Tuesday, December 16, 2025
Home Blog Page 6726

देण्याची कला शिकवणाऱ्या विंदा करंदीकर यांची जन्मशताब्दी

vinda
vinda

साहित्यनगरी |अमित येवले

ज्ञानपीठ पुरस्कार सन्मानित कवी
गोविंद विनायक करंदीकर उर्फ ‘विंदा करंदीकर’ यांची आज जन्मशताब्दी. २३ ऑगस्ट १९१८ रोजी सिंधुदुर्गातील धालवाली गावात त्यांचा जन्म झाला. ‘माझ्या मना बन दगड’, ‘देणाऱ्याने देत जावे…’ ‘चुकली दिशा तरीही,हुकले न श्रेय सारे’ या व अशा अनेक दर्जेदार कविता आजसुद्धा लोकांना प्रेरणा देणाऱ्या ठरल्या आहेत.

यंदाचे वर्ष विंदा यांची जन्मशताब्दी वर्ष म्हणून अनेक स्तरांवर मोठ्या प्रमाणात साजरे केले गेले. मराठी साहित्याला समुद्ध करणार्‍या साहित्यिकांमधील एक अग्रणी असणार्‍या विंदाना जन्मशताब्दीनिमित्त विनम्र अभिवादन.

आतापर्यंत मिळालेले पुरस्कार –

कबीर सन्मान १९९१
कवी कुसुमाग्रज पुरस्कार(१९८७)

कुमारन् आसन पुरस्कार(१९७०)

केशवसुत पुरस्कार, कोणार्क सन्मान
(१९९३)

जनस्थान पुरस्कार १९९३

भारतीय भाषा परिषद सह्यादी पुरस्कार(१९९९)

महाराष्ट्र फाउंडेशन गौरव पुरस्कार(१९९७)

महाराष्ट्र साहित्य परिषद पुरस्कार(१९८५)

विद्यापीठांच्या डी.लिट्‌स डॉ. लाभसेटवार साहित्य पुरस्कार(२००२)

साहित्य अकादमी महत्तम सदस्यता(१९९६)

सीनिअर फुलब्राइट फेलोशिप(१९६७-६८)

सोव्हिएट लॅन्ड नेहरू लिटररी पुरस्कार(१९७०)

ज्ञानपीठ पुरस्कार (आठ तत्त्वचिंतकांच्या विचारांचे छंदोबद्ध काव्यरूप असलेल्या अष्टदर्शने या साहित्यकृतीसाठी दिलेला पुरस्कार) इ.स.२००३

चंद्रावरुन मारलेला डोळा..

earth photo
earth photo

थेट चंद्रावरुन |कॅमेरामन

२३ ऑगस्ट या आजच्या दिवशी १९६३ साली, एक अजब घटना पृथ्वीवासीयांना अनुभवायला मिळाली. लुणार ऑरबिटर १ या यानाच्या मदतीने चंद्रावरुन पृथ्वीचा पहिला फोटो घेण्यात आला. तुम्ही प्रत्यक्ष चंद्राच्या पृष्ठभागावरून पृथ्वी पाहू शकत नाही, परंतु फिरणाऱ्या यानामधून तुम्हाला काही छायाचित्रे नक्कीच टिपता येऊ शकतात. अंतराळातून पृथ्वीचा पहिला फोटो २४ ऑक्टोबर १९४६ साली चलचित्राद्वारे मेक्सिकोजवळच्या भागात घेण्यात आला. यावेळी कॅमेरा जर्मन व्ही २ मिसईलच्याद्वारे लावण्यात आला होता. तर २० जुलै १९७६ रोजी, मंगळभूमीवरुन पृथ्वीच छायाचित्र घेण्यात आलं. एखाद्या ग्रहाच्या पृष्ठभागावरून छायाचित्र घेण्याची ही पहिलीच वेळ होती.

मुल्कः धर्मांधता ओलांडून माणूस होण्याचा प्रवास

mulk review
mulk review

राष्ट्रभक्तीच्या सिध्दतेची परीक्षा नाकारणारा चित्रपट |श्रीरंजन आवटे

हिंदू,मुस्लीम खतरें मे है म्हणत एकमेकांविषयी द्वेष निर्माण करण्याचा प्रोजेक्ट एका टोकाला आलेला असताना ‘मुल्क’ सारखा सिनेमा होणं ही अत्यंत आश्वासक बाब आहे. (अनुभव सिन्हाच्या आधी हा सिनेमा रिलीज होऊ दिल्याबद्दल मोदींचे आणि सेन्सॉर बोर्डाचे आभार.)
दोन्ही धर्मातले कट्टरतावादी ‘भारतीयत्व’ नष्ट करु पाहताहेत. दहशतवाद हा काही कुठल्या धर्माशी संबंधित नाही तर दहशतवाद ही सामाजिक सौहार्द बिघडवणारी, तणाव निर्माण करणारी अशी कृती आहे ज्यात अस्पृश्यतेचं पालन करण्यापासून ते परधर्माविषयी द्वेष पसरवणा-या कृतीपर्यंत अनेक बाबींचा समावेश होतो. हा सिनेमा हे सुस्पष्ट भाषेत सांगतो.
दहशतवादाला जाणीवपूर्वक मुस्लीम धर्माशीच जोडलं गेलं. ‘हर मुस्लीम आतंकवादी नहीं होता;पर हर आतंकवादी तो मुस्लीम होता है’ असली चुकीची सडकछाप वाक्यं मुद्दामून सांगितली गेली. मग नथुराम गोडसेपासून ते साध्वी प्रज्ञा, वैभव राऊत, गोंधळेकर, अंदुरेपर्यंत लोक कोण आहेत ? मुस्लीम कट्टरतावाद्यांनी केला तर तो दहशतवाद आणि हिंदूंनी तेच केले तर तो राष्ट्रवाद असं कसं मानतो आपण ?
आम्ही आणि ते अशी चर्चा होऊ लागली की आपल्यात फूट पाडणारं राजकारण यशस्वी होतंय असं समजावं. सिनेमाच्या शेवटी जज म्हणतात-
“जब कोई इस मुल्क हम और वो मे बाटँने की कोशिश करे तो घर जाकर एक बार कलेडंर देख लेना कि इलेक्शन में कितना टाईम बचा है|”
आपण सारे एक आहोत, माणूस आहोत, हे म्हणणं ठामपणे मांडण्याचा प्रयत्न अनुभव सिन्हा यांनी केला आहे. अनुभव सिन्हा यांनी या काळात हा सिनेमा करणं हे निव्वळ अभिनंदनीय आहे. हे धाडस आहे. या धाडसाला मी मनापासून सलाम करतो. सिनेमातले संवाद आणि दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. तापसी पन्नूच्या तर मी प्रेमातच पडलो.
सिनेमाची स्टोरी न सांगता केवळ एक प्रसंग सांगतो, मुराद अली मोहम्मद (ऋषी कपूर) हा आरोपी आहे आणि त्याची सून आरती मोहम्मद (तापसी) डिफेंस लॉयर आहे. घराच्या छतावर बसलेले असताना मुराद तापसीला सांगतोय, लग्न झाल्यानंतर सुरुवातीला तुझी सासू म्हणायची, आप मुझसे प्यार ही नहीं करते. मुझे पता नही चलता था की मै इसे प्रुव्ह कैसे करुं की मै सच में उसे प्यार करता हूं..प्यार होता है प्यार प्रुव्ह कैसे किया जाता है..?
आणि पुढच्या क्षणी मुरादची राष्ट्रभक्ती कोर्टात आरोपीच्या पिंज-यात उभी आहे आणि तापसीच त्याला विचारते आहे- मिस्टर मुराद अली मोहम्मद कशी सिध्द कराल देशभक्ती ? पुढे सिनेमात काय घडते, ते प्रत्यक्ष पहा.
प्रेम ही सिध्द करण्याची गोष्ट नाही. ती प्रदर्शनीय वस्तू नाही की तुम्ही डोळ्यांनी पाहू शकाल. श्वासांची लय बदलते ते सांगता येत नाही. डोळ्यातलं पाणी, उचंबळून येणारं हृदय आणि जगण्याचा आदिम आवेग,संवेग नियोजित नसतो. त्याचं पूर्वनियोजित मंचन नाही करता येत. देशाविषयी, परस्परांविषयीचं प्रेम, बंधुभगिनीभाव, गंगा जमुना तहजीब असते, ती सिध्द करायची गोष्ट नाही. राष्ट्रप्रेमाच्या सिध्दतेची परीक्षा रद्द करु या. धर्मांधतेच्या पलिकडे जात माणूस होऊ या. कबीराचं एक भजन या सिनेमात आहे-
_कहां से आया कहां जाओगे
खबर करो अपने तन की
कोई सदगुरु मिले तो भेद बतावे
खुल जावे अंतर खिडकी_
या ओळींचा अर्थ कळला तर सिनेमा सार्थकी लागेल. सार्थकी लागावा, अशी प्रार्थना.

श्रीरंजन आवटे

ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नय्यर यांचं निधन

kuldeep nayar
kuldeep nayar

नवी दिल्ली | पत्रकार, लेखक व मानवाधिकार कार्यकर्ते कुलदीप नय्यर यांचं दिल्ली येथे बुधवारी रात्री निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केलं होतं. बियोंड दि लाईन्स, इंडिया आफ्टर नेहरू आणि आणीबाणी काळातील काही पुस्तकांसह १५ पुस्तकांचं लेखन त्यांनी केलं होतं. पत्रकारितेतील त्यांच्या अमूल्य योगदानासाठी आठव्या रामनाथ गोयंका पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव देऊन त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं. ब्रिटिश दूतावासातील उच्चपदस्थ अधिकारी म्हणूनही त्यांनी सेवा बजावली. आणीबाणी काळातील रोखठोक भूमिका अन मिसा कायद्यांतर्गत झालेला तुरुंगवास या त्यांच्या आयुष्यातील महत्वाच्या घटना होत.

पेट्रोल, डिझेल GST मध्ये नाहीच

petrol disel
petrol disel

वृत्तसंस्था, नवी दिल्ली|नजीकच्या काळात पेट्रोल, डिझेलच्या किंमती कमी होण्याचं धोरण कुठेच दिसत नसताना, हे इंधन GST कक्षेत येईल, ही आशासुद्धा आता मावळली आहे. केंद्र व राज्य सरकारच्या शासकीय प्रतिनिधींनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या माहितीनुसार पेट्रोल,डिझेल हे GST च्या कक्षेत आणणार नसल्याचं सांगितले आहे. इंधन दरवाढीमुळे सामान्य लोकांना मात्र याचा फटका बसणार आहे.

केंद्र सरकारकडून पेट्रोल व डिझेल वर अनुक्रमे १९.१८ व १५.३३% उत्पादन शुल्क आकारण्यात येते. इंधनावर लावण्यात येणाऱ्या करांमध्ये सध्या सर्वाधिक वाटा राज्य सरकारांचा आहे. प्रत्येक राज्य आकारत असलेल्या या अतिरिक्त कराला ‘ऍड व्हेलोरम’ असे म्हणतात. गोव्यामध्ये हा दर जवळपास १७% तर महाराष्ट्रात ४०% इतका आहे. भारतातील एकूण १७ राज्ये या प्रकारचा कर आकारतात. देशपातळीवर या कराची सरासरी २७% आहे.

कुलभूषण यांच्यावरील सुनावणी फेब्रुवारी २०१९ मध्ये

Kulbhushan
Kulbhushan

आंतरराष्ट्रीय न्यायालय ऐकून घेणार दोन्ही देशांची भूमिका

हेग, नेदरलँड्स|पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी भारतीय नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील सुनावणी फेब्रुवारीमध्ये प्रस्तावित करण्यात आली आहे. पाकिस्तानच्या विनंतीला मान्यता देऊन लवकर सुनावणी घेण्याबाबत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने होकार दर्शविला असून १९ ते २५ फेब्रुवारी या कालावधीत ही सुनावणी होईल.

कुलभूषण यांच्या आई व पत्नीने लोकांची दिशाभूल केल्याचा आरोप पाकिस्तानने केला होता. याव्यतिरिक्त कुलभूषण यांचा मृत्यू झाल्याची अफवा मागील वर्षी १० एप्रिलला पसरविण्यात आली होती. यावर पाकिस्तानने १९६३ च्या व्हिएन्ना कराराचा भंग केल्याबद्दल भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली होती. भारताच्या या प्रश्नाला उत्तर देताना, कुलभूषण जाधव यांना बलुचिस्तान येथुन पकडण्यात आल्याचं व त्यांच्या हालचाली या संशयास्पद व गुप्तहेरीच्या वाटल्यानेच त्यांच्यावर कारवाई केल्याचं पाकिस्तानने सांगितले.

The International Court of Justice is likely to hear retired Indian Naval officer Kulbhushan Jadhav’s case in February 2019

Read @ANI Story | https://t.co/zRpDWqYp4g pic.twitter.com/d5xN5vonMa

— ANI Digital (@ani_digital) August 22, 2018

ट्रकभर स्वप्न – वास्तवाचा शारीरिक प्रवास

trakbhar swapn
trakbhar swapn

चित्रपटनगरी |नितीन चंद्रकांत देसाई दिग्दर्शित ट्रकभर स्वप्न हा नवीन मराठी चित्रपट २४ ऑगस्ट २०१८ रोजी रसिकांच्या भेटीला येत आहे, त्यानिमित्त

१. स्वतःच्या गरजा अन त्यासाठी केली जाणारी तडजोड, नजरेनं बलात्कार करायला लावतात माणसाला

२. सगळे पैसे खातात पण फायदा आपल्यासारख्या गरिबांचाच होतो ना??

३. ३३ कोटी देव ना तुम्ही? तुम्हा सगळ्यांना मिळून आज एक बाई नाही वाचवता आली??

४. पण ज्या नोटेला माझ्या घामाचा वास नाही ती नोट माझी नाही

५. मुलगा – बाबा, तुम्ही सांगा ना मी कोण होऊ मोठेपणी?

बाबा – पैशेवाला हो बाळा, पैशेवाला

वरील संवाद ऐकले आणि सुन्न व्हायला झालं. ट्रकभर स्वप्न या चित्रपटाचा ट्रेलर खूप बोलका आहे. एका सामान्य कुटुंबाला पैशापुढे कोणत्या तडजोडी करायला लागू शकतात यावर हा चित्रपट प्रकाश टाकतो असं एकंदरीत चित्र आहे. येत्या शुक्रवारी, २४ ऑगस्ट रोजी हा चित्रपट महाराष्ट्रात झळकत आहे.

ट्रेलर लिंक

https://www.youtube.com/watch?v=fIcT7OAOTUI

चित्रपट – ट्रकभर स्वप्न

दिग्दर्शक – नितीन चंद्रकांत देसाई

भूमिका – मकरंद देशपांडे, क्रांती रेडकर, आदिती पोहनकर, स्मिता तांबे, यतीन कार्येकर, सुरेश भागवत

पहायला विसरु नका आपल्या जवळच्या चित्रपटगृहात..

आमच्या जगण्याचं करायचं काय?

melghat
melghat

तीव्र कुपोषणामुळे मेळघाटात ३७ बालकांचा मृत्यू

मेळघाट| कुपोषणाची भयानकता दिवसेंदिवस वाढल्याने मेळघाटात मागील ३० दिवसांत ३७ बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी भागातील बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी आरोग्य विभागातर्फे मुंबईत शनिवारी गाभा समितीची बैठक घेण्यात आली होती. मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यातील जुलै महिन्यातील आकडेवारी पाहिली असता शून्य ते सहा वर्षे वयोगटातील ३७ बालकांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले.

राज्यात २१,००० हून अधिक बालके तीव्र कुपोषणाशी झुंज देत आहेत.
मेळघाटच्या धारणी व चिखलदरा तालुक्यांत एप्रिल ते जून या तीन महिन्यात ११४ बालकांचा मृत्यू झाला. गतवर्षीपेक्षा ही आकडेवारी जास्त असल्याची नोंद आहे. बालमृत्यूच्या संख्येत वाढ झाल्यानंतर ही बैठक पार पडल्याने प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यातील आदिवासी भागातील बालमृत्यू रोखण्यासाठी शासनाच्या विविध उपाययोजना अस्तित्वात असताना, मेळघाटात डॉक्टरांच्या रिक्त जागा कायम आहेत. नागपूर अधिवेशनापूर्वी आरोग्य विभागाचे संचालक मेळघाटात येऊनही याबाबत काही फायदा न झाल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.

राहुल गांधींची जर्मनीतील लोकांना भावनिक साद

rahul gandhi
rahul gandhi

हॅम्बुर्ग, जर्मनी |काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. तेथील लोकांशी संवाद साधताना त्यांनी काही भावनिक मुद्द्यांना हात घातला. सोबतच समकालीन भारतीय राजकारणावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक गोष्टींवर मुक्तपणे मतही मांडलं.

ब्युकेरीअस समर स्कुलच्या कॅम्पणगेल सभागृहात परदेशी भारतीयांच्या सभेत ते बोलत होते. अहिंसा हे भारतीयत्वाचं प्रतिक अन तत्वज्ञान आहे. प्रधानमंत्री माझ्याबाबत विद्वेषक बोलतात. पण माझ्या पक्षातील कुणी जरी असं करत असेल तरी त्याला माझा विरोध असतो. माझी आजी व वडील दोघेही हिंसेचा शिकार ठरले, यातून बाहेर पडण्याचा एकच मार्ग होता विसरुन जाणं आणि क्षमा करणं. यातून आम्ही बाहेर पडलो त्यामुळे देशभक्ती व त्याग आम्हालाही माहीत आहेच.

अविश्वास ठरवावेळी मोदींच्या गळाभेटीच स्पष्टीकरण देताना, एखादी व्यक्ती तुमचा राग करत असेल आणि तुम्हीदेखील त्याला रागानेच उत्तर देत असाल तर ते मूर्खपणाच आहे. तुम्ही काय उत्तर देणार याच्यावर तुमचं पूर्ण नियंत्रण असणं गरजेचं आहे. भारतात महिलांवरील अत्याचाराच प्रमाण वाढत आहे. महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन भारतीय पुरुषांनी शिकून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी पुरुष स्त्रीला समान न्यायाने वागवतील आणि आदर करतील त्याचवेळी हे शक्य असल्याचं राहुल गांधी पुढे म्हणाले.

महाराष्ट्राच्या राही सरनोबतला सुवर्ण

rahi sarnobt
rahi sarnobt

आशियाई स्पर्धांत शूटिंगमध्ये सुवर्ण मिळालेली पहिलीच महिला

जकार्ता | येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत २५ मीटर एयर रायफल शूटिंग प्रकारात कोल्हापूरच्या राही सरनोबतने सुवर्णपदकाची कमाई केली आहे. राही सरनोबतनेचे आशियाई स्पर्धेतील हे पहिले सुवर्ण पदक आहे. राहीने अंतिम फेरीत थायलंडच्या नफसवान यांगपैबूनला १ गुणाच्या फरकाने हरवले. ३४ गुणांवर सामना बरोबरीत सुटल्यानंतर घेण्यात आलेल्या ५ शॉट्सच्या खेळात राहीने प्रतिस्पर्धीपेक्षा १ गुण अधिक मिळवला. सौरभ चौधरीनंतर शुटिंगमधील दुसरं सुवर्ण भारताला राहीने मिळवून दिल्याने भारताच्या खात्यात आता एकूण ४ सुवर्णपदक झाले आहेत.

यापूर्वी कामगिरी –

२०१३ – दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्वचषक स्पर्धेत सुवर्ण पदक.
२०१४ – इंचिओन स्पर्धेत कांस्य पदक.