“महापुरुषांच्या काळात तलवारीला धार कशी द्यायचे हे माहिती आहे का?”; पंकजा मुंडे यांनी सुनावलं

pankaja munde
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावर जाऊन त्यांना अभिवादन केले. यावेळी त्यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणीना उजाळा दिला. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्यांनाही सुनावले. “महापुरुषांविषयी वाईट बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही. आपण तेव्हा जिवंत होतो का? तेव्हा तलवारीला धार कशी द्यायची, युद्ध कसं करायचं, तह कसा करायचा, कसे जिंकायचे हे माहिती आहे का? त्यामुळे त्याचा सन्मान करता येत नसेल, तर थट्टाही करु नये,” असे मुंडे यांनी म्हंटले.

गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पंकजा मुंडे यांनी गोपीनाथ गडावरुन कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या कि, “आज मीगप्प का आहे, मौन का बाळगलं आहे? असा प्रश्न काहींना पडला असेल. पण जिथे कोणीही बोलण्याची हिंमत करत नाही, तिथे हिंमतीने बोलतो तोच खरा नेता असतो. आणि ज्या ठिकाणी सर्वच बोलत आहेत, कोणीच थांबत नाही, श्रेयवादाची लढाई सुरु आहे, अशा स्थितीत मौन बाळगतो तोच खरा नेता असतो. हेच संस्कार मुंडे साहेबांनी दिले आहेत.

गेल्या दिवसांतील काही घटनांच्या निषेधार्थ मौन होते. माझे कोणी व्यक्ती नव्हे तर प्रवृत्तीच्या विरोधात हे मौन होते. राजकारणात संयम महत्त्वाचा असतो. आणि तो संयम आम्हाला आहे. महापुरुषांविषयी बोलण्याचा अधिकार हा प्रत्येकाला आहे. पण त्यातून प्रेरणा घेण्यासाठी आपण बोलायचे असते. एखादा शब्द वर खाली जाण्याची वाट पाहून बोभाटा करणे हादेखील महापुरुषाचा अवमान करण्यासारखेच आहे.

महाराष्ट्रात हे चित्र पाहून माझे मन खिन्न झाले

आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी दिलेल्या बलिदानांचे मोजमाप करण्याचा आपल्याला कोणताही अधिकार नाही. आमच्या शाहू, फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे चित्र पाहून माझे मन खिन्न झाले असून महापुरुषांविषयी वाईट बोलण्याचा आपल्याला अधिकार नाही, असे मुंडे म्हणाल्या.