हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | पंढरपूर -मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे नेतेमंडळी धनगर समाजाला भुलवण्यासाठी भाकडकथा सांगत आहेत. धनगर समाजातील दलाल पुढे करून एसटी आरक्षणासंबंधी पुर्णपणे खोटी माहिती दिली जात आहे. भाजपच्या या षढयंत्राला, तसेच इतर आमिषांना बळी न पडता निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन धनगर विवेक जागृती अभियानाचे संयोजक विक्रम ढोणे यांनी केले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील प्रचारादरम्यान, भारतीय जनता पक्षाच्या गल्लीबोळातील कार्यकर्त्यांबरोबरच राज्य पातळीवरील नेतेमंडळींकडून धनगर आणि धनगड एकच असल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दिल्याचे सांगून दिशाभूल सुरू आहे. दीड वर्षापासून हा प्रकार सुरू असून त्यांना आम्ही वेळोवेळी उघडे पाडले आहे. तरीही भाजपकडून खोटे रेटून बोलण्याचा प्रकार सुरू आहे. धनगर आणि धनगड एकच असल्याचे कोणतेही प्रतिज्ञापत्र फडणवीस सरकारने उच्च न्यायालयात दिलेले नाही आणि मोदी सरकारने धनगर आरक्षणाच्या विरोधात प्रतिज्ञापत्र दाखल केलेले आहे, हीच वस्तुस्थिती आहे. ही सत्यस्थिती समाजाने समजावून घ्यावी.
प्रत्येक निवडणुकीवेळी धनगर समाजाची नव्या पद्धतीने फसवणूक सुरू आहे. काही महिन्यांपुर्वी झालेल्या विधान परिषद पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीवेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी धनगर आरक्षणासंबंधी धादांत खोटे विधान केले. फडणवीसांनी धनगर समाजासाठी एसटी- बी प्रवर्ग केला होता, असे पाटील यांनी सांगितले होते. ही फसवणूक समाजासमोर मांडत असताना चंद्रकांत पाटील यांनी तशी कागदपत्रे सादर करण्याचे आव्हान दिले होते, मात्र भाजपकडून ते स्वीकारले नाही. चंद्रकांत पाटील असो की भाजपचे दलाल असोत, कोणाकडे काहीही ठोस नाही, हे आता सिद्ध झालेले आहे.
धनगर मतपेढीसाठी भाजपकडून खोट्या आश्वासनांबरोबरच दलालांची मोठ्या प्रमाणात निर्मिती सुरू आहे. धनगर समाजाच्या नावाखाली ते समाजात शिरतात आणि भाजपच्या सोयीसाठी आपल्याच समाजाची फसवणूक करतात. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीआधी धनगर समाजाचा उमेदवार उभा करण्याच्या नावाखाली दलालांनी समाजाची फसवणूक केली. त्यातून स्वार्थ साधल्यावर हे दलाल आता भाजपचा प्रचार करत आहेत. त्याबरोबरच भाजपकडून अहिल्यादेवी होळकर यांचा अवमान सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून भाजपने अहिल्यादेवींचे खोटे वंशज तयार केले आहेत. हे खोटे वंशज मतदारसंघात येवून धनगर आरक्षणासंबंधी खोटी माहिती देवून गेले आहेत. हे घडवून आणणाऱ्या भाजपला योग्य भाषेत उत्तर दिले पाहिजे.
दोन वर्षांपुर्वी समाजाली दोन ठगांनी अखेरचा लढा या नावाखाली समाजाची घोर फसवणूक केली आहे. त्यातील एक ठग भाजपचा तर दुसरा महाविकास आघाडीचा प्रचार करतो आहे. त्यामुळे समाजाने सर्वंकष विचार करून आपल्या पसंतीनुसार निर्भयपणे मतदान करावे, असे आवाहन ढोणे यांनी केले आहे.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा