सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
जत तालुक्यातल्या उमदी जवळील पांढरेवाडी येथील गांजाच्या शेतीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने छापा टाकला. यामध्ये तब्बल 25 किलो 700 ग्रॅम वजनाचा पाऊणे तीन लाख रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला. या प्रकरणी पोलिसांनी आंबादास शेशाप्पा तांबे यास अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात उमदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे एक पथक जत मध्ये पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली कि, आंबादास तांबे याने त्याच्या शेतामध्ये गांज्याची शेती केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार उमदी पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने पंचासह आंबादास शेशाप्पा तांबे याच्या शेतामध्ये छापा टाकला. त्यावेळी शेतामध्ये लहान मोठी गांज्याची झाडे मिळून आली. ती झाडे पंचासमक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी व झाडे लावणारा आंबादास तांबे यांच्यासह सविस्तर पंचनाम्याने जप्त केली.
सदर शेतामध्ये एकून लहान मोठी अशी 20 झाडे मिळून आली आहेत, त्याचे वजन 25 किलो 700 ग्रॅम असून 2 लाख 57 हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास उमदी पोलीस ठाणेकडील सहा पोलीस निरीक्षक पंकज पवार हे करीत आहेत. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.