सरकारच्या कोविड १९ पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. सदरील अहवाल आयसीएमआर टेस्ट आय डी १३६२०२३ पर्यंतचा आहे. राज्यातील बृहन्मुंबई महानगरपालिका वगळता उर्वरित सर्व महानगरपालिका आणि जिल्ह्यांची आकडेवारी डेटा क्लिनिंगनुसार आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या प्रगतीपर आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.यापूर्वी कळविण्यात आलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक मृत्यू मुंबई मनपा क्षेत्रातील असल्याने तो आज मुंबईमध्ये दर्शविण्यात आला आहे.)

कोरोनाला पराभूत करण्यासाठी सरकारचा ‘हा’ मास्टर प्लान, राजेश टोपेंची माहिती

Rajesh Tope

मुंबई । मुंबईमध्ये संस्थात्मक क्वारंटाईनवर भर देण्यासाठी आक्रमकपणे पावले उचलणे आवश्यक असून त्यासाठी मुंबई महापालिका आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. राज्यात सहा जिल्हे ग्रीन झोन मध्ये असून ते पुन्हा ऑरेंज झोन मध्ये जाणार नाहीत आणि ऑरेंज झोन मधील जिल्ह्यांचा रेड झोनकडे प्रवास होणार नाही यासाठी कंटेंटमेंट झोन मधील नियमांचे काटेकोरपणे पालन आवश्यक असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे सांगितले. थोडक्यात टोपे यांनी कोरोनाला पराभूत करण्यासाठी काही विशेष निर्णय घेत अधिकाऱ्यांना तशा सूचना केल्या आहेत.

आरोग्यमंत्र्यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. त्यातील महत्त्वाचे मुद्दे असे –

– केंद्राचे पथक राज्याच्या दौऱ्यावर आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमवेत या पथकाची बैठक झाली. त्यांनी मुंबईमध्ये दाट लोकवस्तीतील पॉझिटिव्ह रुग्णांपासून निकट सहवासितांना होणारा संसर्ग टाळण्यासाठी संस्थात्मक क्वारंटाईन करणे आवश्यक असल्याच्या मुद्यावर भर दिला. त्याप्रमाणे मुंबई महापालिकेला सूचना देण्यात आल्या असून आता अधिक आक्रमकपणे संस्थात्मक क्वारंटाईनसाठी कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी मैदाने, हॉल घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.
– मुंबईत रुग्णवाढीचा गणितीशास्त्रानुसार जो अंदाज मांडला जात आहे त्याकडे राज्य शासन दुर्लक्ष करीत नाही. मात्र रुग्णसंख्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर वाढत नाही.
– कंटेंटमेंट झोनमधील नागरिकांनी नियमांचे आणि सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. या भागातील नगरिकांनी अधिक जागरूक राहून संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
– मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स, बीकेसी, गोरेगाव येथे रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असून त्याद्वारे सुमारे २००० नवीन खाटा उपलब्ध होणार आहेत.
– राज्यात सध्या ६४ प्रयोगशाळा असून त्या माध्यमातून दिवसाला सुमारे ९ ते १० हजार चाचण्या होत आहेत.
– प्रयोगशाळांवरील चाचण्यांचा भार कमी करण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णांच्या १४ दिवसानंतर करण्यात येणाऱ्या दोन चाचण्यांचा कालावधी कमी करून तो सात दिवसांवर किंवा १० दिवसांवर आणावा का? किंवा दोन ऐवजी एकच चाचणी करावी का याबाबत आयसीएमआर कडून लवकरच मार्गदर्शक सूचना प्राप्त होतील.
– लक्षणे असल्यास ती समाजाच्या भीतीने ती लपवू नका. संसर्ग टाळण्यासाठी पुढे येऊन लवकर निदान करून घ्या. समाजाचे नुकसान होऊ देऊ नका. लोकांमध्ये जागरूकता आणण्यासाठी वर्तणुकीतील बदलाबाबत जाणीवजागृती केली जात आहे.
– आरोग्य विभागातील एकही जागा रिक्त राहणार नाही. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य, वैद्यकीय शिक्षण विभागातील रिक्त पदे भरण्यासाठी मान्यता मिळाली आहे.
– लॉकडाऊनच्या काळात तंत्रज्ञानाच्या मदतीने पदभरतीचे काम केले जाईल.
– कोरोना वगळता अन्य आजारांच्या रुग्णांवर उपचार शस्त्रक्रिया होणे आवश्यक आहे.
– खासगी रुग्णालयांनी कोरोनाच्या रुग्णांकडून मनमानी पद्धतीने बिल आकारणी करू नये यासाठी राज्य शासनाने अशा मनमानी आकारणीला चाप लावण्याचं काम केले आहे.
– लॉकडाऊनच्या काळात आपल्या गावी जाऊ इच्छिणारे स्थलांतरित कामगार, लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या व्यक्ती यांना प्रवास सुरु करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय तपासणी मोफत केली जाणार आहे.

सातारा जिल्ह्यात संध्याकाळी पुन्हा 2 नवे कोरोनाबाधित; एकूण रुग्णसंख्या 114 वर

सातारा प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत आज मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. सकाळी कराड येथे 2 आणि सातारा येथ 1 जण असे एकूण ३ कोरोना पोझिटीव्ह रुग्ण सापडले होते. त्यानंतर दुपारी कराड येथे 12 आणि सातारा येथे 5 असे 17 जण कोरोना बाधित असल्याचे समोर आले. त्यानंतर आता संध्याकाळीही जिल्ह्यात दोन नवे कोरोनाग्रस्त सापडले असल्याची माहिती समोर आली आहे. खावली येथील संस्थात्मक विलगीकरण केलेल्या 18 वर्षीय युवक आणि कराड येथील कोरोना बाधिताचा 59 वर्षीय निकट सहवासित पुरुषाचा अहवाल कोरोना (कोविड-19) बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

सदर 18 वर्षीय कोरोना बाधित युवक हा 27 एप्रिल रोजी विनापरवाना मुंबईहून आला होता. त्याच्यावर पोलीसांनी जागेवर गुन्हा दाखल केला आणि तिथूनच सातारा तालुक्यातील खावली येथे संस्थात्मक विलगीकरणामध्ये त्याला ठेवण्यात आले होते. त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आला होता. हा मुलगा कोरोनाबाधित असल्याचा अहवाल पुणे येथून प्राप्त झाला आहे. तर कराड येथील 59 वर्षीय पुरुष हा कोरोना बाधित व्यक्तीचा निकट सहवासित आहे.

दरम्यान, ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 114 वर पोहोचली आहे. यातील तब्ब्ल 85 रुग्ण हे एकट्या कराड तालुक्यात आहेत. तसेच यापैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 98, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 14, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत. आज एकाच दिवशी कराड तालुक्यात एकूण 15 कोरोना रुग्ण सापडले आहेत. तर सातारा येथे आज दिवसभरात एकूण ७ जण कोरोना बाधित सापडले असल्याचे समोर आले. एवढ्या मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडण्याची जिल्ह्यातील हि पहिलीच वेळ असून सातारकरांची हि धोक्याची घंटा समजली जात आहे.

कोरोनाग्रस्त महिलेला रुग्णालयात चालत जावं लागण्यावर गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई म्हणतात..

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कोरोनाग्रस्त महिलेला रुग्णालयात पायी चालत नेल्याचा धक्कादायक प्रकार कराड येथे गुरुवारी दुपारी घडला. सदर घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर समाजाच्या अनेक स्तरांतून यावर तीव्र शब्दांत प्रतिक्रिया प्राप्त झाल्या. आता राज्याचे गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई यांनी यावर आपले मत व्यक्त केले आहे. याबाबत कोण दोषी आहे याबाबत शोध घेण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती देसाई यांनी दिली आहे.

कोरोनाबाधित रुग्णांना दवाखान्यापर्यंत नेण्या आणण्यासाठी शासनाकडून रुग्णवाहिकेची व्यवस्था करण्यात येते. मात्र कराड येथील सदर महिलेला रुग्णवाहिका का उपलब्ध झाली नाही याबाबत प्रांत अधिकाऱ्यांकडून चौकशी केली जाणार आहे. रुग्णवाहिका उपलब्ध असूनही ती पुरवण्यात आली नाही का? कोणामुळे वाहन उपलब्ध झाले नाही? याबाबत आपण सखोल चौकशी करणार आहोत असंही देसाई यांनी यावेळी सांगितले. तसेच सदर प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आढळेल त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल आणि यापुढे असा प्रकार कोठेही होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल असे देसाई यांनी सांगितले आहे.

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच असून आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल २२ नवे कोरोना रुग्ण सोडले आहेत. सातारा जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता ११४ वर पोहोचली असून कराड तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या ८५ वर पोहोचली आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/2852157018200925/

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/239608223778118/

ऐकावं ते नवलंच! महिला खासदाराने दिला मुलीला जन्म, नाव ठेवले ‘कोरोना’

कोलकाता । देशात कोरोनाचं संकट वाढत आहे. लॉकडाऊनमुळं सर्वत्र जनजीवन विस्कळीत झालं आहे. घराबाहेर पडण्यासाठी लोकांना मनाई आहे. भारतात रोज कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. संपूर्ण देशात भय आणि अनिश्चिततेचं वातावरण आहे. अशा काळात अनेक रंजक आणि आश्चर्यकारक वार्ता ऐकायला मिळत आहेत. अशीच एक वार्ता पश्चिम बंगालमधून समोर आली आहे. तृणमूल काँग्रेस पक्षाच्या एका महिला खासदाराने मुलीला जन्म दिला आहे. मुलीला जन्म दिला यात आनंदाचीच गोष्ट आहे. पण त्याहीपेक्षा रंजक आणि नवलाईची बाब म्हणजे या मुलीचं महिला खासदाराने ठेवलेलं नाव. या मुलीचं नाव ‘कोरोना’ असं ठेवण्यात आलं आहे.

पश्चिम बंगालच्या हुगली जिल्ह्यात जन्मलेल्या या मुलीचं उपनाव कोरोना ठेवण्यात आलं आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार अपरूपा पोद्दार आई झाल्या आहेत. संपूर्ण जग कोरोनाशी लढत असताना अपरूपा यांनी आपल्या नवजात मुलीचं उपनाव ‘कोरोना’ असं ठरवलं. महत्त्वाचं म्हणजे अपरूपा यांचे देखील २ नावं आहेत. अपरूपा पोद्दार यासह त्या आफरीन अली या नावानं देशील ओळखल्या जातात. अपरूपा याचे पती शकीर अली यांनी म्हटलं की, ‘आमच्या येथे मुलीचा जन्म झाला आहे. हे आमचं दुसरं अपत्य आहे. ती कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागू असल्याचं तीचं उपनाव कोरोना असेल.’

पण मुलीचं मुख्य नाव ठेवण्यासाठी त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडे नाव सुचवण्याची विनंती केली आहे. मुलीचं नाव मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सुचवण्यावरुन ठेवण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. अपरूपा ह्या पश्चिम बंगालमधील आरामबाग लोकसभा मतदारसंघामधून खासदार म्हणून दुसऱ्यांदा निवडून आल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

आमच्याकडून राजकारण होणार नाही; तुम्ही विनाकारण केंद्राकडे बोट दाखवू नका- देवेंद्र फडणवीस

मुंबई । । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये जमलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. या बैठकीत भाजप नेते तथा राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनासंबंधीच्या उपाययोजनांना संदर्भात राज्य सरकारला बऱ्याच सूचना केल्या. यावेळी बोलताना फडणवीस यांनी कोरोना काळात भाजपा राजकारण करत असल्याच्या आरोपावर सुद्धा टिप्पणी केली.

‘ही राजकारण करण्याची वेळ नाही, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सांगत असतात. आम्ही सरकारसोबत आहोत. आमच्याकडून राजकारण होणार नाही. आम्ही ते पाळतो. पण सत्ताधाऱ्यांनीही याचं पालन केलं पाहिजे. वारंवार आणि विनाकारण केंद्र सरकारकडं बोट दाखवणं योग्य नाही,’ असं फडणवीस यावेळी म्हणाले. ‘मुंबई आणि राज्यातील आरोग्य परिस्थितीवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णालय व्यवस्थापन ठीक करण्याची गरज असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं.

गंभीर रुग्णांना सेवा मिळाली पाहिजे. आजारी पडणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी काहीतरी नियोजन करावे लागेल, असंही फडणवीस यांनी मुख्यमंत्र्याना सूचवलं. इतर रुग्णांना उपचार, त्यांच्यासाठीच्या खाटांची तसंच इतर माहिती डॅशबोर्डच्या माध्यमातून मिळावी. विरोधी पक्ष म्हणून आम्ही पूर्णपणे सरकारच्या पाठिशी आहोत, आमच्याकडून राजकारण होणार नाही, असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

सह्याद्री वाहिनीवरील ७ च्या बातम्या देणाऱ्या ‘या’ वृत्तनिवेदिकेच निधन

मुंबई । दूरदर्शन सह्याद्री वाहिनीच्या माजी वृत्तनिवेदिका मालविका मराठे यांचं आज दुपारी प्रदीर्घ आजारानं निधन झालं. त्या ५३ वर्षांच्या होत्या. गेल्या वर्षभरापासून मालविका यांना मेंदूच्या कर्करोगानं ग्रासलं होतं. दरम्यान, आज याच आजारामुळ त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या कारकिर्दीच्या सुरवातीला मालविका मराठे मुंबई आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक कार्यरत होत्या. आकाशवाणीत उद्घोषक म्हणून काम करत असतानाच, त्यांनी अनेक नाटकांमधेही भूमिका केल्या होत्या. त्यानंतर त्या १९९१ साली दूरदर्शनच्या वृत्त विभागात रुजू झाल्या.

१९९१ ते २००१ पर्यंत दूरदर्शनच्या वृत्तविभागात तब्बल १० वर्षे काम केल्यानंतर त्यांनी दूरदर्शनवरच्याच ‘हॅलो सखी’ या लोकप्रिय कार्यक्रमाचं सलग १२ वर्ष सूत्रसंचालनही केलं. केवळ वृत्तसंपादक आणि उद्घोषक हीच त्यांची ओळख नव्हती तर, अनेक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या होत्या. अलिकडंच नव्या संचात आलेल्या ‘मोरुची मावशी’ या नाटकातही त्यांनी भूमिका साकारली होती. मालविका यांनी अनेक मालिकांमधेही त्यांनी काम केलं होतं. अनेक रंगमंचीय कार्यक्रमाच्या सूत्रसंचालक आणि निवेदिकेची जबाबदारीही त्यांनी पार पाडली होती. मालविका यांच्या निधनावर त्यांचे सहकारी आणि वृत्त क्षेत्रातील मंडळींनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

कामगारांना घरी जाण्यासाठी आता मेडिकल सर्टिफिकेटची गरज नाही; सरकारनं घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई । राज्यात विविध ठिकाणी अडकलेल्या परप्रांतीय मजूर, कामगारांना त्यांच्या मूळ गावी सोडण्यासाठी विशेष ट्रेन आणि बसेसचीही व्यवस्था केली जात आहे. मात्र प्रवासासाठी संबंधित व्यक्तीकडे डॉक्टरचं सर्टिफिकेट असणे गरजेचं होतं. त्यामुळे हे सर्टिफिकेट मिळवण्यासाठी घरी जाण्यासाठी उत्सुक असलेल्या लोकांची डॉक्टरांकडे रांग लागली होती. अनेक ठिकाणी या गरजू मजूर, कामगारांची लूटही होत होती. हीच बाब लक्षात घेत या मजुरांची, कामगारांचं प्रवासाआधी विनाशुल्क मेडिकल चेकअप होणार आहे.

प्रवास सुरु करण्यापूर्वी या मजूर, कामगारांची डिजिटल थर्मोमीटरच्या साहाय्याने स्क्रीनिंग होणार आहे. यासाठी या प्रवाशांकडून कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. यासाठी सरकार किंवा महापालिकेच्या डॉक्टरांची त्याठिकाणी नेमणूक केली जाणार आहे. संपूर्ण तपासणी झाल्यानंतर कोणतीही ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं नसलेल्यांना प्रवासाची परवानगी दिली जाणार आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी यासंबंधीचे निर्देश दिले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

धक्कादायक! कोरोना बाधित महिलेला एम्ब्युलन्सविना चालवत नेले दवाखान्यात; कराडातील लज्जास्पद घटना

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच प्रशासनाचा ढिसाळ कारभार समोर येत आहे. गुरुवारी माणुसकीला काळीमा फासणारी आणि प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आणणारी घटना समोर आली आहे. कराडा तील एका कोरोना बाधित महिला रुग्णाला तिच्या घरापासून पायी चालवत उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. दिवसाढवळ्या घडलेल्या या प्रकाराने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

कराडमध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गुरुवारी शहरासह तालुक्यात 16 नव्या रुग्णांची भर पडली. या रुग्णांमध्ये कराड शहरातील एका महिलेचा समावेश आहे. या सर्वांचे कोरोना पॉझिटिव्ह अहवाल गुरुवारी दुपारी प्रशासनाला प्राप्त झाले. त्यानंतर घरामध्ये असणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रशासनाने हालचाली सुरू केल्या. शहरातील महिला रुग्णाला ही उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी संबंधित महिलेच्या घरी गेले. संबंधित महिलेला घरातून बाहेर बोलावून पायी चालवत तिच्या घरापासून रुग्णालयापर्यंत नेण्यात आले.

हा धक्कादायक प्रकार पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त करीत जाब विचारला. त्यावेळी रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचे हास्यास्पद कारण प्रशासनाकडून देण्यात आले. कोरना बाधित रुग्णाला पायी चालवत रुग्णालयापर्यंत नेल्याची देशातील तसेच राज्यातील ही बहुदा पहिलीच घटना असावी. या घटनेने माणुसकीला काळीमा फासण्या बरोबरच प्रशासनाचा बेजबाबदार कारभार चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे सदर व्हिडिओमध्ये कोरोनाबाधित महिलेच्या घराशेजारीच एक एम्ब्युलन्स उभी असलेली दिसत आहे. मात्र कोरोनाच्या भीतीपोटी यावेळी कोणीही समोर आले नसल्याचे समजत आहे.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/239608223778118/

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज उद्धव यांना, म्हणाले बंधू ‘हे’ कराच…

मुंबई । राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवली होती. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मंत्रालयामध्ये जमलेल्या सर्व पक्षांच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. या बैठकीनंतर राज ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आजच्या बैठकीत केलेल्या सूचनासंदर्भात माहिती दिली. यावेळी त्यांनी खाली दिलेल्या मुद्यांवर सरकारचे लक्ष वेधत सूचना केल्या..

१)मागील दीड महिन्यापासून नियुक्त करण्यात आलेले पोलीस थकलेले आहेत. पोलिसही अतिरिक्त कामामुळे तणावाखाली आहेत. सध्या रमजानचा काळ सुरु आहे. महाराष्ट्रातील काही भागांमध्ये काहीजण पोलिसांना अगदीच गृहीत धरायला लागलेत. अशा ठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाची (एसआरपीएफ) नेमणूक करावी.

२)एसआरपीएफच्या तुकड्या तैनात केल्याने पोलिसांना गृहीत धरल्या जाणाऱ्या भागांमध्ये दरारा निर्माण होऊन लोकं घाराबाहेर येणार नाहीत. सध्याचा काळ हा रमजानचा असून अनेक लोकं घराबाहेर येतायत. आपण अनेक सण घरामध्ये साजरे केले. मुस्लीम समाजाने या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे. विचार होत नसेल तर अशा ठिकाणी अतिरिक्त फोर्स लावणे गरजेचे आहे.

३)छोटे दवाखाने सुरु करावेत अनेक ठिकाणी काहीजण आजारी पडत आहेत. त्यांना समज नाहीय की यासंदर्भात कोणाकडे जावे. अनेक दवाखाने बंद आहे. त्यामुळे हे छोटे दवाखाने फायद्याचे ठरतील. हे दवाखाने सुरु करताना तिथे एखादा पोलीस नियुक्त करावा. म्हणजे जास्त गर्दी झाल्यास तो त्यावर नियंत्रण करता येईल.

४)स्पर्धा परिक्षांसाठी आलेल्या तसेच हॉस्टेलमध्ये अडकलेल्यांसाठी काय व्यवस्था करता येईल यासंदर्भात सरकारने त्वरित निर्णय घ्यावा.

५)परप्रांतीय कामगारांची तपासणी केल्याशिवाय त्यांना राज्यात घेऊ नये. त्या राज्यांमध्ये काय परिस्थिती असेल आपल्याला ठाऊक नाही. कारण इथे चाचण्या होत आहे आपण बघतोय पण तिकडे काय परिस्थिती आहे आपल्याला माहित नाही. ज्या पद्धतीने ते महाराष्ट्रातून बाहेर गेलेत. ते परत येतील तेव्हा तपासणीशिवाय त्यांना प्रवेश देऊ नये.

६) परप्रांतीय परत आल्यानंतर त्याचवेळी त्यांची राज्य स्थलांतरित कायद्याखाली नोंदणी करुन घ्यावी. हीच ती योग्य वेळ आहे कारण हे नंतर करता येणार नाही. आजपर्यंत या सर्व गोष्टींमध्ये गोंधळ झाला होता. मात्र तो गोंधळ सुधारण्याची ही वेळ आहे असं मला वाटतं.

७)जे परप्रांतिय परत गेले आहेत त्यांच्यामध्ये महाराष्ट्रातील उद्योग आणि कारखाने बंद व्हायला नको. यासाठी महाराष्ट्रातील जे तरुण तरुणी आहेत त्यांची नोंद करुन जिथे जिथे रोजगार उपलब्ध आहेत त्यासंदर्भातील माहिती या रोजगाराची गरज असणाऱ्यांपर्यंत पोहचवावी.

८)मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भामधील तरुणांना रोजगार कुठे उपलब्ध आहे माहित नसतं. तर आज परप्रांतीय बाहेर गेले आहेत या पार्श्वभूमीवर रोजगार कुठे उपलब्ध आहे हे या मुलांने कळवावे जेणे करुन त्यांना रोजगार उपलब्ध होईल. आज अगदी भाजी विकणाऱ्यांपासून ते कारखान्यामध्ये काम करणाऱ्यांपर्यंत अनेकजण बाहेर गेले आहेत आणि स्थानिकांना रोजगार देण्याची संधी आहे तर ती महाराष्ट्र शासनाने घालवू नये.

९)जून महिन्यामध्ये कशापद्धतीने शाळा सुरु करणार. इ-लर्निंगवगैरे सारख्या गोष्टी सगळ्या ठिकाणी शक्य नाही. तर शाळा कशा सुरु करणार यासंदर्भातील माहिती पालकांना देणे गरजेचे आहे. यासंदर्भात निर्णय घ्यावा.

१०)आज मे महिना आहे. जून महिन्यामध्ये शाळांच्या अडमिशन्स सुरु होतात. तर त्या कशा होणार याबद्दलची माहिती पालकांना कळवण्यात यावी.

११)पालिका कर्मचारी, सरकारी कामगार, सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने मिळत नाहीयत. एक एक मास्क पाच पाच सहा सहा वेळा वापराल जातोय. ही गोष्ट योग्य नाही. सफाई कामगार आजारी पडतायत. त्यांनी हात वर केल्यास काय होणार? सर्व शहरे अस्वच्छ होतील. तर अशा लोकांकडे बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे.

१२)लॉकडाउनचा एक्झीट प्लॅन काय आहे? १५ दिवसांनी किंवा कधीही लॉकडाउन काढावा लागणार. लस येत नाही तोपर्यंत लॉकडाउन ठेवता येणार नाही. लॉकडाउन काढायच्या १० ते १५ दिवस आधी लोकांना सांगणे गरजेचे आहे. कशा पद्धतीने पुढे जायचं आहे, पुढे कसं जायचं आहे, एक दिवस सुरु केलं दुसऱ्या दिवशी बंद असं चालणार नाही. एक्झीट प्लॅन राज्य सरकारने लोकांसमोर ठेवावा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”