टीम हॅलो महाराष्ट्र | उदयनराजेंनी वंशज असल्याचे पुरावे द्यावे आणि करीम लालाला इंदिरा गांधी भेटत असतं या विधानानंतर गेल्या दोन दिवसांपासून संजय राऊतांवर भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार टीका होतं आहे. कालच त्यांनी माफी मागत इंदिरा गांधीविषयी केलेले विधान मागे घेतले. मात्र उदयनराजे समर्थक संजय राऊत यांच्या विरोधात अजूनही आक्रमक आहेत. सोशलमीडियावरही संजय राऊत यांना या मुद्यावरून ट्रोल करण्यात येत आहे. काल सातारा बंद ठेवण्यात आला आज सांगली बंद ठेवण्यात येत आहे. कराडमध्ये त्यांच्या फोटोची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली. संजय राऊत यांच्या विरोधात बोलणाऱ्या या मंडळींवर राऊत यांनी आता ट्विटरवरून निशाणा साधला आहे.
काही राजकीय बेरोजगारांना कंत्राटी कामगार म्हणून राज्यात काम मिळाले आहे. त्याचा लाभ त्या मंडळींनी जरूर घ्यावा. पण राज्य अशांत कराल तर जनता माफ करणार नाही, अशा शब्दांत संजय राऊत यांनी त्यांच्याविरोधात आंदोलन करणाऱ्या, बोलणाऱ्या विरोधकांचा समाचार घेतला आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याशी हातमिळवणी करून शिवसेनेने राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. ही सत्ता स्थापन करण्यात संजय राऊत यांची महत्वपूर्ण भूमिका राहिली आहे. भाजपच्या तोंडाशी आलेला सत्तेचा घास संजय राऊतांमुळे हिरावून घेतला. त्यामुळे भाजपमधील नेते मंडळी संजय राऊत यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.