हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आयुष्यात कधीही शॉर्टकट वापरू नका. काही विद्यार्थी कॉपी करण्यात वेळ घालवतात पण कॉपी करून कोणाचं भलं होत नाही असं म्हणत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi)यांनी कॉपी करून परीक्षा देऊ नका असा सल्ला कॉपीबहाद्दरांना दिला आहे. आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर ‘परीक्षा पे चर्चा’ (Pariksha Pe Charcha) कार्यक्रमादरम्यान मोदींनी विद्यार्थ्यांशी (Students) संवाद साधला आणि त्यांना मार्गदर्शन केलं.
यावेळी मोदी म्हणाले, आपल्या क्षमता ओळखायला शिका. काही विद्यार्थी परीक्षेला कॉपी करण्यात वेळ घालवतात. काहीजण कॉपी करण्यासाठी अनेक क्रिएटीविटी दाखवतात, छोट्या छोट्या अक्षरात चिठ्ठया बनवतात. परंतु कॉपी करून कोणाचेही भलं होत नाही. आजकाल जमाना बदलला आहे. एक – दोन परीक्षा पास होवून आपण आयुष्य घडवू शकत नाही, कारण आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर परीक्षा असते त्यामुळे पुढे गेल्यावर कॉपी करणारे विद्यार्थी अडकतात असा सल्ला मोदींनी दिला.
#WATCH | PM Narendra Modi speaks on the issue of 'cheating' in examinations during 'Pariksha Pe Charcha' 2023 pic.twitter.com/5rsqxph6gJ
— ANI (@ANI) January 27, 2023
विद्यार्थ्यांकडून कुटुंबाला असणाऱ्या अपेक्षा योग्यच आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखायला शिकलं पाहिजे. स्वतःच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करायला हवं. त्यासाठी वेळेचं व्यवस्थापन करा, वेळेचं नियोजन आईकडून शिका असे मोदींनी सांगितलं. तसेच परीक्षेत जो विषय आपल्याला कठीण जातो त्या विषयाला टाळू नका. सर्वात कठीण विषयाला जास्त वेळ द्या असा कानमंत्र यावेळी मोदींनी विद्यार्थ्यांना दिला.