Tuesday, December 23, 2025
Home Blog Page 707

Business Ideas : फक्त 2 लाखात सुरु करा ‘हे’ 10 व्यवसाय; प्रतिमहिना कराल बक्कळ कमाई

Business Ideas

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Business Ideas) असे बरेच लोक असतील जे मासिक पगारावर घर चालवतात. पण अनेकदा घरातील सदस्यांच्या सगळ्या गरजा पगारातून पूर्ण होत नाहीत. मग अशावेळी उत्पन्नाचे इतर पर्याय शोधले जातात. पण मोठी गुंतवणूक करावी लागेल म्हणून हात आखडता घेतात. पण आजचं युग आर्थिक युग आहे. इथे थांबून चालत नाही. त्यात जगण्यासाठी पैसा किती महत्वाचा आहे हे काही वेगळे सांगायला नको.

त्यामुळे पैसे कमावण्याचे इतर मार्ग शोधणाऱ्या प्रत्येकासाठी आज आम्ही काही खास पर्याय घेऊन आलो आहोत. फक्त २ लाख रुपये गुंतवणूक करून भरघोस कमाई करून देणाऱ्या बिजनेस ऑप्शन्सची ही लिस्ट कदाचित तुमच्या कामी येऊ शकते. मुख्य म्हणजे, हे व्यवसाय तुम्ही गावात किंवा शहरात असे कुठेही सुरु करू शकता. त्यामुळे वेळ न घालवता लगेच सविस्तर माहिती घेऊया.

1. शिक्षक (Business Ideas)

जर तुम्ही शिक्षित असाल तर तुम्ही घरच्या घरी होम ट्युशन घेऊ शकता. मात्र, यासाठी तुम्हाला ज्या त्या विषयाचे चांगले ज्ञान असणे आवश्यक आहे. तसेच जर तुम्ही शिक्षकच असाल तर तुम्हाला शिकवणी घेणे सोपे जाईल. घरी किंवा एखादा रम बघून तिथे तुम्ही क्लास सुरु करू शकता. मुलांची संख्या वाढल्यास इतर विषयांसाठी तुम्ही दुसरा शिक्षकसुद्धा नेमू शकता.

2. फ्रीलांसर

फ्रीलान्सिंग हा असा व्यवसाय आहे जो तुम्ही अगदी घरबसल्या करू शकता. यामध्ये कामाचं फार प्रेशर नसलं तरी कमाई चांगली असते. यात तुम्ही ग्राफिक डिझायनिंग, एमएस ऑफिस, कंटेंट रायटिंग अशी कामं करू शकता. यातून तुम्हाला घरबसल्या काम आणि पैसा दोन्ही मिळेल. (Business Ideas) मुख्य म्हणजे या कामाच्या शोधासाठी तुम्हाला वणवण कायची गरज नाही. मोबाईलवर किंवा लॅपटॉप ऑनलाईन स्वरूपात तुम्ही कामाचा शोध घेऊन कंपन्यांशी टायअप करू शकता. जसजसा कामाचा ओघ वाढेल तुम्हाला आपोआप नव्या कामाच्या ऑफर येत राहतील.

3. बेकरी

बरेच लोक रोजच्या आहारात बेक फूडचे सेवन करतात. त्यामुळे जर तुम्हाला चांगलं बेकिंग येत असेल तर तुम्ही घरच्या घरी ताजे बेकिंग फूड बनवून त्याची विक्री करू शकता. या व्यवसायात तुम्हाला मोठ्या गुंतवणुकीची गरज नाही. ऑर्डर असेल त्याप्रमाणे सामान आणून तुम्ही पदार्थ बनवनु शकता. (Business Ideas) यासाठी तुम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करू शकता आणि कामाचा जसजसा ओघ वाढेल भविष्यात मोठ्या बेकरीचा विस्तार करू शकता.

4. केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट

घरातील विविध सोहळे, कार्यक्रम पार पाडण्यासाठी एका मॅनेजमेंटची गरज असते. ती करण्याचे कौशल्य तुमच्याकडे असेल तर केटरिंग आणि इव्हेंट मॅनेजमेंट हा बिजनेस करणे तुमच्यासाठी सोपे जाईल. फक्त यासाठी तुम्हाला माणसांना पगारावर घ्यावे लागेल. तसेच काही प्रमाणात गुंतवणूक देखील करावी लागेल. (Business Ideas) केटरिंग व्यवसायात पाय रोवण्यासाठी कुशल स्वयंपाकी संघ तयार करा. तसेच इव्हेन्ट मॅनेजमेंटसाठी कुशल कामगार नेम आणि चांगल्या दर्जाचे सामान खरेदी करा. यासाठी सुरवातीला २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. काम आणि कमाई वाढेल तशी आणखी गुंतवणूक करता येईल.

5. हॅण्डमेड वस्तू (Business Ideas)

आज बाजारात हॅण्डमेड वस्तुंना मोठी मागणी आहे. त्यामुळे जर तुम्ही उत्कृष्ट कलाकार असाल आणि तुमच्या कौशल्याचा योग्य वापर केलात तर तुम्ही हाताने बनवलेल्या वस्तूंची विक्री करून तुम्ही मोठी कमाई करू शकता. महिलांसाठी हा एक चांगला व्यवसाय ठरू शकतो. कागदी पिशव्या, सुगंधी उटणे- परफ्युम- साबण, गिफ्ट्स आणि अजून बरंच काही या मध्ये बनवता येईल. तुमच्या उत्पादनांची सोशल मीडियावर जाहिरात करून तुम्ही चांगला बिजनेस करू शकता.

6. किराणा दुकान

किराणा हा सदाबहार बिजनेस आहे. इथे पैसा रोलिंगमध्ये राहतो. या क्षेत्रात स्पर्धा जास्त आहे. मात्र आता ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. ज्यांच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या आपल्या ग्राहकांना तुमच्याकडे असणाऱ्या सामानाची माहिती देऊ शकता आणि घरपोच डिलिव्हरी करून ग्राहक संख्या वाढवू शकता. (Business Ideas) यासाठी सुरुवातीला २ लाख रुपये गुंतवणे ठीक राहील.

7. हेल्थ क्लब

बिघडती जीवनशैली आरोग्य खराब करतेय. ज्यामुळे बरेच लोक विविध आजरांना बळी पडत आहेत. अशा परिस्थितीत तुम्ही योगा क्लास, डान्स क्लास, झुंबा क्लास, जिम इत्यादी अनेक गोष्टींमध्ये आवश्यक ती गुंतवणूक करून लोकांसाठी चांगला पर्याय उपलब्ध करून देऊ शकता. (Business Ideas) फक्त यासाठी तुम्हाला फिटनेस क्षेत्राचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय सुरुवातीला कमी एक्यूपमेंटसोबत हा व्यवसाय सुरु करू शकता.

8. ब्लॉग

जर तुम्ही उत्तम लेखन करू शिकत असाल तर ब्लॉगिंगच्या माध्यमातून तुम्हाला चांगली कमाई करण्याची संधी आहे. यासाठी तुम्ही स्वतःची वेबसाइट तयार करा. त्याच्या प्रमोशनसाठीही अनेक प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करा. (Business Ideas) तुमचा ब्लॉग वाचणाऱ्यांची संख्या वाढू लागली की तुमच्या ब्लॉगवर जाहिरात करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता.

9. रिपेअर वर्कशॉप

विद्युत उपकरणे अनेकदा काही ना काही कारणांनी बंद होत असतात. ती दुरुस्त करण्याचे तुमच्याकडे कौशल्य असेल तर तुम्ही रिपेअर वर्कशॉप सुरु करू शकता. यासाठी आवश्यक उपकरणे, दुरुस्तीचे सामान यामध्ये २ लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येईल. तुमच्याकडे दुरुस्तीचे खरोखर चांगले कौशल्य असेल तर तुमच्या कामाचा विस्तार वाढू शकतो. मर्यादित उत्पादनांपासून सुरुवात केल्या हा व्यवसाय तुम्हाला चांगली कमाई करून देऊ शकतो.

10. मोबाईल, लॅपटॉप रिपेअरिंग शॉप

आजकाल वर्क फ्रॉम होमचं गजब फॅड आहे. त्यामुळे मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरची मागणी वाढली आहे. दरम्यान, काम सुरु असताना ही उपकरणे बंद झाली तर? त्याच्या रिपेअरिंगसाठी वणवण करावी लागते. (Business Ideas) ही वणवण तुम्ही थांबवू शकता. यासाठी तुम्हाला ही उपकरणे दुरुस्त करण्याचे कौशल्य अवगत असायला हवे. हे दुकान सुरु करताना तुम्हाला सुरुवातीला जास्त सामान ठेवण्याची गरज नाही. तुम्हाला काही आवश्यक हार्डवेअर तुमच्यासोबत ठेवावे लागतील.

Panjab National Bank | पंजाब नॅशनल बँकेचा ग्राहकांना झटका! व्याजदरात झाली एवढे टक्के वाढ

Panjab National Bank

Panjab National Bank | पंजाब नॅशनल बँक ही एक मोठी बँक आहे. या बँकेने नुकताच त्यांच्या ग्राहकांना एक मोठा धक्का दिलेला आहे. या बँकेने 31 मे रोजी निधीवर आधारित कर्जदारांमध्ये 5 बेस पॉईंटपर्यंत वाढ केलेली आहे. ही वाढ वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळी असते. त्या बँकेने 1 जून 2024 पासून नवीन दर लागू केलेले आहेत.

पंजाब नॅशनल बँकेने काही कालावधीसाठी असलेले दर हे पूर्वीप्रमाणे ठेवलेले आहे. जसे की रात्रभर MCLR मध्ये कोणताही बदल केलेला नाही. तो पूर्वीप्रमाणेच 8.25 टक्के एवढा आहे. तसेच बँकेने एक महिन्याच्या कालावधीसाठी MCLR दर देखील कायम ठेवला आहे. त्यातही बदल केलेला नाही. हा दर 8.30% एवढा आहे.

परंतु बँकेने एक महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी MCLR दरामध्ये वाढ केलेली आहे. तीन महिन्याच्या कालावधीसाठी MCLR हा 8.50% एवढा करण्यात आलेला आहे. तर हा दर पूर्वी 8.45% एवढा होता. त्याचप्रमाणे सहा महिन्यांचा MCLR दर 8.65 टक्के एवढा होता. तो आता 8.70% एवढा करण्यात आलेला.

त्याचप्रमाणे आपण एक वर्षाचा दर पाहिला तर हा दर सुरुवातीला 8.80% होता .आता तो 8.85% एवढा करण्यात आलेला आहे. तीन वर्षाचा MCLR दर हा 9.10% एवढा होता. तो आता 9.15 टक्के करण्यात आलेला आहे.

MCLR म्हणजे काय ? | Panjab National Bank

MCLR म्हणजे मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड बेस्ट लेंडिंग रेट. हा एक इमानदार आहे. ज्याच्या खाली कोणतीही बँक ग्राहकांना कर्ज देऊ शकत नाही. जितके जास्त MCLR दर वाढताना तितके व्याज देखील वाढते. बँकांना त्याचा रात्रभर, एक महिना, तीन महिने, सहा महिने, एक वर्ष तसेच दोन वर्षाचा MCLR तर पुनरावलोकन आणि प्रकाशित करणे बंधनकारक आहे.

मुंबई हादरलं!! IAS अधिकाऱ्याच्या मुलीने इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन

lipi Rastogi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणूक निकालाची तयारी सुरू असताना मुंबईमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी आयएएस अधिकाऱ्याच्या मुलींने मंत्रालयासमोरच्या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यामुळे सध्या मंत्रालयाच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सांगितले जात आहे की, शैक्षणिक कामगिरीच्या नैराश्यातून या मुलीने टोकाचे पाऊल उचलले. सध्या याचं प्रकरणाचा तपास पोलीस करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आयएएस अधिकारी विकास रस्तोगी (IAS officer Vikas Rastogi) आणि राधिका रस्तोगी (Radhika Rastogi) यांच्या मुलीने म्हणजेच लिपी रस्तोगी (Lipi Rastogi) हीने सुनीती इमारतीवरुन आज पहाटे चार वाजता उडी मारुन आत्महत्या केली आहे. लिपी रस्तोगी ही 27 वर्षांची असून ती वकिलीचे शिक्षण घेत होती. मात्र गेल्या काही दिवसांपूर्वी ती शैक्षणिक कामगिरीमुळे नैराश्यात होती. यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचे सांगितले जात आहे. महत्वाचे म्हणजे, आत्महत्या करण्यापूर्वी लिपी रस्तोगीने सुसाइड नोट ही लिहून ठेवली होती, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.

दरम्यान, लिपी रस्तोगीचे वडील विकास रस्तोगी हे महाराष्ट्राच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागात प्रधान सचिव आहेत. तर आई राधिका रस्तोगी याही वरिष्ठ IAS अधिकारी आहेत. आज अचानक लिपी रस्तोगीने आत्महत्या केल्यामुळे रस्तोगी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुख्य म्हणजे, यापूर्वी 2017 साली महाराष्ट्र केडरचे भारतीय प्रशासकीय सेवेतील आयएएस अधिकारी मिलिंद यांच्या 18 वर्षीय मुलाने देखील मुंबईतील एका उंच इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. आता पुन्हा एकदा मुंबईत असाच एक प्रकार घडला आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नाबार्डकडून पीककर्ज उचलच्या मर्यादेत झाली वाढ

Nabard

हॅलो महाराष्ट्र | गेल्या काही वर्षापासून नैसर्गिक आपत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या पिकांचे नुकसान होत आहे. बाजारात पिकाला बाजार भाव देखील खूप कमी मिळत आहे. परंतु शेतीसाठी लागणाऱ्या गोष्टीचा खर्च मात्र वाढतच चाललेला आहे. त्यामुळे शेतकऱ्याला आर्थिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

शेतीसाठी लागणाऱ्या रासायनिक खतांच्या दरामध्ये देखील आजकाल मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे. आणि मजुरीच्या खर्चात देखील वाढ झालेली आहे. त्याचप्रमाणे महागाईच्या दृष्टीने विचार केला, तर आजकाल शेती करणे हे शेतकऱ्याला परवडत नाही. कारण डिझेलच्या दरात देखील वाढ झाल्याने शेतीच्या मशागतीचा खर्च देखील वाढलेला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना शेतातून जेवढे काही उत्पन्न होते. ते शेतीसाठी जाते. आणि स्वतःसाठी त्यांना काहीही वापरता येत नाही. त्यामुळे आता नाबार्डच्या माध्यमातून पीक कर्ज उचलीच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता विविध पिकांसाठी वेगवेगळ्या प्रकारे वाढीव दराने पीक कर्ज शेतकऱ्यांना मिळणार आहे. यामध्ये सगळ्यात जास्त पीक कर्ज हे आडसाली ऊसाला मिळणार आहे हे कर्ज हेक्टरी 1 लाख 70 हजार रुपयांपर्यंत मिळणार आहे.

नाबार्डकडून पीक कर्ज उचलीच्या मर्यादित वाढ

गेल्या काही वर्षापासून पिकांचा उत्पादन खर्च वाढलेला आहे. आणि त्यामुळेच आता नाबार्डच्या माध्यमातून पीक कर्ज उचलीच्या मर्यादेमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. आडसाली उसाला हेक्टरी 1 लाख 70 हजार रुपये एवढी उचल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे भात पिकाला 50 हजार रुपये , सोयाबीनला 66 हजार रुपये हेक्टरी मिळणार आहेत. राज्यस्तरीय तांत्रिक समितीच्या शिफारसी नंतर आता कोल्हापूर जिल्हा बँक 2024- 25 या हंगामासाठी देण्यात येणाऱ्या खरीप पिकासाठी अंमलबजावणी करण्यात येणार आहे. नाबार्डच्या मान्यतेने वाढीव दराच्या सूचना देखील वित्तीय संस्थांना दिल्या जातात.

सुरु झालाय Flipkart चा सेल ; फोनपासून फॅशनपर्यंत सर्व गोष्टींवर बेस्ट ऑफर्स

Flipkart Sale : सध्याच्या डिजिटल युगामध्ये आपण घरबसल्या वेगवेगळी खरेदी करणं पसंत करतो. ई-कॉमर्स वेबसाईटवर सध्या ग्राहकांची गर्दी पाहायला मिळते. अशाच लोकप्रिय असलेल्या फ्लिपकार्ट या ई कॉमर्स वेबसाईटवर सध्या मोठा सेल सुरू झाला आहे. याचे नाव आहे ‘फ्लिपकार्ट बिग बिलियन एंड ऑफ सीजन सेल’ (Flipkart Big End of Season Sale) जो 8 जूनपर्यंत आहे.सेल मध्ये स्मार्टफोन, गॅझेट आणि ॲक्सेसरीज, फॅशन प्रोडक्स (Flipkart Sale) अशा सगळ्या गोष्टींवर 80% पर्यंत डिस्काउंट मिळतो आहे. ज्याचा तुम्हाला चांगला फायदा होणार आहे. चला जाणून घेऊया नक्की काय आहे सेल ? या मध्ये घेण्यासारखं काय आहे ? कशावर किती डिस्काउंट मिळतो आहे?

फ्लिपकार्ट ही वेबसाईट खास करून स्मार्टफोन्स आणि इलेकट्रोनिक गॅजेट्स साठी प्रसिद्ध आहे. यामध्ये तुम्हाला जर स्मार्ट गॅजेट्स आणि ॲक्सेसरीज खरेदी करायचे असेल तर त्यासाठी 50 ते 80% पर्यंत सूट सध्या आहे याशिवाय स्मार्टफोन सुद्धा डिस्काउंट ऑफर मिळत आहेत. Flipkart वरून खरेदी करताना जर तुम्ही UPI Flipkart पेमेंटचा वापर केला तर तुम्हाला दहा टक्के अधिक डिस्काउंट (Flipkart Sale) मिळवू शकता.

स्मार्टफोनवर मिळतोय डिस्काउंट (Flipkart Sale)

Flipkart च्या या फ्लिपकार्ट एंड ऑफ सीजन सेल मध्ये तुम्ही जर स्मार्टफोन लिस्ट केला असेल तर तुम्हाला स्वस्तामध्ये स्मार्टफोन खरेदी करण्याचा चान्स आहे. यामध्ये अगदी आयफोन पासून अँड्रॉइड स्मार्टफोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकता. यामध्ये मोटोरोला, रेडमी, सॅमसंग यासहित अनेक ब्रँडचा समावेश आहे. विविध ब्रँड तुम्हाला डिस्काउंट (Flipkart Sale) मिळतो आहे.

TWS पासून पॉवर बँक पर्यंत सूट (Flipkart Sale)

फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये स्मार्ट गॅजेट्स देखील उपलब्ध आहेत, जे चांगल्या सवलतींसह खरेदी केले (Flipkart Sale) जाऊ शकतात. या सेलमध्ये हेडफोन, TWS, स्मार्टवॉच, मोबाइल ॲक्सेसरीज, तुम्ही स्पीकर आणि साउंडबार, पॉवर बँक आणि स्मार्ट होम डिव्हाइसेस खरेदी करू शकता.

ब्रँडेड शूज आणि कपड्यांवरही सूट

फ्लिपकार्ट सेलमध्ये ब्रँडेड शूज, कपडे आणि घड्याळे सवलतीने खरेदी करता (Flipkart Sale) येतील. कंपनीचा दावा आहे की अनेक कपड्यांवर 80% पर्यंत सूट मिळू शकते. एवढेच नाही तर प्युमा शूजवर किमान ५०% पर्यंत सूट मिळेल.

Anger Control Tips : लगेच राग येतो? कंट्रोल होत नाही? शांत होण्यासाठी ‘या’ टिप्स करतील तुमची मदत

Anger Control Tips

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Anger Control Tips) जगभरात असे बरेच लोक असतील ज्यांना प्रत्येक लहान गोष्टीमूळे राग येत असेल. एखादी वस्तू जागेवर नाही, मनासारखं काम झालं नाही, समोरच्याला यायला उशीर झाला ते अगदी ताटात नावडती भाजी अशा कोणत्याही कारणावरून चटकन राग येणारे कितीतरी लोक तुमच्या आसपास असतील. ज्यांच्यासोबत तुम्ही रोज उठता बसता. असे लोक मुळात वाईट असतात असे काही नाही. पण या लोकांना त्यांचा राग कंट्रोल होत नाही. जर तुम्हालाही तुमचा राग कंट्रोल होत नसेल किंवा तुमच्या प्रियजनांपैकी कुणी असं असेल तर ही बातमी त्यांच्यासाठी आहे.

राग हा माणसाचा शत्रू आहे. बऱ्याचदा रागामुळे अनेक नाती तुटतात, काम खराब होतात. इतकेच नाही तर राग आपले आरोग्यसुद्धा बिघडवू शकतो. रंगामुळे मेंदूवर आणि हृदयावर वाईट परिणाम होतात. (Anger Control Tips) ज्यामुळे भविष्यात गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे वेळीच रागावर नियंत्रण मिळवणे गरजेचे आहे. म्हणून आज आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स देणार आहोत. ज्यांच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल करू शकाल. चला जाणून घेऊया.

नेमका राग कधी आणि का येतो? याचे कारण शोधा

तुम्ही रोजच चिडचिड करता रागावता ही गोष्ट वेगळी. पण तुम्हाला नेमका राग कधी आणि का येतो? हे तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. कारण असताना राग येणे ही वेगळी बाब आहे. पण कारण नसताना रागावणे चिंताजनक बाब आहे. त्यामुळे तुम्हाला नेमका कोणत्या गोष्टीचा राग येतोय? हे आधी समजून घ्या. (Anger Control Tips) म्हणजे रागावर नियंत्रण मिळवणे सोपे जाईल. एखादी सवय किंवा कृती ज्यामुळे तुमची चिडचिड होते हे लक्षात आलं तर तुम्ही वेळीच त्यावर रोख लावू शकता. ज्या गोष्टींचा राग येतोय ते टाळू शकता. यामुळे तुमची चिडचिड थांबू शकते.

कुणाशीही बोलू नका, क्षणभर विश्रांती घ्या

तुम्ही चिडला असाल किंवा रागावला असाल तर सगळ्यात आधी कुणाशीही बोलणे टाळा. जितका संवाद वाढेल, शब्दाला शब्द वाढत जाईल. यामुळे तुमचा राग कमी होणार नाही तर आणखी वाढेल. (Anger Control Tips) त्यामुळे आधी संवाद तोडा आणि त्यांनतर एखाद्या शांत ठिकाणी निघून जा. कुणाशीही काहीही चर्चा न करता शांत बसून आत्मचिंतन करा. सारासार विचार करा आणि ताण हलका झाला की, मग आपोआप तुमचा राग शांत होईल.

आधी विचार करा, मग बोला

अनेकदा रागात माणूस काहीही बोलून जातो आणि यामुळे समोरचा माणूस दुखावतो. (Anger Control Tips) अशा परिस्थितीत आपली जवळची माणसे दुरावू शकतात. त्यामुळे तुम्हाला राग येतोय असं जाणवलं तर काहीही बोलण्याआधी दीर्घ श्वास घ्या. उलटे आकडे मोजा. म्हणजे तुमचे विषयावरून लक्ष भरकटेल. थोड्या वेळात तुमचा राग शांत होईल मग सारासार विचार करून तुम्ही तुमचा मुद्दा मांडण्यासाठी संवाद साधा.

मेडिटेशन करा (Anger Control Tips)

सतत राग येण्याचं कारण मानसिक ताण तणाव असू शकतं. त्यामुळे नियमित न चुकता मेडिटेशन अर्थात ध्यानधारणा करा. यामुळे तुमचा मूड फ्रेश राहील आणि डोक्यावरील ताण दूर होईल. परिणामी तुमची कॉर्टिसोलची पातळी कमी होईल आणि हॅपी हार्मोन्स रिलीज होतील. ज्यामुळे तुमची चिडचिड कमी होईल आणि सतत राग येणे बंद होईल.

आवडत्या व्यक्तीसोबत वेळ घालवा

अनेकदा जे औषध करू शकत नाही ते जवळची व्यक्ती करू शकते. मनावरील बऱ्याच जखमा जवळच्या व्यक्तीने साधी फुंकर घातली तरी बऱ्या होतात. त्यामुळे तुमच्या मनात कोणतीही भावना दडवून ठेवू नका. (Anger Control Tips) तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत मनमोकळा संवाद साधून व्यक्त होत रहा. यामुळे तुमच्या मनावरील दड्पड दूर होईल आणि आपोआप ताण कमी होईल. ज्यामुळे तुमची चिडचिड सुद्धा थांबेल.

तज्ञांचा सल्ला

वरील कोणत्याही स्थितीत तुम्हाला तुमचा राग कंट्रोल करता आला नाही तर तुम्हाला थेरपिस्टची गरज आहे हे मान्य करा. वेळीच तज्ञांचा सल्ला घ्या आणि रागावर नियंत्रण मिळवा. अन्यथा तुमचा राग कधी तुमचाच घात करेल हे तुमच्या लक्षातही येणार नाही. (Anger Control Tips)

अजित पवारांच्या ‘ही’ एक जागा Exit Poll मध्ये सेफ दाखवतेय

AJIT PAWAR

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लोकसभेच्या फायनल निकालाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना एक्झिट पोलचा निकाल आता समोर आलाय. महाराष्ट्रात नेमकं कुठून कोण आघाडी घेतय? याच स्पष्ट चित्र या एक्झिट पोलमधून दिसू लागलय. देशात पुन्हा एकदा मोदींची गॅरंटी चालली असली तरी महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीच्या बाजूने जनतेचा कौल दिसतोय. त्यातही शिंदे आणि अजितदादांनी केलेलं बंड जनतेला पटलेलं नाही, म्हणूनच त्यांच्या जागांमध्ये घट झाल्याचं एक्झिट पोल मध्ये दिसतंय. पण सर्वात जास्त कमाल झालीये ती अजित पवारांच्या राष्ट्रवादीची. महाराष्ट्राच्या महानिकालात त्यांच्या राष्ट्रवादीला अवघ्या एका जागेवर यश येईल असं जवळपास सर्वच पोलच म्हणणं आहे. त्यामुळे आता ही एक जागा कुठली? याचं कोडं सगळ्यांनाच पडलंय. त्यामुळे इन डेप्थ मध्ये जाऊन अजित पवार नेमका कुठला गड राखतायेत? तेच समजून घेऊयात.

महाराष्ट्रातील जवळपास सर्वच महत्त्वाच्या एक्झिट पोलमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शून्य ते एक जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय. तसं पाहायला गेलं तर अजित पवार यांच्या वाट्याला लोकसभेच्या चार जागा आल्या होत्या. त्यात रायगड मधून सुनील तटकरे, शिरूर मधून शिवाजीराव आढळराव पाटील, धाराशिव मधून अर्चना पाटील तर सर्वात जास्त प्रतिष्ठेच्या बनलेल्या बारामतीतून सुनेत्रा पवार या लोकसभेच्या मैदानात होत्या. यातला धाराशिवच्या अर्चना पाटील यांचा अपवाद वगळता बाकीच्या तीनही मतदारसंघात अजितदादा रेसमध्ये होते. बारामती, शिरूर आणि रायगडमध्ये नेमकं माप कुठल्या बाजूने झुकेल? हे सांगता येत नव्हतं. आता मात्र या तीन पैकी एकच जागा रेसमध्ये असून यावरच घड्याळाची टिकटिक वाजणारय… पण ती जागा कुठलीय यासाठी एक्झिट पोलच्या डिटेल्सला हात घालू…

प्रातिनिधिक स्वरूपात बोलायचं झालं रुद्र रिसर्च अँड ॲनालिटीक्स या संस्थेच्या एक्झिट पोलमध्ये मतदारसंघनिहाय कुणाचा विजय होतोय? मतांची टक्केवारी आणि विजयाचं मार्जिन कसं राहील. हे स्पष्ट सांगितलं आहे. यातल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यात घासून लढत झाली. कुणीही निवडून आलं तरी त्यांच्यातील विजयाचा मार्जिन फारसं नसेल अशी चर्चा इथून होती. त्यामुळे घड्याळ किंवा तुतारी जिंकेल असं उघडपणे कुणी बोलताना दिसत नव्हतं. आता मात्र एक्झिट पोलनुसार बारामतीकरांचा कौल हा तुतारीच्या बाजूने दिसतोय. सुप्रिया सुळे यांना 55% तर सुनेत्रा पवार यांना 41% मतदान होईल. आणि यात सुप्रिया सुळे तब्बल एक लाख 70 हजार, ते दोन लाख 30 हजार इतक्या लीडने विजय होतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. त्यामुळे प्रत्यक्ष निकालात आकडेवारी वर खाली होत असली तरी विजयाच्या मार्जिनमध्ये फरक पडेल पण सुप्रियाताईच निवडून येतील, हे मात्र कन्फर्म दिसतंय. त्यामुळे अजित दादांनी प्रतिष्ठेची बनवलेली बारामती त्यांच्या हातातून एक्झिट पोल नुसार तर गेलीय…

दुसरा मतदारसंघ आहे तो शिरूरचा. इथेही लढत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी अशी होती. शिवसेनेच्या शिंदे गटातील आढळराव पाटलांच्या हातातील धनुष्यबाण बाजूला ठेवून त्यांना घड्याळाच्या चिन्हावर विद्यमान खासदार अमोल कोल्हेंच्या विरोधात लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं. अजितदादांनी बारामतीनंतर सर्वात जास्त जोर कुठे लावला असेल तर तो शिरूरमध्येच. पण इथेही एक्झिट पोलनुसार स्पष्ट बहुमत अमोल कोल्हे यांच्या बाजूने जाईल हे स्पष्ट करण्यात आलय. कोल्हेंना 57% तर आढळरावांना अवघं 38% टक्के मतदान होऊन तुतारीच्या विजयाचं मार्जिन दोन लाखाच्या पुढे असेल असा स्पष्ट कौल देण्यात आलाय. त्यामुळे बारामती पाठोपाठ शिरूरही अजितदादांच्या हातातून जाणार असा अंदाज एक्झिट पोलचा आहे.

आता या तीन अटीतटीच्या मतदारसंघातील तिसरी जागा येते ती रायगडची…

इथून अजित पवार गटाचे सुनील तटकरे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते एकमेकांच्या विरोधात उभे होते. एक्झिट पोलनुसार इथून सुनील तटकरे हे जिंकून येत असले तरी त्यांच्या विजयाचं मार्जिन हे अवघं 5 हजार ते 20 हजारच्या आसपास राहील, असा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्यामुळे एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार अजित पवार गटाला जी एक जागा सुटतेय ती रायगडची आहे हे तर कन्फर्म होतंय. पण इथलं लीड अगदीच कमी असल्याने प्रत्यक्ष निकालात आकडा इकडे तिकडे जरी सरकला. तरी तटकरेंचे खासदार होण्याची चान्सेस कमी होतायत…

तर अशाप्रकारे अजित पवार गटाच्या वाट्याला कशीबशी एक जागा निवडून आणता येतेय खरी पण कमी मार्जिनमुळे त्याचीही गॅरंटी देणं जरा जास्त अवघड असल्यामुळे प्रत्यक्ष निकालातच रायगडची ही जागा अजित दादा जिंकतायेत का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे…शेवटी तुम्हाला काय वाटतं? रायगडची जागा सुनील तटकरे जिंकतील का? तुमचा अंदाज आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Pre Workout Food : व्यायाम करण्याआधी खा ‘हे’ पदार्थ; अजिबात दमायला होणार नाही

Pre Workout Food

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Pre Workout Food) जर तुम्हाला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर, चांगले खाणे पिणे आणि त्यासोबत व्यायाम महत्वाचा आहे. बिघडत्या जीवनशैलीमुळे जर आरोग्य बिघडवून घ्यायचे नसेल तर तुम्हाला व्यायाम नियमित करणे गरजेचे आहे. पण बऱ्याचदा व्यायाम करताना किंवा केल्यानंतर खूप थकवा जाणवतो. प्रचंड दमल्यासारखं वाटत. त्यामुळे व्यायाम कराची ईच्छा मरून जाते. तुमच्याही बाबतीत असे होत असेल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची ठरेल. आज आम्ही तुम्हाला प्री वर्कआऊट फुडविषयी माहिती देणार आहोत. ज्याचे सेवन केल्यास तुम्हाला व्यायामानंतर अजिबात थकवा येणार नाही किंवा दमल्यासारखे सुद्धा वाटणार नाही.

बरेच लोक व्यायामपूर्वी काहीच खात नाहीत. (Pre Workout Food) पण तज्ञ सांगतात की, उपाशी पोटी वर्कआऊट केल्यामुळे चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे अशा समस्या होऊ शकतात. त्यात जर तुम्ही हेवी वर्कआउट करत असाल तर तुमच्या आहारात कमी चरबीयुक्त, मात्र प्रथिने आणि कर्बोदकांचे संतुलित प्रमाण असलेले पदार्थ असणे गरजेचे असते. हे पदार्थ कोणते? याविषयी जाणून घेऊया.

1. केळी (Pre Workout Food)

हेवी वर्कआउट करणाऱ्यांनी कधीच उपाशी राहून व्यायाम करू नये. त्यांनी व्यायामापूर्वी एनर्जेटिक नाश्ता करणे गरजेचे असते. ज्यामध्ये केळी हा ऊर्जेचा चांगला स्रोत मानला जातो. यामध्ये असणारे पोटॅशियम वर्कआउट दरम्यान स्नायूंना ताणण्यापासून प्रतिबंधित करते. ज्यामुळे वर्कआउट करताना दमल्यासारखे वाटत नाही.

2. ओट्स

ओट्स हा अत्यंत पोषणदायी नाश्ता मानला जातो. कारण यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे, प्रथिने, फायबर, कार्बोहायड्रेट्स आणि अनेक पोषक घटक समाविष्ट असतात. जे तुम्हाला कायम एनर्जेटिक ठेवतात. (Pre Workout Food) जर तुम्ही व्यायामापूर्वी ओट्स खाल्ले तर तुम्हाला वर्कआउटदरम्यान किंवा नंतर दमल्यासारखे वाटणार नाही.

3. अंडी

हेवी वर्कआउट करणाऱ्या लोकांनी व्यायाम करण्यापूर्वी अंडी खाणे खूप चांगला पर्याय ठरू शकतो. कारण यामध्ये आढळणारी प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे शरीराला प्रचंड ऊर्जा प्रदान करतात. ज्यामुळे वर्कआउट चांगला होतो.

4. सुका मेवा

सुका मेवा खाणे आरोग्यासाठी उगाच चांगले मानले जात नाही. यामध्ये बरेच पोषक घटक असतात. (Pre Workout Food) त्यामुळे जर व्यायाम करण्यापूर्वी मिश्रित सुक्या फळांचे सेवन केले तर भरपूर प्रमाणात शारीरिक ऊर्जा मिळू शकते. यामुळे वर्कआउट करताना किंवा केल्यानंतर शारीरिक थकवा जाणवत नाही.

5. फळ आणि दही

जर तुम्ही व्यायाम करण्यापूर्वी फळ आणि दही एकत्र करून खाल्ले तर तुमच्या शरीराला चांगली ऊर्जा मिळते. इतकेच नव्हे तर यातून मिळणारी एनर्जी तुम्हाला चांगला व्यायाम करण्यास प्रेरणा देऊ शकते.

6. पीनट बटर

पीनट बटर हा प्री वर्कआउट फूड म्हणून चांगला पर्याय आहे. कारण यातून मिळणारे फायबर बराच वेळ पोटाला आधार देतात आणि शारीरिक ऊर्जा प्रदान करतात. त्यामुळे वर्कआउट दरम्यान थकवा जाणवत नाही. (Pre Workout Food)

महत्वाचे – व्यायामापूर्वी आपण जे पदार्थ खातो त्यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. मात्र, लक्षात घ्या ही ऊर्जा योग्य प्रमाणात मिळवण्यासाठी तुम्हाला वर्कआउटच्या ३० ते ४० मिनिटे आधी हे पदार्थ खायला हवे.

उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, निवडणूक आयोगाचे आदेश; ती पत्रकार परिषद वादात

Uddhav Thackeray

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| लोकसभा निवडणूक निकालाच्या एक दिवस अगोदर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Central Election Commission) राज्य निवडणूक आयोगाला (State Election Commission) देण्यात आले आहे. गेल्या 20 मे रोजी उद्धव ठाकरेंनी मतदान प्रक्रिया सुरू असतानाच पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. या विरोधातच मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी त्यांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीची दखल घेतच निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, वीस मे रोजी मुंबईतील मतदान प्रक्रिया सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपावर आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांनंतरच आशिष शेलार यांनी निवडणूक आयोगात या विरोधात तक्रार दाखल केली होती. तसेच उद्धव ठाकरे यांनी आचारसंहितेचे उल्लंघन केले असून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. ते पत्रकार परिषद घेत खोटी आणि दिशाभूल करणारी विधाने करत आहेत असा आरोपही त्यांनी केला होता. त्यांच्या या तक्रारीची दखल घेतच निवडणूक आयोगाने आता उद्धव ठाकरेंवर कारवाई करण्यात यावी असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला एक पत्र लिहिले होते. या पत्रामध्येच पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी नेमके कोणते आरोप केले होते त्या पत्रकार परिषदेत नेमके काय काय घडले? याची माहिती मागवली होती. त्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने एक इंग्रजी मसुदा तयार करून ही सर्व माहिती केंद्रीय आयोगाकडे पाठवून दिली होती. या माहितीच्या आधारावरच केंद्रीय निवडणूक आयोगाने हे आदेश दिले आहेत.

विराट सलामीला, तर रोहित No. 4 वर बॅटिंगला येणार? पहा कोणी दिलाय सल्ला

virat and rohit

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 विश्वचषक स्पर्धेला सुरुवात झाली असून भारतीय संघाचा पहिला सामना ६ जूनला बांगलादेश विरुद्ध आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारी टीम इंडिया कोणत्याही परिस्थिती यंदाचा वर्ल्डकप जिंकायचाच असा चंग बांधूनच अमेरिकेला गेली आहे. त्यादृष्टीने काही बदल संघात पाहायला मिळू शकतात. विराट कोहली आणि रोहित शर्मा हे सलामीला येतील असं बोललं जातंय. मात्र ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने मात्र अजब सल्ला दिला आहे. विराट कोहली सलामीला यावा अन्यथा माझ्य संघात त्याला स्थानच नसेल, तर रोहित शर्माने चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी असं हेडन म्हणाला.

ईएसपीएन क्रिकइन्फोशी बोलताना हेडन म्हणाला, कोहली आणि जैस्वाल यांनी सलामीला उतरावे. तुमच्या डावे- उजवे कॉम्बिनेशन असायला हवं. तुम्ही सलग ५ उजव्या हाताच्या फलंदाजांना घेऊन उतरू शकत नाही. विराट कोहलीने तर सलामीलाच खेळावं अन्यथा तो माझ्या संघात खेळू शकणार नाही. कोहली सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे आणि त्याच्यासाठी सलामीला येणं हा एकमेव पर्याय आहे असं हेडनला वाटत. तर कर्णधार रोहित शर्माने कोणताही संकोच न बाळगता चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करावी अशी इच्छा मॅथ्यू हेडनने व्यक्त केली.

हेडन म्हणाला, “रोहित चौथ्या क्रमांकावर सर्वात योग्य फलंदाज ठरेल. रोहित हा अष्टपैलू खेळाडू आहे आणि तो मधल्या फळीत फलंदाजी करण्यास कोच करत नाही. टी-२० क्रिकेटमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना त्याचा रेकॉर्ड सुद्धा सर्वोत्कृष्ट आहे. त्यामुळे रोहित शर्मा हा मधल्या फळीत नेतृत्व करण्यासाठी योग्य ठरेल, रोहित शर्मामुळे भारताची मधली फळी मजबूत होईल असं हेडन म्हणाला.

हेडनने निवडलेल्या 11 खेळाडूंमध्ये त्याने कोहली आणि जैस्वाल यांना सलामीवीर म्हणून संघात स्थान दिले आहे, तर तिसऱ्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव, चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा, पाचव्या क्रमांकावर ऋषभ पंत, सहाव्या क्रमांकावर हार्दिक पंड्याची निवड हेडनने केली आहे. याशिवाय शिवम दुबे, जडेजा, जसप्रीत बुमराह आणि अर्शदीप सिंगचीही निवड हेडनने केली आहे.