भाजपचे ‘घंटानाद’ आंदोलन मंदिरासाठी नव्हे तर केवळ सत्तेसाठी!

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर । राज्य सरकारची मनाई असली तरी पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात प्रवेश करण्याचा निर्धार वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला असून मंदिरे पुन्हा उघडण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाला त्यामुळे धार येणार आहे. प्रकाश आंबेडकर प्रथम चंद्रभागा व पुंडलिकाचे दर्शन घेतील व नंतर वारकऱ्यांसमवेत विठ्ठल मंदिरात प्रवेश करतील, असे वंचितचे प्रवक्ते आनंद चंदनशिवे यांनी सांगितले. यावेळी चंदनशिवे यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर भाजपने सुरु केलेल्या घंटानाद आंदोलनावर सडकून टीका केली.

वंचित;ला राज्यातील वारकरी संप्रदायाचा पाठिंबा मिळत असल्याचे पाहून आज भाजप कडून घंटानाद आंदोलन केले जात असून त्यांचे आंदोलन केवळ राजकारणासाठी असल्याची खरमरीत टीका चंदनशिवे यांनी केली. भाजपचे ‘दार उघड’ आंदोलन मंदिरासाठी नाही सत्तेसाठी आहे. सत्तेचे दार उघडण्यासाठी हे सारे खटाटोप आहेत. प्रकाश आंबेडकर यांना राज्यभरातून मिळणाऱ्या उदंड प्रतिसादामुळे भाजपने आंदोलनाचा फार्स केला आहे, असेही चंदनशिवे म्हणाले.

याशिवाय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावर चर्चेचे केवळ गाजर दाखवले मात्र कोणतीही चर्चा घडवून आणली नाही, असा आरोपही चंदनशिवे यांनी केला. वारकरी परंपरांचे पालन करीत मंदिर प्रवेश होणार असून राज्यातल्या २०० पेक्षा जास्त संघटनांनी या आंदोलनास पाठिंबा दिल्याचा दावाही त्यांनी केला.

मंदिर खुली करण्याच्या मुद्द्यावर राजकीय पक्षात चढाओढ
लॉकडाऊनमुळे गेल्या पाच महिन्यांपासून राज्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद आहेत. राज्यात मिशन बिगिन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले असले तरी मंदिरे व अन्य धार्मिक स्थळांची दारे मात्र अद्याप बंदच आहेत. या पार्श्वभूमीवर मंदिरे उघडण्याची मागणी गेल्या काही दिवसांपासून जोर धरू लागली आहे. या मागणीसाठी भाजपने तर आज रस्त्यावर उतरत आंदोलन पुकारले आहे. पुणे, नागपूर, कोल्हापूर, नाशिकसह विविध ठिकाणी घंटानाद आंदोलन करत ‘दार उघडा उद्धवा’ अशी साद भाजपने घातली आहे. भाजपच्या या आंदोलनाबरोबरच मंदिरे उघडण्यासाठी पहिल्यापासून आग्रही असलेले प्रकाश आंबेडकरही आक्रमक झाले आहेत. पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर दर्शनासाठी खुले करण्यासाठी त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. वारकऱ्यांसमवेत मंदिरात प्रवेश करण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment