चंद्रपूर प्रतिनिधी | चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असताना पोलीस शिपयालाच दारु तस्करी करताना रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दारू विक्रीसाठी शहरातील व जिल्ह्यातील मोठ-मोठे व्यक्ती जिल्ह्यात सक्रिय असल्याचं समोर येत आहे. अवैध दारू विक्री वर अंकुश लावण्याचे काम पोलीस विभागाचे असते परंतु पोलिसच अवैध दारू विक्री व्यवसायात गुंतलेले असल्यानं या प्रकरणाबाबत तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे.
9 जूनला रविवारला सकाळी पाच ते सहा वाजताच्या दरम्यान नंदोरी टोल नाक्याजवळ नागपूर येथील वाहतूक पोलीस विभागात कार्यरत असलेला पोलीस शिपाई सचिन विनायक हांडे हा स्वतः गाडीने विदेशी दारू विक्रीसाठी चंद्रपूर जिल्ह्यात आणत असल्याचे कळताच पोलिसांनी आपला सापळा रचला.यामध्ये पोलीस शिपाई सह त्याचा मित्र प्रणव हेमंत म्हैसकर ला पोलिसांनी नंदोरी नाक्याजवळ रंगेहात पकडले. हे दोघेही चंद्रपूर जिल्ह्यात अनेक दिवसापासून दारु तस्करी करीत होते. प्रणव म्हैसकर हा जिल्हाधिकारी यांचा पुतण्या असल्याचे समजते. जिल्हा अधिकाऱ्याचे नाव घेऊन तस्करी करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
सदर गाडीतून आठ पेटी विदेशी दारू पकडण्यात आली. वरोरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार उमेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून नऊ लाख 35 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सचिन हांडे आणि प्रणव म्हैसकर या दोघांनाही पोलिसांनी अटक केलि आहे.