फलटण🙁 प्रभाकर करचे) फलटण शहरातील आखरी रस्ता कुरेशी नगर येथे बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या कत्तलखान्यावर फलटण शहर पोलिसांनी छापा टाकून सुमारे 32 लाख 83000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याबाबत फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार ,आज दिनांक 11 एप्रिल रोजी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास आखरी रस्ता कुरेशी नगर फलटण येथे जाकीर कुरेशी यांच्या घराच्या पाठीमागील बाजूस असणाऱ्या पत्र्याच्या शेडमध्ये वाजिद जाकीर कुरेशी, इलाही हुसेन कुरेशी ,गौस रहीम कुरेशी ,तोसिफ अनिस कुरेशी ,अरबाज नियाज कुरेशी, सर्व राहणार मंगळवार पेठ फलटण हे अवैधरित्या जनावरांची कत्तल करत असताना मिळून आले. तसेच चाळीस लहान वासरे टेम्पोमध्ये भरलेली मिळून आली. पोलीस व पंच येण्याची चाहूल लागताच तोसिफ कुरेशी व अरबाज कुरेशी हे संशयित पळून गेले .
सदरच्या कारवाईत सहाशे पन्नास किलो जनावरांचे मांस, चाळीस लहान जर्शी गाईची वासरे, टाटा कंपनीचा 407 टेम्पो क्रमांक MH20F -6768 पांढरी रंगाची इनोवा कार क्रमांक MH 01V- 9860, इनोवा कारची चावी, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, दोन मोबाईल हँडसेट ,असा एकूण 32 लाख 83 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल फलटण शहर पोलिसांनी जप्त केला असून, पोलीस कॉन्स्टेबल दिग्विजय पांडुरंग सांडगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार महाराष्ट्र प्राणी संरक्षण सुधारणा अधिनियम 1995 मधील कलम 5( B), 9(B), तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांचे मार्गदर्शनाखाली फलटण शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नवनाथ गायकवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन रावळ ,सहाय्यक पोलीस फौजदार शिंदे ,पोलीस हवालदार शिंदे ,पोलीस हवालदार घाटगे, पोलीस हवालदार खाडे ,पोलीस हवालदार येळे, चालक पोलीस नाईक करपे ,होमगार्ड हिवरकर, गोसावी ,जाधव ,भिसे ,यांनी केली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन रावळ करीत आहेत.