विशेष प्रतिनिधी । काल विधानसभेच्या मतमोजणीच्या निकाल लागला. अपेक्षेप्रमाणे महायुतीचे सरकार सत्ता स्थापन करणार हे ठरलेले आहे. मात्र आघाडीने यावेळेस युती ला जोरदार टक्कर दिली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या अस्तित्वाची लढाई असल्याने या दोन्ही पक्षांनी पाडापाडीची आपली पारंपरिक भूमिका घेतली नाही, दोन्ही पक्षांचे नेते आणि कार्यकत्यांनी हातात हात घालून विधानसभेची ही निवडणूक लढविली त्यामुळे शंभरपेक्षा जास्त जागा जिंकल्या. मात्र यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रचंड मेहनत घेतल्यामुळे आणि आपला राजकारणातील प्रदीर्घ अनुभव वापरल्यामुळे केवळ राष्ट्रवादी काँग्रेसने ५६ जागा जिंकल्या तर काँग्रेसला ४५ जागांसह आता छोट्या भावाच्या भूमिकेत राहावे लागेल.
कसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या. तसेच २२० पेक्षा जास्त विधानसभा मतदारसंघांत त्यांच्या उमेदवारांना मताधिक्य मिळाले, त्यामुळे त्यांनी विधानसभा निवडणुकीतही ‘अब की बार..२२० पार..’अशी हवा तयार केली. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजपमध्ये गेले. त्यामुळे काँग्रेस हतबल दिसली. मात्र शरद पवारांनी या वयात राज्यभर फिरून झंझावती प्रचार केला. त्याचा फायदा राष्ट्रवादीला झाला, तसा तो काँग्रेसला झाला. विधानसभा निवडणुकीपूर्वी जागावाटपावरून काँग्रेस व राष्ट्रवादी कोणताही संघर्ष झाला नाही.
काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी राहुल गांधी यांच्या काही प्रचारसभा झाल्या. परंतु काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची धुरा पवारांनी घेतली. काँग्रेसने १४७ जागा लढविल्या त्यापेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसने १२५ जागा लढवूनही काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्या व काँग्रेसच्या जागा जिंकून आणण्यासाठी हातभार लावला. गेली पाच वर्षे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे होते. मात्र काँग्रेसपेक्षा जास्त जागा जिंकल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद येणार आहे. पण राष्ट्रवादीने भाजप व शिवसेना या सत्तारुढ युतीला आक्रमकपणे प्रत्युत्तर दिले, त्याचा फायदा काँग्रेसला झाला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसोबत काँग्रेसला राहावे लागेल.