Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5865

हुर्रे! मुंबईत कोरोनाबधितावर केलेली पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

नाशिक । मुंबईमधील लिलावती रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णावर करण्यात आलेली पहिली प्लाझ्मा थेरपी  यशस्वी झाली असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना राजेश टोपे यांनी ही माहिती दिली.

“लिलावती रुग्णालयात दाखल करोनाबाधित रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आलेली असून त्यात यश मिळालं आहे. मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी मला ही थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती दिली आहे. आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. नायर रुग्णालयातील डॉक्टरांनीही आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे,” अशी माहिती टोपे यांनी माध्यमांना यावेळी दिली.

दरम्यान, ”ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचं पालन करणं गरजेचं आहे. त्यांचं पालन केलं तरच थेरपी यशस्वी होत असल्याचं मला सांगण्यात आलं आहे. पुण्यातही हा प्रयोग करणं शक्य आहे”. असंही राजेश टोपे यांनी सांगितलं. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात झालेल्या बैठकीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांसोबत गृहमंत्री अनिल देशमुख, कृषीमंत्री दादाजी भुसे, पोलीस आयुक्त, मनपा आयुक्त,जिल्हाधिकारी,जिल्हा आरोग्यधिकारी व इतर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

काय आहे प्लाझ्मा थेरपी
कॉनव्हॅलसंट प्लाझ्मामध्ये करोना व्हायरसमधून बऱ्या झालेल्या रुग्णांच्या शरीरातील अ‍ॅंटीबॉडीज असलेले रक्त काढून ते करोनाग्रस्त रुग्णांवर वापरले जाते. Covid-19 चे रुग्ण या नव्या थेरपीला चांगला प्रतिसाद देत असून ही उपचार पद्धती लागू पडत असल्याचे अमेरिकन जर्नलमध्ये म्हटले आहे. सर्वप्रथम चीनमध्ये या थेरपीने उपचार करण्यात आले. चीनमध्ये करोनाची लागण झालेल्या पाच रुग्णांची प्रकृती अत्यंत गंभीर होती. पण १२ दिवसांच्या आत त्या सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. नव्या उपचार पद्धतीमध्ये करोनाची बाधा झालेल्या रुग्णांवर करोना मुक्त रुग्णाचे रक्त वापरण्यात येते. करोना व्हायरसच्या रुग्णांसाठी हा एक आशेचा किरण आहे असे या उपचार पद्धतीचे नेतृत्व करणाऱ्या एका डॉक्टराने सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की…! – वरुण सरदेसाई यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। “बरं ते जॅकेट कायमचं उतरलं आहे की हा ‘लॉकडाउन लूक’ आहे ?”, असं ट्विट करत युवासेनेचे नेते आणि सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्विट करत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खरमरीत टोला लगावला आहे. राज्यातील करोनाग्रस्तांचा आकडावा वाढत असतानाचा दुसरीकडे राजभवन आणि मंत्रालयातील संघर्ष वाढतानाचा दिसत आहे. यावरुनच सरदेसाई यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे.

दरम्यान या मोठ्या संकटात राज्याला स्थैर्याची गरज असल्याने घटनात्मक पेच टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेवर नियुक्ती करण्याची शिफारस महाविकास आघाडीने केली आहे. यासंदर्भात महाविकास आघाडीतील मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. दरम्यान, त्याआधी मंगळवारी दुपारच्या सुमारास फडणवीस यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन असून राज्य सरकारला जाब विचारण्याची मागणी केली.

राज्यात अघोषित आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण करुन पत्रकार-संपादकांमध्ये दहशत निर्माण केली जात असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे. माध्यमांची मुस्कटदाबी आणि अभिव्यक्तीची गळचेपी थांबवा अशी मागणी यावेळी त्यांनी केली. यावरूनच वरुण सरदेसाई यांनी फडणवीसांना खरमरीत टोला लगावला आहे.

10 महिन्याच्या बाळाने आणि 78 वर्षीय वृद्धेने ‘कृष्णा’च्या सोबतीने जिंकली कोरोनाची लढाई..

कराड प्रतिनिधी। सकलेन मुलाणी

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या 3 कोरोनाग्रस्त रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने आज या तिन्ही कोरोनामुक्त रूग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आज डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांमध्ये सर्वात कमी वयाचा पेशंट म्हणजेच डेरवण येथील अवघे 10 महिन्याचे बाळ आणि सर्वात वयोवृध्द पेशंट म्हणजेच म्हारुगडेवाडी (ता. कराड) येथील 78 वर्षीय महिलेसह ओगलेवाडी (ता. कराड) येथील 28 वर्षीय युवकाचा समावेश आहे. या तिन्ही रुग्णांनी कृष्णा हॉस्पिटलच्या सोबतीने कोरोनावर केलेली मात प्रेरणादायी असून, आजच्या या घटनेमुळे कराड तालुक्याला मोठा दिलासा मिळाला आहे.

कराड येथील कृष्णा हॉस्पिटलमध्ये 11 एप्रिल रोजी ओगलेवाडी येथील एक 28 वर्षीय युवक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने उपचारासाठी दाखल झाला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 12 एप्रिलला डेरवण येथील एक 10 महिन्याचे बाळ कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात खूपच हळहळ व्यक्त केली जात होती. त्यातच पुन्हा म्हारुगडेवाडी येथील कोरोनामुळे मृत झालेल्या व्यक्तीच्या, 78 वर्षीय आईचा अहवाल 15 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह आढळला. या तिघांवरही कृष्णा हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.

गेल्या आठवड्यात कराड तालुक्यातील तांबवे येथील युवक कोरोनामुक्त झाल्यानंतर आता या 10 महिन्याच्या बाळावर आणि 78 वर्षीय महिलेवर उपचार करून त्यांना कोरोनामुक्त करणे हे मोठे आव्हान होते. पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य व यशस्वी उपचार करत, हे आव्हान यशस्वीपणे पार पाडत आज 10 वर्षे वयाच्या बाळासह 78 वर्षीय वृद्धेलाही कोरोनाच्या विळख्यातून वाचविले. तसेच 28 वर्षीय युवकावरही यशस्वी उपचार करण्यात आले.

आज या तिन्ही रुग्णांना कृष्णा हॉस्पिटलच्या सर्व डॉक्टर्स, नर्स आणि अन्य स्टाफच्यावतीने टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी या तिन्ही रुग्णांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. याप्रसंगी कृष्णा अभिमत विद्यापीठाचे प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, सहायक कुलसचिव एस. ए. माशाळकर, कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, तहसीलदार अमरदीप वाकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्स व स्टाफ उपस्थित होता.

78 वर्षीय आज्जींचा उत्साह प्रेरणादायी..

म्हारुगडेवाडी येथील 78 वर्षीय आज्जींचा 15 एप्रिल रोजी कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आला. खरंतर त्यापूर्वी त्यांच्या 58 वर्षीय मुलाला कोरोनाचा लागण होऊन, त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण त्यांच्या आईलाही कोरोनाची लागण झाल्याने या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाड कोसळली. पण आज कोरोनामुक्त झालेल्या या आज्जीबाईंचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. सर्वांना हात करत आणि सर्वांच्या टाळ्या स्वीकार करत त्या चालल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर मुलाच्या जाण्याचे दुःख जरूर होतो, पण कोरोनाची यशस्वी लढाई जिंकल्याचा मनस्वी आनंदही प्रेरणा देणारा होता.

..अन चिमुकला खेळू लागला बाहुली संगे!

कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या 10 वर्षाच्या लहान बाळावर उपचार करून त्याला कोरोनामुक्त करणे हे मोठे आव्हान होते. पण कृष्णा हॉस्पिटलच्या टीमने अथक प्रयत्न करून या बाळाला आज कोरोनामुक्त केले. त्या मुलाला वॉर्डमधून डिस्चार्ज दिल्यानंतर त्याला डॉ. सुरेश भोसले यांनी बाहुली भेट दिली. जवळपास 15 दिवस हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी ऍडमिट असलेल्या या बाळाला बाहुली मिळाल्यावर त्याला झालेला आनंद त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट झळकत होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

लॉकडाऊनमुळे इरफानच्या अंत्यविधीला केवळ २० जणांना परवानगी

मुंबई । इरफान खान यांचं पार्थिव स्मशानात पोहोचलं असून मुंबई पोलिसांच्या कडक बंदोबस्तात त्यांचं पार्थिव सुपुर्द-ए-खाक करण्यात येईल. यावेळी चाहते किंवा सिनेसृष्टीतील कोणालाही स्मशानभूमी जवळ गर्दी करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. दुर्दैवानं लॉकडाऊन आडवा आल्यानं इरफानच्या चाहत्यांना त्याला शेवटचा निरोप देता येणार नाही आहे. मीडिया रिपोर्टनुसार, त्यांच्या अंत्यसंस्कारांसाठी कडक बंदोबस्त करण्यात आले असून अंत्यदर्शनासाठी चाहते किंवा कोणत्याही सेलिब्रिटीला तिथपर्यंत जाण्याची परवानगी नाही. त्यांच्या अंत्ययात्रेत फक्त २० जणांना जाण्याची परवानगी देण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांच्या देखरेखीखाली इरफान यांच्या पार्थिवाला सुपुर्द-ए-खाक करण्यात येईल. इरफान खान यांचं पार्थिव स्मशानभूमीत पोहोचलं असून अंधेरीतील यारी रोड, वर्सोवा स्मशानभूमीत दफन करण्याची तयारी पूर्ण झाली. फार कमी लोकांना इरफानच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. अंत्यसंस्कारांवेळी चाहते. मीडिया आणि सिनेसृष्टीतील इतर कोणत्याही व्यक्तीला गर्दी करण्याची परवानगी मुंबई पोलिसांनी दिली नाही.

बुधवारी २९ एप्रिलला बॉलिवूड स्टारचं निधन झालं. कोकिलाबेन इस्पितळात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. इरफान खानचं शव इस्पितळातून स्मशानात नेण्यात आलं आहे. न्यूरोएण्डोक्राइन ट्यूमरशी बॉलिवूड स्टारचा लढा अखेर अपयशी ठरला. एका हरहून्नरी कलाकाराला काळाने घाला टाकत सर्वांपासून कायमचं दूर नेलं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

देशात कोरोनाने घेतला 1 हजार जणांचा बळी

नवी दिल्ली । कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस भारतात वाढताना दिसतोय. लॉकडाऊनचा कालावधी संपत आला तरी कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश येत नाही आहे. भारतात या जीवघेण्या व्हायरसने आत्तापर्यंत १००० हून अधिक जणांचे बळी घेतले. धक्कादायक म्हणजे, यातील सर्वात जास्त मृत्यूची नोंद महाराष्ट्रात करण्यात आली आहे. महाराष्ट्रात ४०० जणांचा बळी गेला तर गुजरातमध्ये जवळपास १८१ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला. तसंच मध्य प्रदेशातील मृत्यूंची संख्या १२० वर पोहचली. देशात जवळपास ३१हजार ३३२ करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. या आजारातून जवळपासस ७ हजार ६९६ जण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत.

मंगळवारी महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ झाली आहे. केवळ मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे. मंगळवारी मुंबईत करोनाचे ३९३ नवे रुग्ण सापडले. तर मुंबईतील धारावी परिसरात ४२ नवे रुग्ण समोर आले आहेत. दरम्यान, १०६ रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहितीही आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

राजस्थानात अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या ‘घरवापसी’साठी राज्यातून ९२ बस रवाना

मुंबई । राजस्थानमधील कोटा येथे लॉकडाऊनमुळं अडकलेल्या महाराष्ट्रातील १ हजार ७८० विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्यातून ९२ बस रवाना झाल्या आहेत. आज रात्री या बस कोटा येथे पोहोचतील. राजस्थानच्या दिशेनं रवाना केलेल्या ९२ बसपैकी ७० बस या राज्य परिवहन विभागाच्या असून, उर्वरित बस खासगी आहेत. या बसेस रायगड आणि बीड जिल्ह्यातून सोडण्यात आल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

राज्य परिवहन मंडळाच्या बस आज, बुधवारी दुपारी धुळे येथून रवाना झाल्या आहेत. त्या रात्री राजस्थानला पोहोचतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. या बस विद्यार्थ्यांना घेऊन गुरुवारी कोटा येथून पुन्हा महाराष्ट्राकडे रवाना होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र ते कोटा या दरम्यानचा प्रवास साधारण १२ तासांचा आहे. प्रत्येक बसमध्ये दोन चालक असतील. परिवहन विभागानं या बससोबत ब्रेकडाऊन -मेंटेनन्स वाहनही पाठवलं आहे. या बस दोन ते तीन ठिकाणी थांबा घेतील, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

प्रवासादरम्यान बसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचं पालन करण्यात येणार आहे. प्रत्येक बसमध्ये १९ ते २० विद्यार्थी असतील. त्यांच्यासोबत सरकारी अधिकारीही असतील. राज्यात परतल्यानंतर संबंधित विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांच्या वैद्यकीय तपासण्या करून त्यांना १४ दिवस होम क्वारंटाइन करण्यात येईल. या बसमधून विद्यार्थ्यांना त्यांच्या जिल्ह्यांत पोहोचवण्यात येईल, अशी माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

इरफान खानच्या निधनाने राजकीय नेते मंडळी शोकाकुल; ‘यांनी’ वाहिली श्रद्धांजली

मुंबई । अष्टपैलू अभिनेता इरफान खान याचे आज मुंबईतील कोकिलाबेन रुग्णासयात कॅन्सरच्या आजाराने निधन झाले. तो ५४ वर्षांचा होता. इरफान खानच्या निधनाने संपूर्ण अभिनय क्षेत्र दु:खी झाले असून देशातील राजकीय वर्तुळात देखील या वृत्ताने दु:खी वातावरण आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी काँग्रेस अध्यक्ष तथा खासदार राहुल गांधी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, कर्नाटक मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही अभिनेता इरफान खान याच्या निधनाबाबत ट्विटरवर शोक व्यक्त केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरवरुन इरफानला श्रद्धांजली अर्पण केली आहे. ”इरफान खानच्या निधनाने चित्रपट तसेच नाट्यसृष्टीचे मोठे नुकसान झालं आहे. वेगवेगळ्या माध्यमांमध्ये त्याने साकारलेल्या अष्टपैलू भूमिकांसाठी तो कायमच आपल्या लक्षात राहील. माझ्या सद्भावना त्याचे कुटुंब, मित्र परिवार आणि चाहत्यांबरोबर आहेत. ईश्वर त्याच्या आत्म्यास शांती देवो,” असं मोदींनी इरफानला श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं आहे.

 

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनीही अभिनेता इरफान खान याच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. इरफान खान हा एक अष्टपैलू अभिनेता असल्याचे शहा आणि जावडेकर यांनी म्हटले आहे. इरफान खानला आंतरराष्ट्रीय कीर्तीही मिळाली होती. देशाने एक प्रतिभावान अभिनेता आणि चांगला माणूस गमावला आहे, असे शहा यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा इरफान खानच्या निधनावर शोक व्यक्त केला. ”अभिनेता इरफान खान यांच्या निधनामुळे हिंदी चित्रपट सृष्टीने एक मेहनती, अष्टपैलू अभिनेता गमावला आहे. दुर्धर असा कॅन्सर झाला असून सुद्धा न खचता, सकारात्मकतेने इरफान यांनी हे वास्तव स्वीकारले आणि उपचार सुरू असतांना परत उत्साहाने उभे राहिले.दुर्दैवाने काळाने त्यांना ओढून नेले आणि अभिनयाचा त्यांचा प्रवास थांबला, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी इरफान खान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.” अशा शब्दांत मुख्यमंत्री ठाकरे यांनी इरफान खानला श्रद्धांजली वाहिली.

”इरफान खान हा एक अष्टपैलू आणि बुद्धिमान अभिनेता होता. तो जागतिक पातळीवर भारतीय सिनेमाचा एक ब्रँड अम्बेसिडर होता. इरफानखान कायम स्मरणात राहील,” अशा शब्दात काँग्रसचे माजी अध्यक्ष, खासदार राहुल गांधी इरफान खान याच्या कार्याचा गौरव करत शोक व्यक्त केला आहे.

”अभिनेता इरफान खान याच्या निधनाचे वृत्त ऐकून आपल्याला धक्का बसला असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे. तो अतिशय वेगळा असा प्रतिभावान अभिनेता होता,त्याचा अभिनय कायम स्मरणात राहील” अशा शब्दांत केजरीवाल यांनी इरफान खान याच्या अभिनयाचा गौरव केला आहे.”

अभिनेता इरफान खान याच्या निधनाची बातमी ऐकून खूप दु:ख झाले. आपल्या देशातील अष्टपैलू अभिनेत्यांमध्ये इरफान खानची गणना होते”, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे. महत्वाची बाब म्हणजे इरफान खान हा राजस्थानच्या जयपूर येथून बॉलीवूडमध्ये आला होता.

”अभिनेता इरफान खान याच्या निधनाबाबत ऐकून अतिशय दु:ख वाटत आहे. राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिनय करणारा इरफान हा दुर्मिळ आणि उत्कृष्ट अभिनेता होता,” अशा शब्दांत कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सपचे नेते अखिलेश यादव यांनीही अभिनेता इरफान खानच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे.” आपल्या सर्वांचा आवडता अभिनेता इरफान खानला आज अनंतात विलीन झाला आहे. भावपूर्ण श्रद्धांजली! विख्यात धावपटू पानसिंग तोमर यांच्या अमर भूमिकेत त्याला कायम लक्षात ठेवले जाईल…”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

जेव्हा सचिनने केले स्वतःला खोलीत लॉक आणि त्यानंतर शेन वॉर्नची झाली जोरदार धुलाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण देशात लॉकडाउन आहे, ज्यामुळे क्रीडा कार्यक्रम थांबले आहेत.या कठीण क्षणामध्ये सध्याचे आणि माजी खेळाडू क्रिकेटशी संबंधित असलेल्या त्यांच्या जुन्या आठवणी चाहत्यांशी शेअर करत आहेत.या मालिकेत आता माजी भारतीय क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मणने सचिन तेंडुलकरशी संबंधित एक रंजक घटना शेअर केली आहे.१९९८ मध्ये चेन्नई येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात स्टार स्पोर्ट्स शो क्रिकेट कनेक्टमध्ये लक्ष्मणने मोठा खुलासा केला आहे, ज्यामध्ये सचिन पहिल्या डावात फक्त ४ धावा काढून बाद झाला आणि त्यानंतर त्याने स्वतःला खोलीतच लॉक करून घेतले होते.

व्हीव्हीएस लक्ष्मण म्हणाला, “सचिन खरोखरच चेन्नई कसोटीसाठी सज्ज झाला होता. पहिल्या डावात तो फक्त ४ धावांवर बाद झाला. त्याने पहिला चौकार ठोकला आणि नंतर वॉर्नला मिडऑनवरून शॉट खेळण्याच्या प्रयत्नात मार्क टेलरकडे झेल देऊन झेलबाद झाला. “

Best Boxing Day Test moments: From Shane Warne's hat-trick to ...

लक्ष्मण म्हणाला की सचिन इतका निराश झाला होता की त्याने स्वत: ला खोलीतच बंद केले आणि रडू लागला.तो म्हणाला,”मला आठवत आहे की सचिनने स्वत: ला फिजिओ रूममध्ये बंद केले होते आणि सुमारे एक तासानंतर तो बाहेर आला. जेव्हा तो बाहेर आला तेव्हा आम्हाला दिसले की त्याचे डोळे लाल आहेत. मला वाटले की तो बराच भावनिक झाला होता कारण तो ज्या पध्द्तीने आऊट झाला होता त्यामुळे तोच खूपच निराश झाला होता. “

लक्ष्मण पुढे म्हणाला, “सचिनने दुसऱ्या डावात धमाल केली.यावेळी त्याने लेग स्टंपच्या बाहेर बॉलिंग करणार्‍या शेन वॉर्नची चांगलीच धुलाई केली.वॉर्न क्रीजची खोली वापरत होता आणि जेव्हा त्याने हे केले तेव्हा तर सचिनने मिड-ऑफ आणि मिडऑनला मोठे फटके मारले.अशाप्रकारे सचिनने नाबाद १५५ धावांची खेळी केली. माझ्या दृष्टीने वॉर्न आणि सचिन यांच्यातील हा सर्वोत्कृष्ट सामना होता. “

SK Flashback: Sachin Tendulkar's 155* against Australia in Chennai ...

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

इरफान खानच्या निधनाने बॉलीवूडकर हळहळले, वाचा कोण काय म्हणाले..

मुंबई । दमदार अभिनेता इरफान खान निधनाच्या वृत्ताने सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे. बॉलिवूड कलाकारांना इरफानच्या अकाली जाण्याने धक्का बसला आहे. इरफानच्या निधनावर अनेक आघाडीच्या स्टार्स आणि दिग्दर्शकांनी संवेदना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली आहे. इरफानचा जवळचा मित्र आणि त्याच्यासोबत काम केलेल्या दिग्दर्शक सुजीत सरकारने सर्वात आधी ट्विट करून इरफान खानच्या निधनाची माहिती दिली. सुजीत सरकार यांनी लिहिले की, ”माझा प्रिय मित्र इरफान… तू लढत राहिलास…लढत राहिलास आणि लढत राहिलास. मला नेहमीच तुझा अभिमान वाटत राहील आणि आपण पुन्हा भेटू… श्रद्धांजली.”

सेलिब्रिटी दिग्दर्शक करण जोहरने ट्विट केले की, ”धन्यवाद, इतक्या चांगल्या सिनेमांसाठी. कलाकारांची व्याप्ती वाढविण्यासाठी आभारी आहे. आपल्या सिनेमांना उंचीवर नेऊन ठेवला त्यासाठी आभारी आहे. आम्हाला नेहमी तुझी आठवण येईल. तुझे अस्तित्व आमच्या जीवनात नेहमी राहिल. संपूर्ण सिनेइंडस्ट्री तुम्हाला सलाम करतो.”

इरफान सोबत काम केलेल्या खिलाडी अक्षय कुमारने ट्विट केले की, ”खूप वाईट बातमी आहे. अचानक इरफान खानच्या निधनाचे वृत्त ऐकले. आमच्या काळातील सर्वाेत्तम कलाकारांपैकी एक होता. त्याच्या कुटुंबाला या कठीण काळात सामोरे जाण्यासाठी ताकद देवो.”

जेष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांनी ट्विटरवर लिहिले की, ”सकाळीच इरफान खानच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. खूप लवकर गेला. खूप पॉवरफुल अभिनेता आणि कशी कर्करोगावर शौर्याने मात केली होती. हे खूप मोठे नुकसान आहे फक्त त्याच्या कुटुंबाचे नाही तर संपूर्ण सिनेसृष्टीचे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो”

इरफानप्रमाणेच हॉलीवूडमध्ये नाव कमावलेल्या प्रियंका चोप्राने ट्विट केले की,”तुम्ही जे काही केले ते जादूसारखे होते. तुमचे कौशल्य अनेकांना मार्ग दाखवले आहेत आणि कित्येकांसाठी प्रेरणादायी ठरले आहे. तुम्हाला खूप मिस करेन. कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत.”

तर अभिनेत्री अनुष्का शर्माने लिहिले की, ”हृदयावर दगड ठेवून मी हे ट्विट करत आहे. अद्भूतपूर्व कलाकार, त्यांच्या परफॉर्मन्स माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. त्यांनी त्यांच्या आयुष्यात संघर्ष केला पण खेद म्हणजे आज ते आपल्याला सोडून गेले. आरआयपी इरफान खान. ओम शांती.”

अभिनेत्री सोनम कपूरने ट्विट केले की, ”आत्म्यास शांती लाभो. तुमचा दयाळूपणा माझ्यासाठी किती महत्त्वाचा होता जेव्हा माझ्यात आत्मविश्वास नव्हता. तुमच्या कुटुंबियासोबत व जवळच्या व्यक्तींच्या दुःखात सहभागी आहे.”

भूमी पेडणेकरने ट्विट केले की, ”इरफान खान सरांच्या निधनाचे वृत्त ऐकून खूप वाईट वाटले. आम्हाला खूप धक्का बसला आहे आणि दुःखही वाटले. कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करते. तुम्ही आमच्या मनात नेहमी जीवंत राहणार आहात. आमचे मनोरंजन केले आणि इतके चांगले परफॉर्मन्स दिले, त्यासाठी आभारी आहे. तुम्ही आमच्यासाठी अभिनयाची शाळा आहात आणि नेहमीच प्रेरणादायी आहात. तुमच्या आत्म्यास शांती लाभो.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मोदींची ट्रम्प मिठी फेल; अमेरिकेने भारताला पाकिस्तान, सिरियाच्या रांगेत उभे केले – ओवेसी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला केला आहे.अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना मिठी मारणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काम करत नाही, असे त्यांनी अमेरिकेच्या अहवालाचे हवाला देत सांगितले. हेच कारण आहे की अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय स्वातंत्र्यावरील आयोगाने पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि सीरिया या समान धार्मिक स्वातंत्र्याच्या यादीत भारताला स्थान दिले आहे. ओवेसी म्हणाले की, यूएससीआयआरएफनेही भारताविरूद्ध बंदी घालण्याची शिफारस केली आहे.

यासंदर्भात ओवेसी यांनी ट्वीटमध्ये लिहिले की पंतप्रधान मोदींनी नमस्ते ट्रम्प कार्यक्रम आयोजित केला असूनही यूएससीआयआरएफने भारताला बर्मा, पाकिस्तान, उत्तर कोरिया, सीरिया यासारख्या देशांच्या यादीत ठेवले आहे. तसेच भारताविरूद्ध बंदी घालण्याचीही शिफारस केली आणि वेगवेगळ्या निर्बंधांबाबतही बोलले. हे मिठी मारणे याने काम झालेलं नाहीये हे स्पष्ट आहे. पुढील वेळी आपण काही चांगली मुत्सद्दी तंत्र वापरली तर ते चांगले होईल.यूएससीआयआरएफने एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतात सर्वात धोकादायक मार्गाने धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केले जात आहे.

 

असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधत यूएससीआयआरएफच्या ट्विटचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ते म्हणाले की अमेरिकेच्या एका अहवालानुसार भारतात ज्या प्रकारे धार्मिक स्वातंत्र्याचे उल्लंघन केले गेले आहे, त्यास जबाबदार असणाऱ्या भारत सरकारच्या एजन्सी आणि अधिकारी यांच्यावर बंदी घालायला हवी. तसेच, त्यांच्या मालमत्ता जप्त केल्या पाहिजेत आणि या लोकांच्या अमेरिकेत येण्यावर बंदी घालावी.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.