हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम मंदिराच्या भव्य उद्घाटन सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. यावर आता राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केले आहे. तसेच, “राम मंदिरावरुन आता राजकारण सुरु झालं आहे, हे योग्य नाही” अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली आहे. मुंबईत सकाळचे संपादक राहुल गडपाले यांच्या अवतरणार्थ पुस्तकाचे प्रकाशन करताना शरद पवारांनी भाजपवर राम मंदिराच्या मुद्द्यावरून टीकास्त्र सोडलं आहे.
प्रकाशन सोहळ्यात बोलताना शरद पवार म्हणाले की, “आता काही तारखा जाहीर झाल्यात की आमुक तारखेला राम मंदिर लोकांसाठी खुलं केलं जाईल. ठीक आहे, मंदिराबद्दलची आस्था किंवा रामाबद्दलचा आदर याबद्दल काही तक्रार करण्याची गरज नाही. पण राज्यकर्ते हाच महत्वाचा विषय आहे हे लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करत असतील तर ते योग्य नाही. देव आणि त्या संबंधीची आस्था ही माणसाच्या मनात असते”
त्याचबरोबर यावेळी ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपावर निशाणा साधला. तसेच, “आम्ही भाजपशी संबंध तोडले आहेत, पण हिंदुत्वाशी नाही” असे उद्धव ठाकरे म्हणाले. इतकेच नव्हे तर, “मी ही चित्रकार, फोटोग्राफर, व्यंगचित्रकार होतो. पण मी मुख्यमंत्री कधी होईन असे मला वाटले नव्हते, पण जमेल तेवढे केले आणि महाराष्ट्रातल्या जनतेने मला स्वीकारले, कुटुंबप्रमुख म्हणून मला मान मिळाला. ही माझ्यासाठी मोठी बाब आहे” असे भाष्य उद्धव ठाकरे यांनी प्रकाशन सोहळ्यात केले.
दरम्यान, आयोध्यातील राम मंदिराचा मुद्दा आजवर वादाचा विषय ठरला आहे. याच राम मंदिराचे येत्या 22 जानेवारी 2024 ला उद्घाटन होणार आहे. मंदिराच्या उद्घाटनासाठी अयोध्या मंदिर ट्रस्टकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र दुसऱ्या बाजूला ऐन निवडणुकीच्या तोंडावर राम मंदिराचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आल्यामुळे विरोधकांकडून भाजपावर जोरदार टीका करण्यात येत आहे. अशातच शरद पवार यांनी देखील याबाबत लक्षवेधी वक्तव्यं केले आहे. त्यामुळे आता यावर भाजप नेत्यांकडून काय प्रतिक्रिया देण्यात येईल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.