लढा कोरोनाशी | फैझान मुस्तफा हे कायदेतज्ञ असून लिगल अवेअरनेस वेबसीरीजमधून कायदेविषयक बाबींमध्ये नागरिकांना सजग करण्याचं काम करतात. सध्या देशभरात कोरोना विषाणूने थैमान घातलेलं असताना निजामुद्दीन भागातील मरकजमध्ये घडलेल्या घटनेने कोरोनाच्या प्रसाराचा केंद्रबिंदू स्वतःकडे वळवला आहे. या घटनेची कायदेशीर माहिती देणारा हा लेख. मुस्तफा यांच्याच शब्दांत..!!
पार्श्वभूमी – संपूर्ण देशात निजामुद्दीनमधल्या मरकजमध्ये तबलिगी जमातीचे २५० परदेशी नागरिक आणि १५०० आणखी लोक होते याचा उल्लेख होतो आहे. मी कोरोना विषाणूशी संबंधित काय कायदा आहे याचा एक व्हिडीओ ६ मार्चला केला होता, पुन्हा २२ मार्चला दुसरा व्हिडीओ केला. त्यामध्ये अलगावचे कायदे, त्याच्या उल्लंघनाचे परिणाम आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्याविषयी सांगितले. आज तबलिगी जमातीची हा विषाणू पसरण्यामध्ये काय भूमिका राहिली आहे याबद्दल बोलणे होईल. मला खूप खेद वाटतो, काही लोक याला कोरोना जिहाद म्हणत आहेत. काही लोक याला षडयंत्राचं स्वरुप देत ते देशात पसरवण्यात आलं आहे असं म्हणत आहेत. देशात अशी आपत्ती सुरु असताना अशा प्रकारे या गोष्टी पसरविणे मला योग्य वाटत नाही.
धर्म आणि आपण – सगळ्यात पहिली गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे ती म्हणजे, तुम्ही बघा जगभरात धर्म किती महत्वाचा आहे. जगभरातले ४.५ अब्ज लोक हे ४ महत्वाच्या धर्मापैकी एक कोणता तरी धर्म मानतात. धर्माच्या बाबतीत कार्ल मार्क्सचे एक विधान खूप ठिकाणी सांगितले जाते आणि मलाही तिथूनच सुरुवात करण्याची ईच्छा आहे. ते म्हणतात, “धर्म म्हणजे मनुष्याचा स्वतःचा आत्मविश्वास आणि स्वतःची इज्जत आहे. ज्याने अद्याप स्वतःवर विजय मिळविला नाही किंवा स्वतःला पुन्हा गमावले आहे. धार्मिक दुःख एक आणि एकाच वेळी असते, वास्तविक दुःखाची अभिव्यक्ती आणि वास्तविक दुःखाचा निषेध. धर्म हा अन्यायित प्राण्याचा उसासा आहे, निर्दयी जगाचे हृदय आणि निर्दयी परिस्थितीचा आत्मा हा लोकांचा अफू (नशा) आहे.” १८४३ साली मार्क्स यांनी हे विधान केले होते. धर्म आणि विवेकी समंजसपणा, धर्म आणि विज्ञान यांच्यात नेहमीच एक लढाई, एक वाद राहिला आहे. आपण पाहिले की, कशाप्रकारे १४ मार्चला हिंदू महासभेचे आयोजन झाले. त्यात चक्रपती महाराज लोकांना आणि स्वतःलाही गोमूत्र आणि गाईचे शेण लावत असताना दिसत आहेत. ते म्हणताहेत आम्ही ट्रम्पनापण हे पाठवणार आणि आपल्या पंतप्रधानांना पण पाठवणार.
धर्म आणि विज्ञान – धर्म आणि विज्ञानामध्ये किती लढाया झाल्या, युरोपमध्ये किती शास्त्रज्ञांना जाळले गेले. धर्म म्हणत होता की सूर्य जमिनीच्या चारी दिशांना फिरतो आणि विज्ञान म्हणत होतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. या गोष्टीवरूनसुद्धा यांच्यात भांडणे झाली. तर धर्म नक्कीच विवेकीपणाचे नाव नाही. धर्म अंधविश्वासाचे नाव आहे आणि धार्मिक नेत्यांच्या गोष्टी जनता जास्त ऐकते. माझं तर खूप कमी ऐकतात. मग कुणी मौलाना असो, कुणी पुजारी असो किंवा कुणी फादर असो त्यांचे बोलणेच जास्त ऐकले जाईल. तुम्ही हे बघा दक्षिण कोरियामध्ये एका चर्चमधून या विषाणूचा प्रसार झाला. ६ हजारापेक्षा जास्त लोकांना याचा प्रादुर्भाव झाला. ६५% लोक हे त्या चर्चमध्ये गेलेले किंवा त्या चर्चमधील एखाद्या माणसाच्या संपर्कात आलेले होते. आपल्याकडे कायद्यामध्ये ज्यावेळी एखादा खटला चालविला जातो, तेव्हा अगोदर तारीख दिली जाते आणि इथेही तारखांना समजणे खूप गरजेचे आहे.
ही वस्तुस्थिती विचारात घेतली ? – तुम्ही हा विचार करा, भारत सरकारच्या आरोग्य विभागाचे जॉईंट सेक्रेटरी लव अग्रवाल यांनी १३ मार्चला एक पत्रकार परिषद घेतली. तोपर्यंत ८१ केसेस झाल्या होत्या. १६ इटालियन लोक होते, १ कॅनडाचा होता आणि त्यांनी सांगितले की कोणतीच आरोग्य आपत्ती नाही आणि घाबरण्याचंही काही कारण नाही. १३ मार्चलाच दिल्ली सरकार एक आदेश काढते की कोणतेच चर्चासत्र होणार नाही, कोणती परिषद होणार नाही. पण धार्मिक एकसंधतेला त्यात समाविष्ट केले गेले नाही. म्हणजे धार्मिक एकसंधतेला १३ तारखेला मान्यता होती. तबलिगी जमातीचा हा एकसंधता हा कार्यक्रम १३ मार्च पासून १५ मार्चपर्यंत चालला. आता तुम्ही बघा, सुवर्णमंदिर बऱ्याच दिवसांपर्यंत बंद केले गेले नाही. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ पंतप्रधानांच्या संचारबंदीच्या आदेशानंतर काही लोकांसोबत अयोध्येला जातात आणि तिथे मग पूजा-अर्चना या सगळ्या गोष्टी होतात. २३ मार्चला शिवराजसिंग चौहान शपथ घेतात तिथे समारंभ होतो. त्यांचे समर्थक तिथे उपस्थित आहेत. १६ मार्चपर्यंत तिरुपतीच्या देवळात प्रत्येक तासाला ४००० भक्त जात होते. १६ मार्चपर्यंत सिद्धिविनायक मंदिर, उज्जैनचे महाकालेश्वर मंदिर बंद केले नाही. १८ मार्चपर्यंत वैष्णो देवीचे मंदिर बंद केले गेले नाही. २० मार्चपर्यंत काशी विश्वेश्वर मंदिर बंद केले गेले नाही. १७ मार्चपर्यंत शिर्डी येथील साईबाबांचे मंदिर बंद केले गेले नाही.
धार्मिक भेदभाव? का ? – सामाजिक अलगावची गोष्ट १९ मार्चला आली. जेव्हा प्रधानमंत्री म्हणाले की २२ मार्चला तुम्ही घरी राहा, टाळ्या वाजवा आणि थाळ्या वाजवा. तेव्हाही संध्याकाळी तुम्ही काय दृश्य पाहिलं? तर लोक रस्त्यावर आले, टाळी वाजवून, थाळी वाजवून गो कोरोना म्हणून गाणी म्हणू लागले. तो तमाशा तुम्ही पाहिला. संसदेचे सत्रही संपवण्यात आले नाही. भाजपाचे खासदार दुष्यन्त कुमार सिंग, ज्यांनी कनिकाच्या पार्टीला उपस्थिती लावली होती ते संसदेत निघून गेले. संसदेमधले काही खासदार जे त्यांच्या संपर्कात आले त्यांच्यावर याचा परिणाम झाला. राष्ट्रपतींनी खासदारांची एक पार्टी ठेवली त्यातही हे लोक समाविष्ट होते. आणि आता तुम्ही हे समजून घ्या जे धार्मिक लोक आहेत आणि ज्या धार्मिक गोष्टी आहेत, त्या २४ मार्चपर्यंत चालू राहिल्या. २४ मार्चला राष्ट्रीय संचारबंदीची घोषणा होते आहे. २५ मार्चला तबलिगी जमातीतले लोक पोलीस स्टेशनला, एसएचओला कळवतात की आमच्याकडे एवढे लोक, इतके परदेशी नागरिक आहेत त्यांची व्यवस्था करा. त्यांनी वाहनांची, चालकांची व्यवस्था केली आणि परवानगी मागितली. ते पोलीस कमिशनरनापण भेटले. पण त्यांना परवानगी मिळाली नाही. आणि २४-२५ पर्यंत पाहता ते लोक हे सगळं सुरु असताना तिथे जमा झाले नव्हते. जेव्हा जमा झाले होते तेव्हा जमा व्हायला बंदी नव्हती. धार्मिक एकसंधतेला बंदी नव्हती. त्या धार्मिक एकसंधतेनंतर हे लोक तिथे अडकून राहिले. पोलीस या मरकज तबलिगी जमातीवर खूप बारीक नजर ठेवते. इंदिराजींच्या काळात हे लोक इथे जमून नक्की काय करतात हे पाहण्यासाठी त्यांनी खाजगी गुप्तचर एजन्सीना यांच्या मागावर लावले होते. इथून हे वेगवेगळ्या ठिकाणी जातात. काहीजण ३ दिवसांसाठी, ४० दिवसांसाठी, तर काहीजण ३ महिन्यांसाठीही जातात.
तबलिगी प्रकरणावर फैझान मुस्तफा यांचा व्हिडियो पाहण्यासाठी – https://youtu.be/Ky9VDWoz7so
पुन्हा वस्तुस्थिती – गुप्तचर विभागाने आपला अहवाल दिला. त्यात ते म्हणाले, आम्ही खूप काळजीपूर्वक या लोकांना ऐकलं, पाहिलं, त्यांच्याशी बोललो या लोकांपासून राष्ट्राला काहीच धोका नाही, कारण हे लोक या जगाविषयी बोलतच नाहीत. त्यामुळेच ज्या इतर मुस्लिम संघटना आणि मुस्लिम धर्माची काही मंडळे आहेत ते या तबलिगी जमातीवर टीका करतात. कारण या जमातीतले लोक स्वतःच्या पैशांनी, स्वतःचे घरदार सोडून इकडे जातात. स्वतःचे स्रोत गुंतवतात. यांचे कुणी प्रायोजक नसतात किंवा यांना कुणी पैसे देणारेही नसतात. पण तरीही दुसऱ्या लोकांचे असे म्हणणे आहे की तुम्ही तुमची जबाबदारी, तुमचे शिक्षण, तुमची नोकरी याच्यावर जास्त लक्ष द्या, तेसुद्धा धर्माचेच एक काम आहे. तर गुप्तचर विभागाने असा अहवाल दिला की एकतर हे लोक जमिनीखालच्या गोष्टी करतात. कबरीमध्ये कुठला विंचू येईल, कोणता साप येईल, कुठली आश्चर्ये येतील, काय काय पाप लागेल. म्हणजे जमिनीची नाही तर जमिनीखालची गोष्ट करतात. किंवा आकाशावरच्या गोष्टी करतात कि, जन्नत, स्वर्गात तुम्हांला हे हे मिळेल जर तुम्ही चांगले काम केले तर.
तबलिगी म्हणजे? – तबलिगी जमातीला थोडं समजून घ्या. १९२७ ला ही जमात स्थापन झाली आहे. आणि या जमातीचे यावेळचे सर्वात मोठे मौलाना सात कंधाल्वी हे स्वतःच मोठे विवादात्मक व्यक्तिमत्व आहेत. २०१६ साली भोपाळमध्ये झालेल्या भाषणात त्यांनी हे विधान केले की, मक्का-मदिनानंतर इस्लामचे तिसरे पवित्र स्थान आहे ते निजामुद्दीनच्या मरकजचे आहे. देवबनेसच्या विरोधात त्यांच्याविरुद्ध फतवा देण्यात आला की, ते दिशाभूल करत आहेत, भरकटलेले आहेत आणि इस्लामची चुकीची व्याख्या करत आहेत. आणि खरंही हेच आहे की, इस्लामचे जी ३ प्रमुख धार्मिक स्थळे आहेत, जी जास्त पवित्र आहेत ती मक्का, मदिना आणि जेरुसलेम ही आहेत. ही विसाव्या शतकातील उपज आहे. तबलिगी जमात ही कोणत्याच मुस्लिम नसणाऱ्या लोकांना परावर्तित करत नाही. त्यांचे काम मुस्लिमांना उत्तम धार्मिक मुस्लिम बनविणे हे आहे. म्हणून नमाज कसे वाचले पाहिजे, देवाचे नाव कसे जपले पाहिजे यावर यांचे लक्ष केंद्रित असते. यानंतर मौलाना सादनी माफी मागितली. त्यावरसुद्धा काही विवाद झाले. त्यांचे आणखी एक विधान की, मोबाईल तुमच्या खिशात असेल तर तुमची नमाज चांगली होत नाही. त्यावरसुद्धा मोठा वाद झाला आहे. त्यांचे तिसरे आणखी एक विधान की मोबाईलमध्ये जर इस्लामिक किंवा कुराणिक अप्लिकेशन असेल तर ती एक काल्पनिक गोष्ट असल्यासारखी आहे. हे जे मौलाना आहेत हे मला जुन्या शाळेतले वाटतात. यांचे विचार एखाद्या आधुनिक इस्लामिक विद्वानाचे जसे असायला हवेत तितके उदार नाहीत. पण आपल्या देशाचे संविधान तुम्हांला धार्मिक स्वातंत्र्यामध्ये अंधविश्वास ठेवण्याची परवानगी देते आणि अंधविश्वासातले काही भाग यामध्ये आले.
या शिकवणीचं करायचं काय? – आता मौलाना त्यांच्या भाषणात सांगत आहेत की, तुम्ही अडचणीत आहात तर अल्लाहचे घर सोडू नका. जेव्हा की इस्लामच्या कायद्याचे एक सांगणे आहे की, जर एखादा आजार पसरला आहे, खूप जोरात पाऊस पडतो आहे तर आपल्या घरातून जाऊ नका. आपल्या घरातूनच नमाज वाचा. धर्मात आणखी एक मोठी गोष्ट असते की, कुणाला काही म्हणायचे असेल, काही सांगायचे असेल तर धर्मात त्याला कोणतातरी पुरावा, कोणती तरी दलील मिळून जाते. म्हणून धर्मात इतके समूह असतात. आता चला गोष्टींना थोड्या चांगल्या पद्धतीने समजून घेऊया. तबलिगी जमातीकडून अजाणतेपणे ज्या चुका झाल्या आहेत त्या त्यांच्या धार्मिक अंधविश्वासामुळे झाल्या आहेत. कारण त्यांच्या मौलानाने त्यांना जर तुम्ही अल्लाहच्या जवळ आहात, मस्जिदमध्ये आहात तर तुमच्यापासून हा आजार निघून जाईल असं सांगितलं. तुम्ही थोडा विचार करा की हा विश्वास चुकीचा असू शकतो. खूपसे धार्मिक विश्वास हे अंधश्रद्धेवर अवलंबून आहेत. तबलिगी जमातीचे जे पुस्तक आहे, ‘फजाईले आमाल’ याबद्दलसुद्धा इस्लामिक विद्वानांमध्ये खूप वाद आहे. काही लोक म्हणतात त्यामध्ये अनेक अनधिकृत फायदे आलेले आहेत. काही लोक त्या पुस्तकाला जास्त महत्व दिले जाते आणि त्याला कुराण आणि हदीसच्या बरोबर आणले गेले आहे म्हणून यावर सुद्धा आक्षेप घेतात. हे धार्मिक वाद सगळ्या धर्मात होत असतात ते प्रत्येक धर्मात आहेत, मुस्लिमांच्यात पण आहेत.
हे जास्त महत्त्वाचं – पण जी खरी घटना सुरु झाली ती १७ मार्चपासून, झालं असं की, थायलंडवरून ४९ वर्षाचे एक गृहस्थ आले होते. ते कोईम्बतूरच्या विमानतळावर उतरले. त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून त्यांची तपासणी करण्यात आली. ती नकारात्मक निघाली पण ज्या सात लोकांसोबत ते आले होते, त्यापैकी २ लोकांच्या सकारात्मक आल्या आणि इथून हे प्रकरण सुरु झाले. यामध्ये जास्त समस्या अचानक संचारबंदी झाल्यामुळे झाली. या संचारबंदीनंतर कैक लाख स्थलांतरित लोक रस्त्यावर आले. इथे १५०० लोक उपस्थित होते आणि हा काही फार मोठा आकडा नाही. यांच्या मरकजमध्ये साधारण ८-१० हजार लोकांसाठी जागा आहे. मरकजच्या आतून आलेल्या फोटोंमुळे मी जरा सुखावलो आणि मला आनंद झाला की तिथे लोक दूरदूर बसले आहेत. तिथे डॉक्टर लोकांची आरोग्य तपासणी करत आहेत. यांनी लोकांना आतून बाहेर जाऊ दिले नाही. कारण संचारबंदी लागू करण्यात आली. आता त्यांच्याबद्दल माध्यमांमध्ये चुकीचे बोलणे आणि हा सगळा कोरोना विषाणूचा आरोप त्यांच्यावर ढकलणं मला योग्य वाटत नाही.
नियमांची चौकट – आता आपण भारत सरकारचे कोणते नियम नाहीत ते समजून घेऊया. पहिल्यांदा तर जानेवारीपासून ३ मार्चपर्यंत १५ लाख लोक बाहेरून भारतात आले याचा विचार करा. त्यांच्यापैकी किती लोक विषाणू घेऊन आले, आपल्या घरी निघून गेले? आता असे नियम आलेत की त्या सगळ्यांच्या तपासण्या होतील. त्यांच्यापैकी किती लोकांच्या तपासण्या झाल्या आम्हांला माहित नाही. भारत खूप कमी लोकांच्या तपासण्या करत आहे. सार्वत्रिक तपासणी भारताने ३ मार्च ला सुरु केली. जे २५० लोक १३ ते १५ मार्चच्या कार्यक्रमासाठी भारतात येत आहेत. ते जर ३ मार्च नंतर आले तर त्यांची विमानतळावर तपासणी का झाली नाही ? आणि त्यांना तुम्ही येऊ कसं दिलं? त्यांची विमानतळावर काय तपासणी झाली होती? परदेशी प्राधिकरणाने त्यांना का थांबविले नाही? आपण जर ८ मार्चचे नियम पाहिले तर चीन, ईराण, इटली, कोरिया आणि जपानला लोकांनी जाऊ नये असा नियम होता. जे लोक संक्रमित प्रदेशातून येत होते आपण फक्त त्यांच्याच तपासण्या करत होतो. १६ मार्चला सरकारच्या आरोग्य विभागाने एक नियमावली जाहीर केली आहे. त्यातही दोन गोष्टी होत्या, एकतर ही नियमावली १८ मार्चपासून लागू होईल आणि दुसरी म्हणजे जे प्रवासी कुवेत, कतार, युएई आणि ओमानवरून येत आहेत त्यांचे अलगाव अनिवार्य असेल. १८ मार्चपासून जे प्रवासी युरोपियन युनियन सदस्य देशातून येत आहेत जसे की, तुर्की आणि इंग्लंड, त्यांना मनाई करण्यात आली. मी असे समजतो वैष्णोदेवीमध्ये ४०० लोक अडकून होते, साक्षी महाराजांनी पण २३ मार्चला मथुरामध्ये एक कार्यक्रम करून घेतला, असाच हाही एक प्रकार आहे यात बेपर्वाई असू शकते, पण हे जाणीवपूर्वक नव्हते.
आपले कायदे बघितले तर – १) भारतीय दंड न्यायालय, कलम १८८ नुसार जर एखाद्या सार्वजनिक आदेशाचे उल्लंघन केले गेले, त्याचा अनादर केला गेला तर हा एक जामीनपात्र गुन्हा आहे. ज्यामध्ये १००% जमीन मिळू शकतो. यात वॉरंटशिवाय अटक करता येऊ शकत नाही.
२) भारतीय दंड न्यायालय, कलम २६९ सांगते की, जर कुणी बेकायदेशीररीत्या, निष्काळजीपणे जर असे एखादे काम केले ज्यात त्याला माहीत होते किंवा विश्वास ठेवण्याचे कारण आहे की जे तो करतो आहे त्याने एखादा संसर्ग पसरेल तर त्याला ६ महिन्याचा तुरुंगवास किंवा दंड भरावा लागेल किंवा दोन्ही होऊ शकेल. यातसुद्धा जामीन अधिकार आहे. यात वॉरंटशिवाय अटक करता येऊ शकते.
३) भारतीय दंड न्यायालय, कलम २७० सांगते, जो कुणी आजार पसरविण्याचे घातक कृत्य जाणीवपूर्वक करेल आणि आणि जर विश्वास ठेवण्याचे कारण असेल तर हाही जामीनपात्र गुन्हा आहे. इथेही वॉरंटशिवाय अटक होऊ शकते.
४) भारतीय दंड न्यायालय, कलम २७१ – अलगाव न मानणाऱ्या आज्ञाभंग करणाऱ्यांबद्दल बोलते.
५) कलम ५१ हे राष्ट्रीय आपत्ती कायद्याचे आहे, जर तुम्ही सांगितलेल्या सूचनांचे पालन केले नाही तर १ वर्ष तुरुंगवास आणि दंड किंवा दोन्ही होऊ शकते.
वडाचं तेल वांग्यावर – या लोकांचा बचाव असा असेल की हे लोक तिथे उपस्थित होते. आणि त्यांच्या उपस्थितीला बंदी नव्हती. म्हणून हे लोक तिथे अडकले आणि यांना बाहेर काढण्यासाठी सरकारने जी पावले उचलायला हवी होती, दिल्ली सरकारने जे प्रयत्न करायला हवे होते, ते पुरेशा प्रमाणात केले गेले नाहीत. मंगळवारी उच्च न्यायालयात कोरोना विषाणू आणि स्थलांतरित कामगार यांच्याविषयी सुनावणी झाली आहे. सरकारने उच्च न्यायालयाला सांगितले की या स्थलांतरित लोकांमध्ये १० मागे ३ लोकांना या विषाणू संक्रमणाची शक्यता आहे. सरकार स्वतः सांगत आहे की ६ लाखांपेक्षा जास्त लोकांना आश्रय दिला गेला आहे, जो १५०० पेक्षा खूप जास्त आहे. १०- २० हजार लोकांना एकत्र ठेवलं जात आहे. उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांचे मागच्या व्हिडिओत मी कौतुक केले. त्यांनी १००० बस उपलब्ध केल्या म्हणून..!! पण मी ट्विटरवर त्यांच्या बसचे तिकीट पाहिले, सगळ्यात महाग तिकीट त्यांनी ६८० रुपये ठेवले होते. मात्र राजस्थानमध्ये ज्या बस चालवल्या गेल्या त्यात ० रु ठेवले गेले. एका बसमध्ये ६० लोक जातात. जर त्यांच्यापैकी २० संक्रमित आहेत तर उरलेल्या ४० जणांच्या शक्यता खुप जास्त आहेत. आणि जर १००० बस मधून ६० हजार लोक गेले आहेत तर २० हजार लोकांच्या संक्रमित होण्याची शक्यता खूप जास्त आहे. तबलिगी समाजाचे हे प्रकरण दिशाभूल करण्यासाठी वापरले जात आहे. खरे पाहता स्थलांतरित लोक रस्त्यावर कसे आले? त्यांना का थांबविले नाही? सरकार कसे यात अयशस्वी झाले त्याला झाकता यावे म्हणून..!! आणि कोणतीही गोष्ट झाकण्यासाठी नेहमी अल्पसंख्यांकानाच ढाल बनविले जाते.
कायदे समान नकोत का? – आता जे मी सांगतो आहे की धार्मिक व्यक्तींचा किंवा धार्मिक समूहांचा विवेकीपणा इतका नसतो जितका राज्याच्या कारभाऱ्यांचा असायला पाहिजे. दोन उदाहरणे मी तुम्हांला देतो. येडियुरप्पा जे भाजपाचे मुख्यमंत्री आहेत, काँग्रेसला पराजित करून ते सत्तेत आले. आणि त्यांनी स्वतः ज्या सूचना दिल्या होत्या की, परिषदा होणार नाहीत, लग्नसमारंभ होणार नाहीत तिथे स्वतःच्याच सूचनांचे उल्लंघन करीत ते भाजपाच्या एका आमदारांच्या मुलीच्या लग्नाला गेले. जिथे २००० लोक उपस्थित होते. तिथे त्यांचे गृहमंत्रीसुद्धा होते. त्यांनी स्वतःच स्वतःचा कायदा मोडला. दुसरे बरेली सरकारच्या जिल्हा प्रशासनाने जे स्थलांतरित परत येत होते, ज्यांच्यामध्ये लहान मुलेसुद्धा होती अशा गरीब लोकांवर रसायनांचा पाऊस पाडला. सोडियम हायपोक्लोराईड च्या द्रव्याचा पाऊस पाडण्यात आला. कुत्र्या-मांजरांना पण अशा पद्धतीने वागविलं जात नाही जसं यांना वागविलं गेलं. जिल्हाधिकारी साहेबांनी माफी मागितली आणि हे प्रकरण संपून गेलं. जर संसर्गाचा कायदा एक असेल तर आपण सगळीकडे एकाच प्रकारची कारवाई केली पाहिजे. जर संमेलनाला बंदी आहे तर सगळीकडे सारखीच कारवाई व्हायला हवी.
विचार करण्यासारखं – जर लोक अडकले आहेत ते पण २१ मार्चला रेल्वे बंद झाली, लगेच २२ मार्चला जनता कर्फ्यू झाला, जनता कर्फ्यूनंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी दिल्लीच्या संचारबंदीची घोषणा केली, त्यानंतर तुम्ही २५ तारखेपासून राष्ट्रीय संचारबंदी केली. दिल्लीत मरकजमध्ये असणारे लोक अडकलेले लोक होते. कायद्याचे पालन करण्यासाठी म्हणून ते बाहेर पडले नाहीत. ते एका इमारतीच्या आत होते आणि जेव्हा कुणी कुठेच बाहेर पडणार नाही हे सांगण्यात आले तेव्हा त्यांनी कायद्याचा भंग केला नाही. जे हजारो, लाखो स्थलांतरित लोक रस्त्यावर आले त्यांनी कायद्याचा भंग केला, पण त्यांनी मजबुरीमध्ये ते केलं. मी त्यांच्याही विरोधात नाही. आपण आपल्या संचारबंदीचे नियोजन केले नाही, त्यामुळे लोक घाबरले. लोकांना असे वाटले की आपल्याला मरायचेच आहे तर आपल्या घरातल्याजवळ जाऊ. यामुळे ही समस्या झाली आहे आता या समस्येमधून दोष बाजूला केला पाहिजे. कुठल्या तरी एका समूहावर लक्ष केंद्रित करण्यापेक्षा त्यांचे संपर्क शोधून त्यांच्या तपासण्या करा आणि त्यांनतर योग्य आरोग्यसेवा त्यांच्यापर्यंत पोहोचवा. कायद्याचे जे काम आहे ते होत राहील. रस्त्यावर आलेल्या लोकांच्या गर्दीला रस्त्यावर का एकत्र येऊ दिलं गेलं? मला वाटतं हे प्रकरण दोषांच्या खेळापेक्षा थोडं सुधारलं पाहिजे. आता सगळ्या जिल्ह्यांमध्ये तबलिगी जमातीचे मरकजमधले किती लोक पोहोचले आहेत याची यादी तयार आहे. त्या सगळ्यांच्या तपासण्या झाल्या पाहिजेत. सरकारला जी कारवाई करायची आहे ती होऊन जाईल. ७-८ लोकांविरुद्ध एफआयआर झाली आहे. कायदा त्याचा स्वतःचा मार्ग स्वीकारेल पण एखाद्या ठराविक धार्मिक जमातीला, समूहाला दोष देणे कदापि योग्य नाही.
अनुवाद – जयश्री देसाई. जयश्री या उत्तम व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट असून त्यांना वाचन, प्रवास आणि लेखनाची विशेष आवड आहे. संपर्क क्रमांक – 9561190500
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’
हे पण वाचा –
आता घर बसल्या तपासा कोरोना ; सरकारकडून ‘आरोग्य सेतु’ अँप लॉन्च
काय आहे प्लाज्मा थेरपी?, माकडांचा अभ्यास करुन कोरोनावर बनणार औषध
निजामुद्दीन मरकज वर असदुद्दीन ओवेसींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
मुंबई ‘वुहान’ होण्याच्या मार्गावर? ५ हजारपेक्षा जास्त लोक कोरोनाबाधितांच्या संपर्कात
कोरोना फुफुसाला कसा नुकसान पोहोचवतो? जाणुन घ्या ‘या’ 3D व्हिडिओ मधून
भारतात ‘या’ कारणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता