पोलिसांनी नो पार्किंगमधील गाडी उचलली; ‘तो’ थेट पिस्तूल घेऊन वाहतूक शाखेत शिरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : पोलिसांनी नो पार्किंग मधील गाडी उचलल्यानंतर वाहन मालक थेट पिस्तूल घेऊन वाहतूक शाखेत शिरल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. एक व्यक्ती पिस्तुलासह वाहतूक शाखेत शिरल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी त्याची पिस्तूल जप्त केली. सदर घटना रविवारी सायंकाळी घडली आहे. गणेश हणमंत देवरे (वय २६ वर्षे) राहणार गुरसाळे ता. खटाव, जि. सातारा आणि विकास प्रल्हाद देवरे (वय २६ वर्षे ) राहणार दहिवडी, पोस्ट आंबवडे, ता. सातारा अशी ताब्यात घेतलेल्या दोन इसमांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल रविवार सुट्टीचा दिवस असल्याने रस्त्यांवर जास्त वाहतूक होती. यावेळी नो पार्किंग मध्ये उभ्या असलेल्या गाड्यांमुळे वाहतुकीला अडचण येत असल्याने पोलीस नो पार्किंग मधील गाड्यावर कारवाई करत होते. यावेळी अशीच नो पार्किंग मध्ये उभी असलेली गाडी क्रमांक एम. एच. ०३ बी. झेड. ५९९७ पोलिसांनी टोईंग करून वाहतूक शाखेत आणली. पो. हवा. काशीद, पो. हवा. बर्गे यांनी हि कारवाई केली.

त्यानंतर काही वेळाने सदर वाहनाचा मालक गाडी घेऊन जाण्यासाठी वाहतूक शाखेत आला. आपली गाडी नो पार्किंग मध्ये नव्हतीच असे म्हणत तो पोलिसांसोबत हुज्जत घालत होता. यावेळी तो वारंवार खिशात हात घालत होता. त्याच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिसांनी त्याला घट्ट पकडून झडती घेतली. यावेळी त्याच्या कमरेला पिस्तूल सापडली. त्याची पाहणी केली असता त्यात एक जिवंत काडतूस आढळून आले. यामुळे वाहतूक शाखेत एकच खळबळ उडाली. देवानंद बर्गे, अमर शंकर काशीद या पोलीस कर्मचाऱ्यांनी मोठ्या धाडसाने पिस्तूल घेऊन येणार्यास पकडले.

दरम्यान, रात्री उशिरापर्यंत यासंदर्भात गुन्हा दाखल झालेला नव्हता. सदर व्यक्तीच्या खिशात सापडलेली पिस्तूल परवान्याची असल्याचे समजत आहे. मात्र दुसऱ्याव्यक्तीचा परवाना असलेली पिस्तूल या व्यक्तीकडे कशी सापडली याचा पोलीस शोध घेत आहेत. वेळीच हा प्रकार उघडकीस आल्याने मोठा अनर्थ टळला आहे.