Sunday, December 21, 2025
Home Blog Page 5864

अखेर मजुरांच्या ‘घरवापसी’चा मार्ग मोकळा; घरी जाण्यासाठी केंद्रानं दिली मुभा

नवी दिल्ली । केंद्रीय गृहमंत्रालयाने अत्यंत गरजेचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. लॉकडाउनमुळे विविध राज्यांमध्ये गेले ३६ दिवस अडकून पडलेल्या स्थलांतरीत मजूर, विद्यार्थी, पर्यटकांना आणि धार्मिक यात्रेकरूंना आपापल्या राज्यातील घरी जाण्याची मुभा देणारा मोठा निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाने घेतला आहे. या निर्णयानुसार आता या अडकलेल्या नागरिकांना आंतरराज्यीय प्रवास करता येणार आहे. या नागरिकांची पाठवणी करणे, तसेच त्याना राज्यात प्रवेश देण्यासाठी राज्य सरकार तसेच केंद्रशासित प्रदेशांना नोडल प्राधिकरणाची स्थापना करावी अशा सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने केल्या आहेत. गृह मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशाप्रमाणे या सर्वांना प्रवासाची परवानगी देण्याआधी तपासणी केली जाणार असून कोरोनाची लक्षणं नसलेल्यांनाच घरी जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार आहे.

कोरोनानुळे लॉकडाउन जाहीर केल्यापासून असंख्य लोक आपल्या घरापासून दूर इतर राज्यांमध्ये अडकले आहेत. यामध्ये स्थलांतरित कामगारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. अनेकांनी तर आपल्या घरी पोहोचण्यासाठी चालत जाण्याचा मार्ग निवडला आहे. यामुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागण्याच्याही घटना समोर आल्या आहेत. अनेक राज्यांनी अडकलेल्या कामगार आणि इतरांना आपल्या घरी पोहोचण्यासाठी ट्रेन सुरु कराव्यात अशी मागणी केली आहे. त्यातच आता केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतलेल्या या निर्णयामुळे अनेक कामगार, विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

मार्वलचे चित्रपट भारतात इतके लोकप्रिय आहेत हे मला माहित नव्हते : अभिनेता ख्रिस हेम्सवर्थ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अभिनेता ख्रिस हेम्सवर्थने ‘नेटफिल्क्सच्या आगामी ‘एक्सट्रॅक्शन’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी भारतात शुटिंग केली होती. यावेळी त्याने अनुभवलेली सकारात्मकता व उत्साहामुळे तो थक्क झाला होता. नेटफ्लिक्सच्या या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वी एका विशेष व्हिडिओ कॉलद्वारे हेम्सवर्थनची आयएएनएसने मुलाखत घेतली.तो म्हणाला की, “मला भारतात शूटिंग करणे आवडले. इथले लोक विलक्षण आहेत. येथे मार्वल चित्रपट इतके लोकप्रिय होते याची मला कल्पना नव्हती. होय, हा अनुभव हृदयस्पर्शी आहे. “

Extraction 2 Release on the Cards as Netflix have Plans for the ...

तो आपल्या अनुभवाबद्दल पुढे म्हणाला, “आमच्या कर्मचाऱ्यांसह प्रत्येकाने खूप उत्साह आणि सकारात्मकता पाहिली.शूटिंगच्या दरम्यान हजारो लोक रस्त्यावर, पुलांच्या शिखरावर, इमारतींमध्ये आणि प्रत्येक ठिकाणी जमले.त्यानंतर त्यांनी आमचे खूपच कौतुक केले. मला असा अनुभव यापूर्वी कधीच आला नव्हता.मला भारत आणि येथील लोकांच्या अशा अद्भुत आठवणी मिळालेल्या आहेत. “

A Sequel To Chris Hemsworth's Extraction Might Be On The Cards - GQ

२०१८ मध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण नेटफ्लिक्ससाठी भारतात केले गेले होते.अहमदाबाद आणि मुंबई येथे सीन शूट केले गेले.१६ मार्च रोजी तो मुंबईतील त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनल कार्यक्रमात सहभागी होणार होता, पण कोरोनाव्हायरस या जागतिक साथीच्या निमित्ताने हा कार्यक्रम रद्द करण्यात आला.

Trailer: Extraction starring Chris Hemsworth - Esquire Middle East
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

मुबंईत अडकून पडलेल्या आपल्या रयतेसाठी आमदार शिवेंद्रराजेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, म्हणाले..

सातारा प्रतिनीधी । कोरोनाच्या संकटामुळं राज्यभरात लॉकडाऊन लागू आहे. तसेच जिल्ह्याच्या सीमा सील आहेत. अशा वेळी राज्यातील अनेक भागातून शहरात कामानिमित्ताने असलेले लोक मुंबई, पुण्यासारख्या शहरात अडकून पडले आहेत. लॉकडाउनमुळे काम बंद आहे त्यामुळं राहण्याचे आणि जेवणाचे त्यांचे हाल होत आहेत. म्हणूनच मुंबईत अडकून असलेल्या सातारा व जावळी मतदार संघातील लोकांना त्याच्या मुळगावी परतण्याची परवानगी द्यावी अशी विनंती आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्रातून केली आहे.

आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी लिहीलेल्या पत्रामध्ये म्हटले आहे की, सध्या कोरोनाच्या साथीमुळे जनजीवन विस्कळीत झालेले आहे. मुबंईमधील परिस्थिती अधिक बिकट व गंभीर होत चालेली आहे. अशा वेळी मतदारसंघातील सातारा व जावळी तालुक्यांतील असंख्य लोक माथाडी नोकरीनिमीत्त वाशी, कोपरखैराणे, ठाणे, घाटकोपर आदी ठीकाणी वास्तव्यास आहेत.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या सर्व लोकांना त्याच्या छोट्याशा खोल्यामध्ये राहणे अवघड आणि धोकादायक आहे. त्यामुळे अशा लोकांना आपल्या गावी परत जाण्याची मागणी एक लोकप्रतिनीधी म्हणून करत असल्याचे मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी केली आहे.

येत्या ३ मे रोजी लाॅकडाऊन संपणार आहे. मतदारसंघातील मुंबईत अडकून पडलेल्या लोकांची अडचण समजून घ्यावी. तसेच या सर्व लोकांना योग्य ती तपासणी करुन त्यांना त्यांच्या मुळ गावी परतण्याची परवानगी देण्यात द्यावी. मात्र, हे करत असताना त्यांना सेल्फ काॅरनटाईन होण्याच्या सुचना देऊन सर्व प्रकारच्या खबरदारी घेण्याच्या हमीवरच मुबईहून त्यांना आपल्या घरी सोडावं असंही शिवेंद्रराजेंनी मुख्यमंत्र्यांना म्हटलं आहे. दरम्यान, त्यांना घरी जाण्याची परवानगी दिल्यास ही लोक स्व:ताच्या वाहनाने गावी परतणार असल्याने त्यांना शासनाकडून वाहन पुरवण्याची गरज नाही असं शिवेंद्रराजेंनी पत्रात नमूद केलं आहे. तेव्हा कोरोनामुळं निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीत, लोकांच्या सुरक्षिततेसाठी आपल्या मागणीवर तातडीने कार्यवाही व्हावी अशी विनंती शिवेंद्रसिहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केली आहे.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

“युद्धबंदी उल्लंघन” केल्याबद्दल पाकिस्तानने वरिष्ठ भारतीय अधिकाऱ्याला बजावले समन्स

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रत्यक्ष नियंत्रण रेषेखालील भारतीय दलाच्या कथित युद्धबंदीच्या उल्लंघनाबद्दल पाकिस्तानने बुधवारी भारतीय उच्चायुक्तालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावून आपला निषेध नोंदविला.मंगळवारी राखचिकरी सेक्टरमध्ये भारतीय सैन्याने केलेल्या “अंदाधुंद आणि बिनधास्त गोळीबारात दोन महिला गंभीर जखमी झाल्याचा दावा पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने केला आहे.

पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने असा आरोप केला आहे की भारतीय सुरक्षा दलांनी नियंत्रण रेषा आणि वर्किंग बॉर्डर (डब्ल्यूबी) च्या जास्त लोकसंख्या असलेल्या ठिकाणांना जड आणि स्वयंचलित शस्त्रास्त्रांनी लक्ष्य केले.पाकिस्तानी परराष्ट्र कार्यालयाने सांगितले की, २००३ च्या युद्धबंदी कराराचा सन्मान करण्यासाठी, या युद्धबंदीचे झालेलं उल्लंघन आणि अशा प्रकारच्या इतर घटनांची चौकशी करण्यासाठी आणि सीमेवर शांतता राखण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना बोलविण्यात आले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

‘इरफान’ नावाचं वादळ कायमचं शांत झालंय..आज त्याने मृत्यूलाही रडवलंय !!

बॉलिवूड कट्टा | विभावरी विजया नकाते

ओम पुरी यांच्या निधनानंतर इरफान त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आला असताना एका पत्रकाराने इरफानला प्रश्न विचारला, कसं वाटतंय या प्रसंगी? त्यावेळी इरफानने दिलेलं उत्तर होतं – आज त्यांचा मृत्यू झालाय, काही दिवसांनी माझा होईल. यापेक्षा वेगळं काहीच नाही. आपलं वास्तव जगणं असो किंवा पडद्यावरील वावरणं.. ते कधीच स्क्रिप्टेड वाटणार नाही अशा अंदाजात जगण्याचा सच्चेपणा लोकांसमोर मांडणाऱ्या इरफानने आज आपल्यातून अचानक एक्झिट घेतली. आपल्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचे वेगळे असे भक्कम स्थान निर्माण केलेला आणि प्रेक्षकांच्या मनावर अविरतपणे अधिराज्य गाजवण्यात यशस्वी ठरलेला असा एक हरहुन्नरी कलाकार म्हणजे इरफान खान…!! आज दुपारीच त्याच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण बॉलिवूडमध्ये शोककळा पसरलीय. परंतु फक्त बॉलिवूडचे कलाकारच न्हवे तर त्याच्यावर प्रेम करणाऱ्या त्याच्या कित्येक चाहत्यांना सुद्धा आपल्या आवडत्या अभिनेत्याला कायमचं गमावल्याची भावना अतिशय त्रासदायक ठरत आहे.

Neuroendocrine Tumour या दुर्धर आजाराशी इरफान खानच्या सुरू असणाऱ्या लढाईस आज पूर्णविराम मिळाला. 2018 मध्ये त्याला या आजाराचे निदान झाले होते. त्या नंतर परदेशातुन उपचार करून इरफान भारतात परतला होता. तेव्हापासून तो सिनेसृष्टीपासून लांबच होता. मंगळवारी रात्री कोकीळाबेन रुग्णालयात दाखल झालेल्या इरफानाने आज उपचारादरम्यान शेवटचा श्वास घेतला. त्याच्या जाण्याने त्याच्या जगभरातील चाहत्यांना दुःखाचा जबर धक्का दिलाय एवढं मात्र खरं..

एका निवांत क्षणी – इरफान

करिअर – इरफान खान हा भारतीय सिनेसृष्टीतील एक महत्वाचा कलाकार म्हणून ओळखला जातो तो प्रामुख्याने हिंदी चित्रपटसृष्टीतील त्याच्या अभिनयामुळे. त्याच सोबत ब्रिटिश फिल्म्स आणि हॉलिवूडमधील त्याचं कामसुद्धा तितकंच उल्लेखनीय आहे. चित्रपट समीक्षक, समकालीन अभिनेते, या क्षेत्रातील सर्वच तज्ञ व प्रेक्षक या सर्वांच्या मनामध्ये इरफान खानने गेल्या काही दशकात भारतीय सिनेसृष्टीला लाभलेल्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक अशी ओळख निर्माण केली. गेल्या तीस वर्षांच्या काळामध्ये 50 पेक्षा अधिक चित्रपटांमधून त्याने आपल्या अतिशय वैविध्यपूर्ण आणि नैसर्गिक अभिनयाने या सृष्टीवर राज्य केले. अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी जयपूरहून दिल्लीला नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये जाताना आईशी खोटं बोलल्याची आठवण इरफान नेहमी त्याच्या मुलाखतीत सांगायचा. चित्रपट क्षेत्र हे इरफानच्या घरातील लोकांना नेहमीच कमी दर्जाचं वाटायचं. नाच-गाणी करणारे लोक चांगले कसे असंच त्यांचं म्हणणं होतं. आपण दिल्लीला फक्त अभिनय शिकायला जात असून, पुन्हा जयपूरला माघारी येऊन इथल्या मुलांना अभिनय शिकवणार असल्याची थाप मारून इरफान घराबाहेर पडला होता. नॅशनल स्कुल ऑफ ड्राममध्येसुद्धा ‘मी पूर्णवेळ नाटक क्षेत्रातच काम करणार असल्याची आणि चित्रपटांत जाणार नसल्याची’ थाप इरफानने लगावली. शिक्षण झाल्यानंतरही काही काळ काम न मिळाल्याने इरफान बोअर झाला होता. त्यानंतर त्याने नशीब आजमावण्यासाठी मुंबईला जायचा निर्णय घेतला.

हे हसणं दीर्घकाळ सोबत राहणारं आहे..!!

सिरियल्स आणि बॉलिवूड इंडस्ट्री – राजस्थानमधून मुंबईमध्ये आल्यानंतर त्याने चाणक्य, भारत:एक खोज ,सारा जहां हमारा, बनेगी अपनी बात , चंद्रकांता अश्या अनेक टी. व्ही. सिरियल्समध्ये भूमिका पार पाडत आपल्या कामाला सुरुवात केली. दूरदर्शन आणि स्टार प्लस या चॅनेलवरून प्रक्षेपित होणाऱ्या कित्येक सिरीयल्स आणि नाटक या क्षेत्रामध्ये काम करत काही वर्षे गेल्यानंतर त्याला Sallam Bombay हा त्याचा पहिला चित्रपट मिळाला. जो 1988 मध्ये प्रदर्शित झाला. या नंतर पुन्हा काही वर्षे तो चित्रपटांमध्ये सातत्याने काम करत राहिला, पण या काळात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी तो अपयशी ठरत होता. अभिनय क्षेत्रात काम करत असताना प्रत्येकालाच स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी अश्या स्ट्रगलला सामोरे जावे लागते. इरफान खानच्या आयुष्यातला हाच त्याचा स्ट्रगलचा काळ होता. 2001 मध्ये The Warrior या ऐकतिहासिक चित्रपटात त्याने भूमिका पार पाडली. ही फिल्म इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रदर्शित झाली व तिथून त्याच्या चेहऱ्याला ओळख प्राप्त व्हायला सुरुवात झाली. त्याच्या अथक प्रयत्नांना हळूहळू यश मिळत गेलं. त्या नंतर त्याने Road Of Ladakh नावाची शॉर्टफिल्मसुद्धा केली. 2003-04 मध्ये Haasil आणि Maqbool या चित्रपटांमधील त्याच्या भूमिकेला Filmfare Award For Best Villain या पुरस्काराने सन्मानित केलं गेलं. 2005 मध्ये Rog नावाच्या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका पार पाडली. दरम्यान त्याने काही तेलगू चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. 2006 साली आलेल्या Nameseck चित्रपटानेही त्याच्या कारकिर्दीला वेगळं वळण दिलं. या नंतर 2007 मध्ये प्रदर्शित झालेला Life in a Metro हा चित्रपट इरफानच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. या फिल्ममध्ये अनेक अभिनेते असले तरी कोंकणा सेन या अभिनेत्रीसोबत त्याची केमिस्ट्री चांगलीच गाजली. यातील भूमिकेतुन तो प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी ठरला.

शिवाय वैविध्यपूर्ण भूमिकांसाठी Filmfare Award For Best Supporting Actor ही त्याला मिळाला. या यशानंतर त्याने A Mighty Heart आणि The Darjeeling Limited नावाच्या दोन आंतरराष्ट्रीय फिल्म्स मध्ये काम केलं.2008 मध्ये Slumdog Millinaire हा चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीस आला. हा चित्रपट, चित्रपटाचा विषय व यातील कलाकार हे जगभरामध्ये कौतुकास पात्र ठरले. या चित्रपटाने Screen Actors Guild Award For Outstanding Performance by a Cast in a Motion Picture हा किताब पटकावला. 2011 मध्ये त्याच्या करिअरमधली अजून एक सर्वात महत्वाची फिल्म म्हणजेच Paan Singh Tomar प्रेक्षकांच्या भेटीला आली. एका खेळाडूच्या आयुष्यावर आधारित असणारी ही बायोग्राफी प्रकारतील फिल्म त्याच्या अभिनयामुळे अतिशय चर्चेत राहिली. त्याच्या या भूमिकेसाठी त्याला National Film Award For Best Actor ने सन्मानित केलं गेलं. 2013 मध्ये The Lunchbox या चित्रपटातून तो प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षक यांच्या कौतुकास पात्र ठरला. दरम्यानच्या काळात व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरलेल्या Haider, Gunday, Piku, Talvar, No Bed Of Roses अश्या अनेक चित्रपटांमध्ये त्याने भूमिका पार पाडल्या. 2015 मध्ये इरफान ऐश्वर्या राय सोबत Jazbaa चित्रपटात झळकला. त्याच्या याही भूमिकेचे चित्रपट समीक्षकांकडून कौतुक झाले. याच पाठोपाठ 2017 मध्ये त्याच्या Hindi Medium या चित्रपटाने लोकप्रियतेची वेगळी उंची गाठली. या चित्रपटाने आंतरराष्ट्रीय बॉक्स ऑफिसवर $3.643 बिलियन इतकी कमाई करून जगाचे लक्ष वेधून घेतले. याच वर्षी त्याने Qarib Qarib Single या चित्रपटात सुद्धा भूमिका पार पाडली. मोठ्या पडद्यावरील या यशानंतर सुद्धा तो छोट्या पडद्यावरून प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला. Star Plus वाहिनीवरील “मानो या ना मानो” आणि “क्या कहें ” असे शो होस्ट करत त्याने आपले टेलिव्हिजन करिअर सुद्धा सुरू ठेवले.

पान सिंग तोमर हा इरफानच्या आयुष्यातील माईलस्टोन चित्रपट होता.

स्ट्रगलर जिंदगी – मुंबईत आल्यानंतरसुद्धा मनासारखं काम मिळेल अशी परिस्थिती इरफानच्या बाबतीत नव्हती. मरीन लाईनजवळ राहायला असलेला इरफान मुंबईतील गरीब लोकांच्या अवस्थेबद्दल पत्नीशी तासंतास बोलत राहायचा, त्यांच्या व्यथा कधीतरी पडद्यावर आणल्या पाहिजेत याबाबत सांगायचा. चित्रपटांत काम मिळत नसल्यामुळे सुरुवातीच्या काळात टीव्ही सिरीयलमध्ये काम करायला इरफानने सुरुवात केली होती. अभिनय हा आपला आत्मा आहे, आणि तो मरु द्यायचा नाही हे मनोमन ठरवल्याचं इरफानने कबूलही केलं होतं. सुरुवातीच्या काळात काही भूमिका पैसे मिळवण्यासाठीच केल्याचंही इरफान सांगतो. ‘सलाम बॉम्बे ते द वॉरियर’ हा १३ वर्षांचा कालावधी इरफानला आणि त्याच्या परिवाराला लोकांची नियत, पैशासाठी बदललेली माणसं आणि इंडस्ट्रीचं खरं रुप दाखवून गेला. एखाद्या चित्रपटाला चांगला निर्माता भेटल्यानंतर दिग्दर्शकांनी इरफानला चित्रपट सोडायला सांगितल्याचंही इरफानच्या पत्नी शुपिता सिकदार यांनी एका मुलाखतीत सांगितलं. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये काम करत असताना इतर सामान्य मुलांप्रमाणे मौज-मजा करावी असं इरफानला कधीच वाटलं नाही, तो नेहमी पुस्तकांत, नाटकाच्या स्क्रिप्टमधेच गुंतून राहायचा असंही शुपिता यांनी मुलाखतीत सांगितलं होतं. इरफानचा चेहरा नेहमी उदास, शांत असल्याचं कारण त्याला विचारलं असता – “मी खूप विचारी आहे” असं इरफानने कबूल केलं होतं. माझा चेहरा पाहून मी कधी अभिनेता होईल असं कुणाला वाटलं नसतं, पण माझ्या कामातील प्रामाणिकपणा आणि ते करण्याची माझी तळमळ यामुळं मी १०० कोटी क्लबवाल्या अभिनेत्यांपेक्षाही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहचलो हे इरफानचं बोलणं २९ एप्रिल २०२० च्या दिवशी १००% खरं ठरल्याचं दिसून आलं.

नेमसेक चित्रपटातील एक क्षण

इंग्लिशची अडचण असूनसुद्धा हॉलिवूड गाजवलं – इंग्रजी बोलायला अडचण आहे, याची लाज वाटण्याचं काहीच कारण नाही. तुम्ही आतून कसे आहात हे जास्त महत्वाचं असल्याचं इरफान सांगतो. बॉलिवूड सोबतच त्याने हॉलिवूडमध्ये सुद्धा आपल्या भूमिकांमधून स्वतःचं स्थान निर्माण केलं. हॉलिवूडमध्ये काम करताना नवीन भाषा शिकण्यासाठी ट्रेनर घ्यायचा प्रश्न यायचा, त्यावेळी इरफान स्वतःहूनच त्याच्या तयारीसाठी वेगळी मेहनत करायचा. नंतर हळूहळू प्रगती करत हॉलीवूडलासुद्धा त्याने आपल्या प्रेमात पाडलं. The Amazing Spider- Man (2012) , Life Of Pi (2012), Jurassic World (2015), Inferno (2016) अश्या चित्रपटांमध्ये त्याने सहकारी कलाकार म्हणून विविध भूमिका पार पाडल्या. हॉलिवूड अभिनेता टॉम हँक्स इरफानसोबत काम करण्याआधी म्हणाला होता, की आपल्या शूटिंग टीममधला सगळ्यात कूल (बिंदास) माणूस मी आहे. पण जसजसे दिवस पुढे गेले तसं टॉम हँक्स स्वतःच म्हणाले की इरफान हा तर माझ्यापेक्षा बिंदास माणूस आहे. 2018 मध्ये इरफान खान Karwan नावाच्या फिल्म मधून दलक्वीर सलमान, मिथिला पालकर या तरुण कलाकारांसोबत प्रेक्षकांच्या भेटीला आला. याच वर्षी Blackmail नावाच्या चित्रपटात सुद्धा त्याने काम केले. अलीकडेच म्हणजे 2020 मध्ये “अंग्रेजी मिडीयम” या चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका पार पाडलीय. हाच त्याचा शेवटचा चित्रपट ठरला.

द वॉरियर चित्रपटातील इरफानची छबी

यामुळेच इरफान ग्रेट होता..!! – इरफानचे चित्रपट हे लोकांना रियल जगण्याचा फील देत होते. मदारीमध्ये न्याय हा सर्व लोकांसाठी समान असायला हवा हे दाखवताना इरफानने स्वतःच्या मुलाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी साकारलेली बापाची भूमिका कमाल होती. प्रत्येक सामान्य बापाला आपल्या लेकरांसाठी काहीतरी करण्याची जिद्दच इरफानच्या या भूमिकेने दिली. लाईफ ऑफ पाय या चित्रपटाचा विचार करता, दिग्दर्शक आंग ली यांच्या मते, इरफान जे मनोगत शेवटी व्यक्त करणार होता, त्यावर चित्रपटाचं यश आणि किंमत ठरणार होती. ते जर व्यवस्थित झालं नसतं तर पूर्ण चित्रपटच फ्लॉप होता याची जाणीव इरफानला वारंवार करुन देण्यात आली होती. इरफाननेही या छोटेखानी भूमिकेत जीव ओतला आणि ही भूमिका अजरामर केली. लंचबॉक्स या हलक्याफुलक्या चित्रपटात त्याने स्त्रीपात्राशी साधलेला मूक संवाद सस्पेन्स सोबत स्वतःमधील रोमँटिक आणि विचारी माणसाचा फील प्रत्येक सामान्य माणसाला करुन देत होता. ‘पान सिंग तोमर’ या भारताचा दुर्लक्षित राहिलेला नायक होता. त्यावर आधारीत चित्रपटाने पान सिंग तोमर आणि इरफानलाही भारतीय प्रेक्षकांच्या मनात घर करायला जागा दिली. या घटनेचं सर्वाधिक समाधान आयुष्यात असल्याचं इरफान सांगायचा. ब्लॅकमेल चित्रपटातील त्याची वेंधळा पण प्रेमळ नवरा, ज्याला बायकोच्या प्रेमासाठी, तिचं बाहेर अफेअर असतानासुद्धा तिच्यासाठी वाट्टेल ते करायची इच्छा होते – हे साकारताना इरफानने कमालीची संवेदनशीलता दाखवली आहे. रिटेक लागू शकणारे अनेक शॉट्स त्याने सिंगल टेकमधेच पूर्ण केले आहेत. हासिल या त्याच्या मित्रानेच (तिगमांशू धुलिया) दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटातील खलनायकाच्या भूमिकेसाठी इरफानचं विशेष कौतुकही झालं होतं. त्यानंतर पुढील कित्येक चित्रपटांसाठी त्याला खलनायकाचीच ऑफर आली होती. इरफानचे अगदी शेवटी आलेले दोन चित्रपट – हिंदी आणि अन्ग्रेजी मीडियम – भारतीय पालकत्वाच्या सुजाणतेवर जळजळीत कटाक्ष टाकणारे होते. कुठलाही संदेश देण्याचा अविर्भाव न बाळगता दैनंदिन साध्या-सोप्या जगण्यातूनच इरफानने मुलांना आणि पालकांना द्यायचा तो संदेश व्यवस्थित देण्याचं काम या चित्रपटांतून केलं. त्याची प्रत्येक भूमिका लोकांना आत्मिक समाधान मिळवून देत राहिली, कनेक्ट करत राहिली. तुमच्या जीवनातील रोमँटिकपणा तुमच्या आयुष्यातील वाईट घटना आणि दुःखाला काउंटर करत असतो हे सांगत असताना आयुष्यातील रोमँटिकपणा जपा हे सांगायलाही इरफान विसरला नाही.

हरहुन्नरी कलाकार, अभिनयाचा शिक्षक, संवेदनशील व्यक्ती, सातत्याने वेगवेगळ्या विषयांवर प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्नशील असणारा अभिनेता, आयुष्यभर अनेक चढउतार पाहत त्यात खंबीरपणे उभा राहणारा, लहानपासून अतिशय स्ट्रगलला सामोरे जात अथक प्रयत्नांनी यशाची आणि लोकप्रियतेची सर्वोच्च शिखरे सर करून आयुष्याच्या अंतिम काळात पुन्हा धीरोदात्तपणे दुर्धर आजाराशी लढा देत आपल्यातून अचानकपणे निघून गेलेला परंतु आपल्या अजरामर भूमिकांमधून प्रेक्षकांच्यासाठी अमर झालेला असा हा आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यात यशस्वी ठरलेला अभिनेता इरफान खान..!!

आज इरफान खान आपल्यातून निघून गेला असला तरी त्याच्या चाहत्यांच्या मनामध्ये तो सदैव जीवंत असेल. असं म्हटलं जातं की “ज्या क्षणी तुम्ही एखाद्या कलाकाराच्या अत्यंत प्रेमात पडता त्याच क्षणी तो कलाकार अमर झालेला असतो..!!” आणि याच वाक्यानुसार त्याच्या अस्सल अभिनयामुळे त्याच्या प्रेमात असणाऱ्या अनेक प्रेक्षकांच्या मनात तो सदैव त्यांचा आवडता अभिनेता म्हणून सोबत असेल हे नक्की.

मदारीमधील इरफान खानची एक छटा

सदर लेख विभावरी विजया नकाते यांनी लिहिला असून त्या मानसशास्त्र विषयाच्या पदवीधर आहेत. वाचन, प्रवास आणि लिखाणाची त्यांना विशेष आवड आहे. त्यांचा संपर्क क्रमांक – 8408877063

कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकणार्‍या ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या पत्नीने दिला मुलाला जन्म

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या पत्नी कॅरी सायमंड्सने एका मुलाला जन्म दिला आहे.लंडनमधील सरकारी रुग्णालयात बुधवारी या मुलाचा जन्म झाला.असा विश्वास आहे की मूलाचा अकाली जन्म झाला आहे परंतु आई व मुल दोघेही निरोगी आहेत.त्यांच्या प्रवक्त्यांपैकी एकाने बुधवारी सांगितले की, “पंतप्रधान आणि सायमंड्स आपल्या मुलाच्या जन्माची बातमी देऊन खूप आनंदित आहेत. आज सकाळी सायमंड्सने लंडनमधील इस्पितळात मुलाला जन्म दिला. “

प्रवक्त्याने सांगितले की, “आई व मूल दोघेही बरे आहेत. पंतप्रधान आणि सायमंड्स यांनी एनएचएस (राष्ट्रीय आरोग्य सेवा) च्या डॉक्टर-परिचारिकांचे आभार मानले आहेत. “

Boris Johnson and Carrie Symonds announce birth of baby boy ...

काही दिवसांपूर्वीच जॉन्सन (५५) यांना कोरोना विषाणूची लागण झाली होती.रुग्णालयातील उपचारानंतर ते सोमवारी पंतप्रधान कार्यालय असलेल्या १० डाऊनिंग स्ट्रीटवर परत आले. ते बकिंघमशायर येथील त्यांच्या निवासस्थानी बरे आहेत.तिथे त्यांच्या पत्नीही आहेत.जॉन्सन रूग्णालयातून परत आल्यावर सायमंड्सने आनंद व्यक्त करत काही ट्विट केले.या जोडप्याने फेब्रुवारीच्या उत्तरार्धात आपल्या एंगेजमेंट जाहीर केली होती.त्याच वेळी हे देखील उघड झाले होते की येत्या उन्हाळ्यात दोघांना मूल होणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

सोन्याच्या किंमतीत घसरण सुरुच; जाणुन घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोन्याच्या किंमतींमध्ये सतत होणारी घसरण सुरूच आहे. आजच्या व्यवसायादरम्यान, जिथे सोने कमी किंमतीने ट्रेडिंग करीत आहे,तिथे चांदीमध्ये किंचितशी वाढ झालेली आहे.सराफा बाजारातील किरकोळ व्यवसाय बंद असून फ्युचर्स मार्केटमध्ये मात्र ट्रेडिंग सुरू आहे.

आजचे सोन्याचे भाव
आजच्या व्यापारातील सोन्याच्या किंमतींकडे नजर टाकली तर ५ जून २०२० रोजी सोन्याचे वायदे ०.०१ टक्क्यांच्या किंचित घसरणसह प्रति १० ग्रॅम ४६,०४६ वर व्यापार करीत होते. गोल्ड मिनीमध्येही किंमतीच्या घसरणीसह ट्रेडिंग सुरु होते.

Want Free Gold? Maybe You Should Visit Switzerland

चांदी आज तेजीत आहे
चांदीच्या आजच्या फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये चांगली वाढ दिसून येत असून ते सुमारे अर्ध्या टक्क्यांनी वाढत होते.३ जुलै २०२० साठीची चांदीची उलाढाल पाहिल्यास ते ०.४९ टक्क्यांच्या वाढीसह ४२,५५० रुपये प्रतिकिलोवर ट्रेडिंग करीत आहे.

कालही सोन्या-चांदीची घसरण दिसून आली
मंगळवारी फ्युचर्स ट्रेडिंगमध्ये घसरण झाल्याने सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,००० च्या खाली गेली.मात्र,नंतर थोड्या फरकाने ते वधारले आणि दिवसाच्या व्यापारात सोन्याचे भाव १४१ रुपयांनी वाढून ४६,१९५ रुपयांवर गेले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

तारांबळ! औरंगाबाद पोलीसांनी पकडलेला आरोपी निघाला कोरोना पॉझिटिव्ह

औरंगाबाद । पोलीस कोठडीत असलेल्या एका 42 वर्षीय आरोपीचा स्वाब नमुन्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने औरंगाबाद शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. सिटीचौक पोलीस ठाण्यातील सुमारे 30 ते 35 पोलीस अधिकारी-कर्मचारी या कोरोनाबधित आरोपीच्या संपर्कात आले होते. त्या सर्वांची कोविड१९ चाचणीनंतर त्यांना क्वांरन्टीन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी पवार यांनी दिली आहे.

प्रतिबंधित नशेच्या गोळ्यांची विक्री करीत असताना सिटी चौक पोलिसांनी चेलीपुरा भागातून एका 42 वर्षीय आरोपीला छापा टाकून नशेच्या गोळ्या सहित अटक केली होती. अटकेनंतर कोरोना सारखी लक्षणे दिसत असल्याने आरोपीचे स्वाब नमुने घेण्यात आले होते. दरम्यान आरोपीला न्यायालयाने कोठडी सुनावल्याने आरोपीला सिटी चौक पोलीस ठाण्यातील पहिल्या मजल्यावरील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले होते.

तीन दिवसांच्या या कालावधीत सिटी चौक पोलीस ठाण्यातील अनेक अधिकारी कर्मचाऱ्यांचा आरोपीशी संपर्क आला होता. आरोपीच्या स्वाब नमुन्याचा रिपोर्ट मंगळवारी रात्री पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. या आरोपीच्या संपर्कात ठाण्यातील सुमारे 30 ते 35 कर्मचारी-अधिकारी यांचा संपर्क आलेला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत असून या सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी करून त्यांना क्वांरन्टीन करण्यात येणार आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांच्या स्वाब अहवालाकडे आता सर्व पोलीस दलाची नजर लागून आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

‘आयटी’वाल्यांना आता ३१ जुलैपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ची मुभा

मुंबई । माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रातील कंपन्यांची वर्क फ्रॉम होमची मर्यादा ३१ जुलैपर्यंत वाढवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय माहिती तंत्रज्ञान आणि संपर्क मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मंगळवारी केली. आयटी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमसाठी देण्यात आलेल्या कालावधी ३० एप्रिल रोजी संपत होता. आता हा कालावधी ३१ जुलैपर्यंत वाढण्यात आला आहे. राज्यातील माहिती तंत्रज्ञान मंत्र्यांबरोबर प्रसाद यांनी घेतलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगदरम्यान रविशंकर प्रसाद यांनी ही घोषणा केली. तसेच लॉकडाउनच्या कालावधीत आयटी क्षेत्रातील ८५ टक्के काम घरुनच केले जात असल्याचेही प्रसाद यांनी यावेळी सांगितले.

वर्क फ्रॉम होमसंदर्भात सरकारने अनेक सवलती दिल्या असल्याचाही उल्लेख प्रसाद यांनी यावेळी बैठकीत केला.सरकारकडून देण्यात आलेल्या सवलतींमध्ये सुरक्षा ठेवींमध्ये सूट, काही ठिकाणी व्हिपीएन न वापरता काम कऱण्याची सूट, घरी काम करण्यासंदर्भात उपकरणे पुरवण्यासाठी परवानगीमध्ये सूट देण्याचा समावेश आहे. प्रसाद यांनी आज घेतलेल्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या राज्यातील आयटी सेक्रेट्री, कम्युनिकेशन सेक्रेट्री आणि पोस्टल सेक्रेट्रींनी प्रेझेंटेशन सादर करुन कोणकोणत्या गोष्टींची राज्यांना केंद्राकडून अपेक्षा आहे हे सांगितले. तर घरुन काम करणे हे यापुढे सर्वसामान्य व्हावे यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं असं प्रसाद यांनी यावेळी म्हटलं. तसेच नवीन उद्योजकांनी या संदर्भातील स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करावी अशी अपेक्षाही प्रसाद यांनी व्यक्त केली.

देशातील आयटी क्षेत्रातील प्रमुख केंद्र असणाऱ्या बंगळुरु, हैदराबाद, मुंबई, दिल्ली एनसीआर, पुणे यासारख्या शहरांमध्ये कोरोनाचा प्रभाव अधिक असल्याने येथील लॉकडाउनचा कालावधी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कर्नाटक, महाराष्ट्र, हरयाणा आणि तेलंगणामधील माहिती तंत्रज्ञान विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करताना प्रसाद यांनी राज्य सरकारांनी ‘भारत नेट’ प्रकल्पाला सहाय्य करण्याची मागणी केली. ‘भारत नेट’च्या माध्यमातून इंटरनेटचे जाळे अधिक भक्कम करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे इंटरनेट सेवा पुरवणाऱ्यांना अधिक चांगल्या सेवेसाठी वेगवेगळ्या ठिकाणी नवीन उपकरणे बसवण्यासंदर्भात राज्य सरकारने परवानगी देण्यासंदर्भातही प्रसाद यांनी सुचना केल्या.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

कराड तालुक्यात ११ वर्षाचा मुलगा कोरोना पोझिटिव्ह, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ४३ वर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

कराड तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. आज तालुक्यातील एका ११ वर्षांच्या मुलाचा कोरोना अहवाल पोझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक 36 वर्षीय महिला आरोग्य कर्मचारी व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाच्या निकट सहवासित 11 वर्षाचा मुलगा असे एकूण 2 जणं पॉझिटिव्ह (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

सदर ११ वर्षांचा मुलगा कराड तालुक्यातील कापिल गावचा रहिवासी असल्याची माहिती समोर येत आहे. प्रशासनाकडून सदर मुलाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. ताज्या आकडेवारीनुसार सातारा जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या आता ४३ वर पोहोचली आहे. यामध्ये सर्वाधिक रुग्ण कराड तालुक्यात असून कराड तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या 31 वर पोहोचली आहे. आता सातारा जिल्ह्यात 33 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.

तसेच आज दि. 29 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 18, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 11 असे एकूण 63 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.