औरंगाबादेत उद्यापासून ‘या’ वेळेतच मिळणार पेट्रोल- डिझेल

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात उद्यापासून पेट्रोलपंप सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंतच सुरू राहणार असल्याचे पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने आज जाहीर केले. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या ‘नो लस,नो पेट्रोल’ या मोहिमेला संपूर्ण सहकार्य करत असल्याने मनुष्य बळाच्या तुटवड्यातून हा निर्णय घ्यावा लागत असल्याचे एका प्रसिद्ध पत्रकाद्वारे डीलर्स असोसिएशनच्या अखिल अब्बास यांनी कळवले आहे.

जिल्ह्यात कोरोना लसीकरण कमी झाल्याने थेट प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण आणि महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांच्याकडून कारणे जाणून घेतली. प्रधानमंत्र्यांनी दिलेल्या सूचनेनुसार प्रशासनाने जिल्ह्यात लसीकरण वाढविण्यासाठी विविध उपययोजना लागू केल्या. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी ‘नो लस, नो पेट्रोल’ अशी मोहीम जाहीर करून पेट्रोल पंपावर लस घेतल्याचे प्रमाणपत्र तपासूनच पेट्रोल देण्याचे आदेश दिले. आता या आदेशाचे पालन करण्यासाठी मनुष्यबळ अपुरे पडत आहे, असे कारण देत पेट्रोलपंप डीलर्स असोसिएशनने सकाळी ८ ते सायंकाळी ७ यावेळेतच पेट्रोलपंप सुरु राहणार असल्याचे एका पत्रकाद्वारे जाहीर केले. लसीकरण प्रमाणपत्र तपासावं लागत असल्याने, मनुष्यबळ अपुरे पडत असल्याचं अखिल अब्बास यांनी सांगितले.

सर्वसामान्य नागरिक वेठीस –
एकीकडे प्रशासन आपले अपयश लपवून लसीकरण वाढविण्यासाठी मनमानी निर्णय घेत आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी आता लस न घेतलेल्यांनी घरातच बसावे हेच आदेश द्यायचे बाकी आहे. यावर आता पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने सकाळी 8 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत पेट्रोल पंप चालू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणामुळे सर्वसामान्य नागरिक मात्र वेठीस धरल्या जात आहेत.