हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई, ठाण्यात काहीच पैसा उरणार नाही, असे वक्तव्य राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केले. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्यावर टीका होत असताना वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राज्यपालांची बाजू घेतली आहे. “राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा बिल्कुल अपमान झाला नाही. त्यांनी सत्यपरिस्थिती मांडली आहे. त्यांच्या विधानाचे मी समर्थन करतो,” असे आंबेडकर यांनी म्हंटले आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, इतके वर्ष काँग्रेस-राष्ट्रवादीने राज्यात सत्ता केली. परंतु त्यांनी मराठी माणसाच्या हातात आर्थिक व्यवहार देऊ शकला नाही. याउलट राज्यपालांनी मराठी माणसाचे डोळे उघडे केले. त्यामुळे मराठी माणसांनी या बुजगावण्यांसोबत राहायचं की नवीन नेतृत्वामागे उभं राहायचं याचा विचार करावा, असा सल्ला आंबेडकरांनी दिला.
राज्यपाल नेमकं काय म्हणाले?
मुंबईतील एका कार्यक्रमात भाषणादरम्यान राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईबाबत वादग्रस्त विधान केले. ते म्हणाले, “कधी कधी मी इथल्या लोकांना बोलतो महाराष्ट्रात, मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी यांना बाहेर काढल्यानंतर मुंबई ठाण्यात आणि आजूबाजूच्या भागात काहीच पैसा उरणार नाही. मुंबई देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. मात्र मुंबईची ती ओळखही उरणार नाही, असेही कोश्यारींनी म्हंटले.