गिरीश बापट नम्र आणि कष्टाळू नेते; मोदींकडून श्रद्धांजली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजपचे पुणे लोकसभा खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे आज दुःखद निधन झालं आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी आपला अखेरचा श्वास घेतला. बापट यांच्या निधनाने पुण्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांकडून त्यांना आंदरांजली वाहण्यात येत आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्विट करत बापट यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गिरीश बापट नम्र आणि कष्टाळू नेते होते असं मोदींनी म्हंटल.

मोदींनी ट्विटर अकाउंट वर बापट यांच्यासोबतचा विमानतळावरील फोटो शेअर केला आहे. श्री गिरीश बापटजी हे एक नम्र आणि कष्टाळू नेते होते. त्यांनी समाजाची तळमळीने सेवा केली. त्यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर काम केले आणि विशेषत: पुण्याच्या विकासासाठी ते उत्कट होते. त्यांचे निधन दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या आणि समर्थकांच्या संवेदना अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी बापट यांच्याप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, बापट यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ट्विट केलं आहे. पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. चार दशकांच्या प्रदीर्घ कारकीर्दीत गिरीश बापट यांनी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेत राजकीय प्रवास केला. पुण्यातील लोकांच्या मनात पक्के स्थान निर्माण करत त्यांनी पुणेकरांच्या व कामगारांच्या प्रश्नांसाठी नेहमीच काम केले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एक सर्वपक्षीय जनसंपर्क जोपासणारे राजकीय नेते आपण गमावले आहेत. गिरीश बापट यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं शरद पवार यांनी म्हंटल.

दरम्यान, पुण्याच्या राजकारणात गिरीश बापट हे सर्वात मोठं नाव होत. कामगार संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. 1983 मध्ये पहिल्याच प्रयत्नात ते पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन टर्म त्यांनी नगरसेवकपद राखले. 1995 पासून कसबा पेठ मतदारसंघाचे ते आमदार राहिले होते. त्यांनतर 2019 मध्ये त्यांनी भाजपकडून पुणे लोकसभा निवडणूक लढवली होती. यामध्ये त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा 96 हजार मतांनी पराभव केला होता. दांडगा जनसंपर्क आणि सर्वपक्षीय नेत्यांशी सलोख्याचे संबंध ही गिरीश बापट यांची जमेची बाजू मानली जाते. सर्वच पक्षातील नेत्यांसोबत त्यांचे चांगले संबंध होते. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी सर्वच लोकांची कामे केली आहेत. त्यामुळे गिरीश बापट यांच्या निधनाने पुणेकरांचे मोठं नुकसान झालं हे मात्र नक्की..