दिल्ली : भारतीय दंड संहितेचे कलम ३७७ नुसार समलिंगी संबंध बेकायदेशीर असून त्यास शिक्षेची तरतूद आहे. समलिंगी असणे हे नैसर्गिक असल्याचे अनेक वैद्यकीय चाचण्यांच्या अंती स्पष्ट झाले आहे. हाच धागा पकडून हमसफर ट्रस्टच्या अशोकराव कवि आणि आरिफ जफर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालय सदरील याचिकांवर आज एकत्रित सुनावणी देणार असल्याचे समजत आहे. १० जुलैपासून पाच न्यायाधीशांच्या न्यायपीठा समोर ही सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या.रोहिंग्टन आर नरीमन, न्या. ए एम खानविलकर, न्या.डी.वाई चंद्रचूड, न्या. इंदू मल्होत्रा या न्यायाधीशांचा न्यायपीठात समावेश असणार आहे. सर्वोच्च न्यायालय समलिंगी संबंधावर काय सुनावणी देणार यांची सर्वांना उत्सुकता लागली आहे.
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांना १० वर्षाचा तुरुंगवास
दिल्ली : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांची मुलगी मरियम नवाज यांना न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. सत्तेत असताना पदाचा गैर वापर करून पैशाचा गैरव्यवहार केल्याचा आरोप शरीफ यांच्यावर आहे. नवाज यांना दहा वर्ष तर मरियम याना ७ वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पनामा पेपर लीक घोटाळ्यात अडकलेल्या नवाज शरीफ यांना घोटाळ्यात हात गुंतल्यामुळे पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. पाकिस्तानच्या न्यायालयात शरीफ यांच्यावर खटला चालू होता. आज दिलेल्या निकालात शरीफ यांच्यावरील गुन्हा सिद्ध झाल्याचे न्यायालयाने म्हणले आहे. शरीफ यांनी पनामा कंपनीतमधे मोठ्या प्रमाणावर काळा पैसा गुंतवला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
उपराजधानीला पाण्याचा वेढा
नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूरला पाण्याने वेढा दिला आहे. मागील दोन दिवसात झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात पूरजन्य परिस्थिती बनली आहे. धोधो बरसणाऱ्या पावसाने शहराच्या सकल भागात पाणी साठले असून वाहतूकव्यवस्था कोलमडली आहे. पावसाळी अधिवेशनास आलेल्या आमदारांना त्रासास सामोरे जावे लागत आहे. साठलेल्या पाण्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागपूर विमानतळ परिसरात ही मोठ्या प्रमाणत पाणी साठले आहे. विधान भवन परिसरात ही पाणीच पाणी साठल्याने अधिवेशनाला आलेल्या आमदारांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
मिथुन चक्रबोर्ती यांचा मुलगा महाक्षयवर भोजपुरी अभिनेत्रीचा बलात्काराचा आरोप, उच्च न्यायालयाने फेटाळला अटकपूर्व जामिन
मुंबई : मिथुन चक्रबोर्ती यांचा मुलगा महाक्षय आणि पत्नी योगीता बली यांना दिलासा देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. बलात्कार, फसवणूक आणि गर्भपात करण्यास जबरदस्ती केल्याच्या प्रकरणामधे उच्च न्यायालयाने त्यांचा अटकपुर्व जामिन फेटाळला आहे. दिल्लीस्थित भोजपूरी अभिनेत्रीने या दोघांविरोधात पोलीसांत तक्रार दाखल केली होती. दिल्लीच्या न्यायालयाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे अादेश पोलीस प्रशासनाला दिले होते. त्यासंदर्भात महाक्षय यांनी उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिन मिळण्यासाठी अर्ज केला होता. परंतु मुंबई उच्च न्यायालयाने महाक्षय यांचा जामिन अर्ज फेटाळला आहे.
काय आहे प्रकरण?
दिल्लीस्थित भोजपूरी अभिनेत्रीने मिथुन चक्रबोर्ती यांचा मुलगा महाक्षय याच्यावर बलात्काराचा आरोप केला आहे. मागील चार वर्षांपासून ते दोघे रिलेशनशीपमधे असल्याचे तिने म्हणले आहे. दरम्यानच्या काळात महाक्षय याने तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे. शारिरीक संबंधामुळे प्रेग्नंट असताना जबरदस्तीने गर्भपात करायला लावल्याचा आरोपही त्या स्त्रीने केला आहे. याप्रकरणात मिथुन चक्रबोर्ती यांची पत्नी योगीता बली याही दोषी असल्याचं तक्रारीत नमुद केले आहे. दिल्ली पोलीसांकडे सदरिल तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर महाक्षय यांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपुर्व जामिनासाठी अर्ज केला होता. परंतु उच्च न्यायालयाने जामिन फेटाळल असल्याचे समोर आले आहे. येत्या ७ जुलै रोजी महाक्षय यांचा विवाहसोहळा असून आता याप्रकरणामुळे विवाहसोहळ्यास अडचण येण्याची शक्यता अाहे.
महादेव जानकरांनी भाजपची उमेदवारी डावलली
नागपूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते व राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी भाजपचे उमेदवार होण्यास इन्कार केला आहे. भाजपाची उमेदवारी डावलून त्यांनी विधानपरिषदेची निवडणूक रासपाचे उमेदवार म्हणुन लढवण्याचे निश्चित केले आहे. जानकर रासपाच्या उमेदवारीवर ठाम राहील्याने भाजपाला मोठा धक्का बसला आहे. राज्यातील विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १६ जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्यासाठी १२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. नारायन राणे, विनायक मेटे आदींपाठोपाठ जानकर यांनी भाजपची उमेदवारी घेऊन विधानपरिषदेवर जावे यासाठी मुख्यमंत्री देवेंन्द्र फडणवीस तसेच अन्य वरिष्ठ नेते प्रयत्न करत होते. परंतु सर्वांचे प्रयत्न हाणून पाडत महादेव जानकर यांनी स्वत:च्या राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी घेऊनच निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाच्या पृथ्वीराज देशमुख यांनी अतिरिक्त उमेदवारी अर्ज दाखल केला असून त्यांनी अर्ज मागे घेतल्यास सर्व ११ सदस्यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता आहे.
राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगीती
दिल्ली : बीसीसीआयच्या अंतरिम संविधानावर सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणुका रोखून धरत त्यावर स्थगिती आणत असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केले आहे. बीसीसीआयचे प्रशासन शिस्तबद्ध करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा विचार असून राज्य क्रिकेट बोर्डाच्या निवडणूकांचा निकाल राखून ठेवल्याचे न्यायालयाने निकालादरम्यान सुनावले आहे.
पाऊले चालती पंढरीची वाट..
देहू : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे आज पंढरीकडे प्रस्थान झाले आहे. लाखो वारकऱ्यांच्या साक्षीने टाळमृदुगाच्या गजरात पंढरीकडे प्रस्थान ठेवले आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला साडे तीनशे वर्षाची परंपरा असून संत तुकाराम महाराजांचे कनिष्ठ पुत्र श्री नारायण महाराज हे या पालखी सोहळ्याचे उद्गाते आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा आजचा पहिला मुक्काम आहे. हा मुक्काम इनामदार वाड्यात असणार आहे. परंपरागत पहिला मुक्काम झाल्यानंतर पालखी उद्या आकुर्डी येथे मुक्कामासाठी प्रस्थान करणार आहे. दरम्यान वैष्णवांचा मांदियाळी संतांच्या पालख्या सोबत पंढरपूरकडे वारीत सहभागी होण्यासाठी ऐकवटतली आहे.
कर्नाटकच्या शेतकऱ्यांना मिळणार कर्ज माफी
बंगळुरु : निवडणुकीत घोषित केल्या प्रमाणे कुमारस्वामी सरकारने कर्नाटकामधे शेतकरी कर्ज माफीचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या कर्जमाफीची कार्यवाही केली जाणार आहे. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकडे कुमारस्वामी सरकार लक्ष देत असून एका नंतर एक धडाकेबाज निर्णय घेऊन सरकारची कुशलता दाखवली जात आहे. २०१९ च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कुमारस्वामी सरकार दमदार कामगिरी करू पाहत आहे. त्यादृष्टीने आज त्यांनी कर्नाटक विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी ३४००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. कर्जमाफीद्वारे २ लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येणार असल्याचे समजत आहे. एकंदर लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॉग्रेस आणि जनता दल कर्नाटकात कामाला लागले आहे.
कठुआ बलात्कार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय
दिल्ली : देशाला हादरवून टाकणारे कठुआ बलात्कार प्रकरण अजुनही न्यायाच्या प्रतिक्षेत आहे. कठुआ प्रकरणी सुनावनी देताना सर्वोच्च न्यायालयाने आरोपी परवेज कुमार पौढ असल्याचा निर्वाळा दिला आहे. आरोपीने आपण अज्ञान(अल्पवयीन) असल्याचा दावा कोर्टा समोर केला होता. त्यासंबंधी खटल्याचा निकाल देताना न्यायालयाने आरोपी पौढ असल्याचे म्हणले आहे. कोर्टाने यासंबंधी वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यावर आज पठाणकोट कोर्टात सुनावणी करण्यात आली. आरोपीची बोन टेस्ट करण्यात आली असुन आरोपी परवेज कुमार हा सज्ञान(प्रौढ) असल्याचे टेस्ट मधून समोर आले आहे.
कठुआचे प्रकरण घटना घडल्या नंतर दोन महिन्याने उजेडात आले होते. पोलिसांच्या दिरंगाईचे गालबोट सदर खटल्यास लागले होते. लोकांच्या आणि माध्यमाच्या दबावाने खटला राज्य गुन्हे अन्वेषण शाखेकडे वर्ग करण्यात आला होता. १०जानेवारी २०१८ रोजी कठुआ येथून एका अल्पवयीन मुलीला गायब करण्यात आले होते. मुलीवर अनेक दिवस बलात्कार केला जात होता. त्यानंतर तिचे शरीर मृत अवस्थेत आढळून आले होते. सुप्रीम कोर्टाने सदरील खटला बालक न्यायालयात चालवण्याचे निर्देश दिले होते. परंतु आरोपी सज्ञान असल्याचे सिद्ध झाल्याने आता खटला सामान्य कोर्टात चालवला जाईल असे पठाण कोट कोर्टाने जाहीर केले आहे.
पुण्यातील एम.आय.टी. स्कूलवर चौकशी करुन कारवाई करणार – विनोद तावडे
मुंबई : पुणे येथील माईर्स एम.आय.टी. स्कूल प्रशासनाने बुधवारी विचित्र फतवा काढला होता. विद्यार्थ्यांवर आणि पालकांवर अनेक निर्बंध लादण्याचा प्रयत्न संस्था प्रशासनाने केला होता. त्यावर बोलताना संबंधित शाळेवर योग्य ती कारवाई केली जाईल असे राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हणले आहे. पुण्याच्या सहाय्यक शिक्षण संचालकांना सदरील प्रकरणाबाबत कमिटी नेमूण योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे यावेळी तावडे यांनी सांगितले आहे.
विश्वशांती एम.आय.टी. स्कूलने फतवा काढून विद्यार्थी आणि पालक यांच्यामधे दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता. त्यासंदर्भात काही पालकांनी याची शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे दाद मागीतली होती. विद्यार्थ्यांनी पांढर्या किंवा फिक्कट रंगांची अंतर्वस्त्रे खालावीत, मुलींनी लिपस्टीक लावू नये, स्कर्टची लांबी प्रमाणात असावी, इंग्रजीव्यतिरिक्त इतर भाषा बोलल्यास प्रवेश रद्द केला जाईल अशा प्रकारचे विचित्र नियम फतव्यात नमुद करण्यात आले होते.