व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नितीशकुमार भाजपला हादरा देणार? काँग्रेस- आरजेडी सोबत सत्तास्थापनेच्या चर्चाना उधाण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्रात शिवसेनेला फोडून भाजपने सत्तास्थापन केलं असलं तरी आता बिहारमध्ये मात्र भाजपची हातची सत्ता जाण्याची चिन्हे आहेत. बिहारमधील जेडीयू आणि भाजपमधील युती तुटण्याच्या चर्चानी जोर धरला आहे. खुद्द जेडीयूच ही युती तोडण्याची शक्यता आहे. काल बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर या सर्व चर्चाना उधाण आले.

गेल्या काही दिवसापासून भाजप आणि जेडीयूमध्ये अंतर्गत कुरघोडी असल्याच्या बातम्या येत होत्या. भाजपकडून पक्ष फोडण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा जेडीयूकडून आरोप केला जात आहे. त्यामुळेच त्यांना भाजपची साथ नको असं म्हंटल जात आहे. पण जदयूला आता पुन्हा मध्यावधी निवडणुकाही नको आहेत. त्यामुळेच भाजपची साथ सोडत नितीश कुमार आरजेडी आणि काँग्रेस सोबत सत्ता स्थापन करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

जेडीयूने आपल्या सर्व खासदार आणि आमदारांना 11 ऑगस्ट रोजी पाटणा येथे बोलावले आहे. जेडीयूच्या सर्व आमदार आणि आमदारांना मंगळवारी बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी 9 वाजता राबरी निवासस्थानी आरजेडीने बैठक बोलावली आहे. यामध्ये पक्षाचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. त्याचवेळी बिहार काँग्रेसने सर्व आमदारांना आज संध्याकाळपर्यंत पाटण्यात पोहोचण्यास सांगितले आहे. त्यामुळे येत्या २ दिवसात बिहारमध्ये मोठा राजकीय उलटफेर होणार का ?? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे.

वास्तविक, गेल्या 1 महिन्यातील घडामोडींवर नजर टाकली तर असे दिसते की नितीश आणि भाजपमध्ये सर्व काही सुरळीत चाललेले नाही. नितीश यांनी एका महिन्यात भाजपपासून अंतर कसे ठेवले?हे जाणून घेऊया..

प्रथम, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली 17 जुलै रोजी देशातील सर्व मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावण्यात आली होती, परंतु नितीश कुमार या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.

त्यानंतर 22 जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या निरोप समारंभात नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, मात्र ते त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत.

25 जुलै रोजी नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी नितीश कुमार यांनाही आमंत्रित करण्यात आले होते, मात्र ते गेले नाहीत.

७ ऑगस्टला नितीश कुमार यांना पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील नीती आयोगाच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी बोलावण्यात आले होते, मात्र ते या बैठकीला उपस्थित राहिले नाहीत.