नवी दिल्ली । सेमीकंडक्टर, फार्मा आणि कृषी उत्पादनांसह इतर वस्तूंसाठी इतर देशांवरील आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी भारत सरकार विविध प्रयत्न करत आहे. या दिशेने एक मोठे पाऊल उचलत सरकारने गेल्या वर्षी प्रोडक्शन लिंक्ड इन्सेन्टिव्ह (PLI) स्कीम सुरू केली होती. आयात अवलंबित्व कमी करण्यासाठी तसेच देशांतर्गत उत्पादन वाढवण्यासाठी परदेशी आणि भारतीय कंपन्यांना उत्पादनासाठी प्रोत्साहित करणे हा त्यामागचा उद्देश आहे.
SBI रिसर्चने एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारताने PLIयोजनेचा लाभ घेतल्यास आणि देशांतर्गत उत्पादनाला चालना दिल्यास चीनवरील आयात अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल. PLIयोजनेंतर्गत, सरकार विविध पद्धतींचा अवलंब करून चीनमधून आयातीवरील आपले अवलंबित्व 50 टक्क्यांनी कमी करू शकते.
व्यापार तूट कमी करण्यात भारताला यश आले आहे
रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला आहे की, आयात अवलंबित्व कमी केल्याने देशाच्या GDP लाही गती मिळेल आणि ती 20 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते. त्यात पुढे म्हटले आहे की, 2020-21 मध्ये चीनसोबतची व्यापार तूट कमी करण्यात भारत यशस्वी झाला होता, मात्र भारताच्या एकूण वस्तूंच्या आयातीमध्ये चीनचा वाटा 16.5 टक्के दराने वाढत आहे.
PLI ‘या’ क्षेत्रांमध्ये उत्पादन वाढवेल
रिपोर्टनुसार, 2020-21 मध्ये, चीनमधून केलेल्या 65 अब्ज डॉलर्सच्या आयातीपैकी सुमारे 39.5 अब्ज डॉलर्सची आयात वस्तू आणि उत्पादनांची होती. कापड, कृषी उत्पादने, इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, फार्मा आणि रासायनिक क्षेत्रातील उत्पादन वाढवण्यासाठी भारताने PLI योजना जाहीर केल्या आहेत. PLI योजनांमुळे आपण चीनमधून आपली आयात 20 टक्क्यांनी कमी करू शकलो, तर आपला GDP 8 अब्ज डॉलर्सने वाढू शकेल.
पहिल्या तीन तिमाहीत 68 अब्ज डॉलर्सची आयात
चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन तिमाहीत भारताने चीनकडून 68 अब्ज डॉलर्स किंमतीची उत्पादने आयात केली. वाणिज्य मंत्रालयाच्या रिपोर्टनुसार, गेल्या वर्षी कोरोना संकटात भारतातून चीनला होणाऱ्या निर्यातीत वाढ झाली होती. गेल्या वर्षी भारताची चीनला निर्यात 34 टक्क्यांनी वाढून 22.9 अब्ज डॉलर्स झाली. कोरोनापूर्वी 2019 मध्ये ही निर्यात 17.1 अब्ज डॉलर्स होती.