सांगली | प्रथमेश गोंधळे ।
सांगली शहरातील गर्दीच्या ठिकाणी तसेच बस स्थानकावर महिलांचे दागिने हातोहात लंपास करणाऱ्या टोळीचा सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने पर्दाफाश केला. या प्रकरणी सांगलीतील एका महिलेस अटक करण्यात आली असून तिच्या अन्य दोन महिला साथीदार पसार झाल्या आहेत. सोनू हरी काळे असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तिच्याकडून एकूण 5 गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. तिच्याकडून चोरीतील 1 लाख 27 हजार 200 रुपयांचे दागिने हस्तगत केले आहेत. गुन्हयाचा तपास करीत असताना रेकॉर्डवरील आरोपीं बाबत माहिती घेण्यात आली.
त्यावेळी पथकातील कर्मचारी विक्रम होत यांना माहिती मिळाली कि, रेकॉर्डवरील महिला सोनू हरी काळे हिने अशा प्रकारचे गुन्हे केले आहेत. त्यांनतर गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील पथकाने सदर महिलेवर वॉच ठेवून तिची माहिती घेवून तीला ताब्यात घेतले. सदर महिलेकडे तपास केला असता तीने आपल्या दोन महिला साथीदार यांच्या मदतीने सांगली एस. टी. स्टॅण्ड परिसर तसेच बाजारपेठ येथे गर्दिच्या ठिकाणी महिलांवर पाळत ठेवून त्यांची अडवणूक करून आणि लक्ष विचलीत करून पिडीत महिला गोंधळल्या नंतर त्यांची पर्समधून मुद्देमाल चोरी करीत असल्याचे सांगीतले.
त्याप्रमाणे तिच्याकडे अधिक कसून तपास केला असता सदर गुन्हयाची तिने कबुली दिली असून त्याच प्रमाणे आणखी पाच गुन्हे केल्याची कबुलीही पोलिसांकडे केली. यावेळी या महिलेकडून 1 लाख 27 हजार 200 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. सदर महिलेवर यापूर्वी सांगली शहर, विश्रामबाग आणि शिराळा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.